BLOG | वादळापूर्वीची शांतता?
यापुढे खऱ्या अर्थाने नागरिकांना आरोग्य साक्षर होण्याची गरज असून त्यात मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभाग घेण्याची गरज आहे. कोरोना काळ संपतोय असे वातावरण निर्माण झाले असले तरी वादळापूर्वीची शांतता ठरू नये.
एकंदरच संबंध राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. प्रशासनाच्या मेहनतीला फळ येतंय. राज्यातील खासगी आणि सरकरारी आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. दिवसागणिक उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तर मृतांचा आकडा पूर्वीपेक्षा बऱ्यापैकी कमी झाला आहे. नवीन रुग्ण निर्माण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट दिसून येत आहे. सध्या तरी कोरोनाच्या अनुषंगाने राज्याकरिता सकारात्मक जमेची बाजू म्हणता येईल असे बदल राज्यात पाहावयास मिळत आहे. आरोग्य विभागाने अंमलात आणलेल्या ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट या त्रिसूचीचा या काळात मोठा फायदा राज्याला झाला आहे. मात्र, आता ही परिस्थिती आहे तशी कायम ठेवत उतरणीला आलेला आलेख तसाच उतरणीला ठेवणे हे आरोग्य विभागासमोर आव्हान असणार आहे. कारण मोठ्या प्रमाणात मोकळीक देण्यात आलेली आहे. जीवनमान हळू-हळू पूर्वपदावर येत आहे. या अशा काळात प्रशासनाबरोबर नागरिकांची जबाबदारी मोठी असणार आहे.
यापुढे खऱ्या अर्थाने नागरिकांना आरोग्य साक्षर होण्याची गरज असून त्यात मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभाग घेण्याची गरज आहे. कोरोना काळ संपतोय असे वातावरण निर्माण झाले असले तरी वादळापूर्वीची शांतता ठरू नये. साथरोग शास्त्रानुसार जर सुरक्षिततेचे नियम नाही पाळले तर मोठे धोके भविष्यात संभवतात. त्याचे उत्तम उद्धरण म्हणजे यूरोप खंडात आलेली कोरोनाची दुसरी लाट. मोठ्या प्रमाणात या परिसरात रुग्ण निर्माण झाले त्या ठिकाणी काही भागात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे.
गेल्या सात महिन्याच्या या काळातून प्रशासनासोबत नागरिकांनी धडा घेण्याची गरज आहे. या संसर्गजन्य साथीच्या आजारात नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, हे आता सगळ्यांना कळून चुकले आहे. या आजाराने अनेक नवीन गोष्टी सर्वांना शिकविल्या आहेत. त्याचा आधार घेत पुढील आयुष्यात त्याप्रमाणे बदल करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. राज्य आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालांनुसार, राज्यात मृत्युदर 2.63% इतका आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.39% इतके झाले आहे. आतपर्यंत राज्यात 43 हजार 463 रुग्णांचा मृत्यू झाला असून 14 लाख 78 हजार 496 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 1 लाख 31 हजार 544 रुग्ण राज्यातील विविध भागात उपचार घेत आहेत. तर राज्यात आतापर्यंत 16 लाख 54 हजार 28 रुग्ण या आजाराने बाधित झाले आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या अधिक होती. ही रुग्णसंख्या कमी करताना राज्यातील सर्वच यंत्रणांना खूप मोठी मेहनत घ्यावी लागली आहे.
यूरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे काही दिवसातच तेथील रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या बातम्या सर्वच ठिकाणी येत आहे. थंडीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे स्पेन, फ्रान्स आणि ब्रिटनमधील काही भागांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहेत. अनेक नियमित गोष्टींवर पहिल्या लॉकडाउन सारखेच निर्बंध लादण्यात आले आहे. नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
याप्रकरणी, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक सांगतात कि, "सध्या कोरोनच्या साथीच्या विरोधातील सगळ्या गोष्टी राज्याला अनुकूल आहेत. नागरिकांना बेड सहजतेने मिळत असले तरी आयसीयू बेडसाठी थोडी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्याकडे लोकांनी सजग राहणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्किंग आणि सॅनिटायझरचा वापर ह्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजे. सध्या सर्व गोष्टी व्यवस्थित सुरु आहेत. या सर्व गोष्टींचं श्रेय योग्य उपचारपद्धती, योग्य रुग्णांना योग्य प्रमाणात औषधे यांना जाते. मात्र, पाश्चिमात्य देशाचा अभ्यास केला तर काही दिवसापूर्वी तेथे रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. जनसामान्य जीवनमान पूर्वपदावर येऊन सर्व गोष्टी सुरु करण्यात आल्या होत्या, मात्र सध्याच्या घडीला तेथे मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसून आली आहे. त्यामुळे आपल्याकडे ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, हे डोक्यात ठेऊन सुरक्षिततेचे नियम पाळत राहणे हे कोरोनच्या लढाईच्या विरोधातील एकमेव शस्त्र नागरिकांच्या हातात आहे."
