Air India Sale: एयर इंडियाच्या खरेदीसाठी आता कोलकात्याच्या पवन रुईयांचीही दावेदारी
टाटा ग्रुप आणि एयर इंडिया कर्मचारी संघटना यांच्यासोबत एयर इंडियाच्या (Air India) खरेदी स्पर्धेत आता कोलकात्याचे उद्योगपती पवन रुईया (Pawan Ruia) उतरले असून त्यांनीही एयर इंडियाच्या खरेदीची इच्छा व्यक्त केलीय.
नवी दिल्ली: कोलकात्याचे उद्योगपती पवन रुईया यांनी सरकारी एयरलाईन्स कंपनी एयर इंडियाचे 100 टक्के शेअर्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असून तसे पत्र (expression of interest) सरकारकडे दिलं आहे. या आधी टाटा ग्रुप आणि एयर इंडिया कर्मचारी संघटनेनं तशा प्रकारचं पत्र दिलं होतं. आता या दोन महत्वाच्या दावेदारांच्या स्पर्धेत उद्योगपती पवन रुईयाही उतरले आहेत.
कोण आहेत पवन रुइया? उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेल्या पवन रुईया यांनी कोलकात्यात आपल्या रुईया उद्योग समुहाची उभारणी केली. कोलकात्याच्या बाहेर त्यांच्या नावाची जास्त चर्चा नसली तरी त्यांना 'टर्नअराउंड स्पेशलिस्ट' म्हणून ओळखले जाते. त्याचं कारण म्हणजे पवन रुईया यांनी आर्थिक अडचणीत चाललेल्या अनेक कंपन्याची खरेदी केली आणि त्या अगदी कमी कालावधीत पुन्हा फायद्यात आणल्या. यामध्ये डनलॉप इंडिया, फाल्कन टायर्स आणि जेसॉप अॅन्ड कंपनी यांचा समावेश होतोय.
पवन रुईया यांनी 220 वर्षापूर्वीची जुनी असलेली अभियांत्रिकी कंपनी जेसॉप अॅन्ड कंपनी ही 2003 साली ताब्यात घेतली. त्यावेळी ही कंपनी डबघाईला आली होती. पण रुईया यांनी या कंपनीचा ताबा घेतल्यानंतर अगदी कमी कालावधीतच ही कंपनी पुन्हा उभी राहीली. कर्जात असणारी ही कंपनी दोनच वर्षात दहा कोटी नेट प्रॉफिटमध्ये आली.
Good News : Air Indiaकडून प्रवाशांसाठी मोठी सवलत; तिकीट दर अर्ध्यावर
त्यानंतर पवन रुईया यांनी डनलॉप इंडिया आणि फाल्कन टायर्स या दोन कंपन्या ताब्यात घेतल्या. त्या वेळी या दोनही कंपन्या आर्थिक डबघाईला आल्या होत्या. रुईया यांनी ताबा घेताच या कंपनीच्या चार हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परत बोलवण्यात आलं. कायदेशीर अडचणी सोडवण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांना कामाची कायदेशीर सुरक्षा देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये उत्साह निर्माण झाला आणि कंपनीच्या पूर्ण क्षमतेनं उत्पादनाला सुरुवात झाली. त्यामुळे या दोनही कंपन्या कर्जातून बाहेर आल्या.
आता या तिनही कंपन्यांपेक्षा एयर इंडियाची परिस्थिती वेगळी असणार आहे. कारण जी कोणती कंपनी एयर इंडियाचा मालकी हक्क मिळवेल त्याच्या मागे केंद्र सरकार थामपणे उभे राहण्याची शक्यता आहे. यावर पवन रुईया यांनी लगेच काही प्रतिक्रिया दिली नसली तरी या क्षेत्रातले तज्ज्ञांचं असं मत आहे की रुईया हे अशा एका व्यावसायिक पार्टनरच्या शोधात आहेत जो त्यांना भक्कमपणे आर्थिक साथ देऊ शकेल.
एयर इंडियाच्या मालकी हक्काची खरेदी करणाऱ्या कंपनीकडे किमान 3,500 कोटी रुपयांची नेट व्हॅल्यू असणं आवश्यक आहे असं सरकारकडून सांगण्यात आलंय. या क्षेत्रातील अनुभव आणि आर्थिक परिस्थिती पाहता टाटा ग्रुपची दावेदारी अधिक भक्कम आहे असं दिसतंय.