Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून 'नाशिक मेट्रो' चे कौतुक, प्रकल्प आता देशपातळीवर राबवण्याची घोषणा
Budget 2021: नाशिक टायर बेस मेट्रोचा (Nashik Metro) प्रकल्प हा देशासाठी आदर्श असून तो आता देशपातळीवरही स्वीकरला जाईल अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
नाशिक: नाशिकच्या टायर बेस मेट्रोचे कौतुक केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केलं असून आता या संकल्पनेला आता देशपातळीवर राबवण्यात येणार आहे अशीही घोषणा करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी हा अभिमानास्पद क्षण असून आपण यामुळे समाधानी असल्याची भावना महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिकमध्ये राबवण्यात आलेल्या टायर बेस मेट्रो म्हणजे आर्टिक्युलेटेड बस मॉडेलचे कौतुक करण्यात आले असून त्याला आता राष्ट्रीय प्रकल्प म्हणून स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नाशिकच्या या टायर बेस मेट्रोची अंमलबजावणी आता देशाच्या इतर शहरातही करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
Congratulations Nashik! Congratulations Nagpur! We are happy that GoI appreciates our innovative approach & accepts model of #NashikMetro as a National Project. Not only this, but Nashik metro model will be implemented in other Indian cities too.#AatmanirbharBharatKaBudget
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 1, 2021
आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नाशिककरांसाठी टायर बेस मेट्रो प्रकल्प सुरु केला होता. पुणे आणि नागपूर पाठोपाठ नाशिकला मेट्रो मिळणार यामुळे नाशिककरांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण इतर शहरांप्रमाणे नाशिकला मेट्रो न देता टायर बेस मेट्रो म्हणजेच आर्टिक्युलेटेड बसची सुविधा देण्यात आली होती.
काय आहे नाशिक टायर बेस मेट्रो प्रकल्प? एकूण वीस हजार कोटी रुपयांचा खर्च असलेला हा मेट्रो प्रकल्प नाशिकमध्ये राबवण्यात येतोय. टायर बेस मेट्रो ही एक प्रकारची आर्टिक्युलेटेड बस असून ती रस्त्यावरुन धावते. सातपूरमधील श्रमिकनगर ते खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, व्दारका चौक ते नाशिकरोड असा एक मार्ग राहणार आहे. सातपूर रोडवरील अमृत गार्डन चौकात या मार्गावरील मुख्य जंक्शन असणार आहे. तर दुसरा मार्ग मुंबईनाका, सीबीएस, अशोकस्तंभ ते गंगापूर गाव असा असेल. मुंबईनाक्यावर दुसरे जंक्शन असणार आहे. या दोन्ही मार्गांना जोडणारा लूप बारदान फाटा ते श्रमिकनगर या दरम्यान असणार आहे. दोन्ही मार्गांवर एकूण 29 थांबे असणार आहेत.