विशेष म्हणजे गेले दोन महिने कोरोनाच्या रुग्णांकरिता ऑक्सिजनचा वापर जो मोठ्या प्रमाणात होत होता त्याच्यामध्ये घट दिसून येत आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा ऑक्सिजन दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. २७ ऑक्टोबरच्या अहवालानुसार संपूर्ण राज्यात 517.64 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर करण्यात आला आहे. दोन महिन्यांच्या तुलनेत हा वापर कमी आहे , हा वापर त्यावेळी 770 ते 800 मेट्रिक टन असायचा. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या विभागात ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणावर व्हायचा, आता त्या भागातील वापर कमी झाला आहे.
शहरातील मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे सांगतात की, "रुग्णांची संख्या कमी झाली आहे, मृतांचा आकडा कमी होत आहे ह्या चांगल्याच गोष्टी आहेत. नागरिकांनी दैनंदिन कामे चालू केली आहेत. मात्र दिवाळीनंतर आपल्याकडे थंडी सुरु होणार आहे त्यावेळी आपल्याला लक्ष ठेवून राहावे लागणार आहे. जर परदेशातील स्थिती लक्षात घेतली तर त्या ठिकाणी थंडी सुरु झाली आणि रुग्णसंख्येत भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. योग्य ती दक्षता घेत आपला वावर ठेवला पाहिजे." ऑक्टोबर 7, ला 'धोका टळलेला नाही!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्येचा चढता आलेख उतरणीला लागला आहे. हे वास्तव असले तरी धोका मात्र अजिबात टळलेला नाही. कारण मागील काही काळातील आपण कोरोनाचे वर्तन बघितले तर लक्षात येते कि ज्या ज्या ठिकाणची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्या परिसरातील संख्या पुन्हा एकदा वाढीस लागली होती. त्यामुळे राज्यातील काही शहरात आणि जिल्ह्यात ही संख्या कमी होत असली तरी कधीही वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी रुग्णसंख्या कमी झाली असून सगळं काही आलबेल झालं आहे ह्या भ्रमात कदापीच न राहता अधिक सजग राहणे गरजेचे आहे नाहीतर गफलत होऊ शकते. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी अनेक रुग्ण असे आहेत कि त्यांना घरी जाऊन त्यांना वेगळ्या काही व्याधींना सामोरे जावे लागत असून वेळ प्रसंगी रुग्णालयात पुन्हा उपचाराकरिता दाखल करावे लागत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्यापासून सुरक्षित राहायचे असल्यास सध्याच्या घडीला एक उपाय आहे तो म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळणे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली आहे, ही दुसरी लाट आहे, कि आता पिक आहे हे शास्त्रीय आधारावर अजून कुणी सांगू शकलेले नाही, प्रत्येक जण आडाखे बांधत आहे. त्यामुळे कोरोना येत्या काळात कसा वागेल याचा थांगपत्ता कुणालाच नाही. अर्थव्यवस्था हळू हळू पूर्वपदावर येण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे त्याचा कुणीही गैरफायदा न घेता केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, कारण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.
साथरोग शास्त्रानुसार संसर्गजन्य आजारचा धोका तात्काळ संपत नाही, याबाबत अनेक वैद्यकीय तज्ञांनी मत व्यक्त केले आहे. त्यामुळे इतर परदेशातील देशाचा अभ्यास पाहता नागरिकांना सावधगिरीनेच पावले उचलावी लागणार आहे. अनेक गोष्टी सुरु केल्या जात आहे. त्या कायम तशाच सुरु राहाव्या असे वाटत असेल तर नागरिकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. आजच्या घडीला काही नागरिक बाहेर हिंडताना मास्क लावत नाही, कोट्यवधींचा दंड नागरिकांकडून वसूल केला जात आहे, आरोग्यदायी महाराष्ट्रासाठी हे लक्षण चांगले नाही. नागरिकांनी आपल्या रोजच्या जीवन शैलीत आमूलाग्र बदल केलेच पाहिजे ही काळाची गरज आहे.
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!