Blog : लाखमोलाचे शेअर्स!
अलीकडेच ICICI Direct ने त्यांच्या अधिकृत समाजमाध्यमावर एक यादी दिली होती ज्यामध्ये अशा पंधरा शेअर्सची नावे होती ज्यामध्ये गेल्या 3 वर्षात छप्परफाडून परतावा मिळाला आहे. त्यात सर्वात टॉपला Waaree Renewable Technologies हा शेअर आहे. या शेअरमध्ये जर तीन वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या गुंतवणुकीचे एकूण ९० लाख रुपये झाले असते! या शेअरचा आलेख काढून बघितला तर लक्षात येईल की जेमतेम १०-१५ रुपयांच्या आसपास असणारा शेअर आज ९०० रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे. साधारणपणे १९९९ साली स्थापन झालेली ही कंपनी अक्षय्य ऊर्जा आणि त्यापासून वीजनिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.
ज्यात यादीचा उल्लेख केला त्यात पंधराव्या क्रमांकावर Poonawalla Fincorp नावाची एक कंपनी आहे. डाटा नुसार त्यात जर तीन वर्षांपूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे जवळपास १६ लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या बाबतीत तर सामान्य माणूस ऐकून असेल कारण याच्याशी अदार पूनावाला यांचं नाव जोडलं गेलं आहे. पूनावाला यांच्या मालकीच्या सिरम इन्स्टिट्यूट ने कोरोंना रोखण्यासाठी उपायकारक ठरलेली covidshield ही लस तयार केली होती. साधारणपणे २०२१ च्या दरम्यान पूनावाला यांनी तत्कालीन Magma Fincorp ही NBFC टेकओवर करून त्याचं Poonawalla Fincorp असं नामकरण केलं होतं.
या यादीतील या दोन कंपन्यांची माहिती जाणीवपूर्वक दिली आहे. त्याचं कारण हेच की त्या कंपन्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्याकडे लक्षपूर्वक बघणे गरजेचं आहे. एखादा शेअर Multibagger बनत असताना मूलतः त्या कंपनीचा व्यवसाय त्या गतीने वाढत असतो किंवा तो व्यवसाय भविष्यवेधी असतो. ज्या १५ कंपन्यांची यादी दिली आहे त्यांचा व्यवसाय काय आहे हे बघणे आणि त्याचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. त्यातीलच KPIT Technology ही आपल्या पुण्यातील किर्तणे-पाटील यांची कंपनी. ही कंपनी सध्या EV Technology मध्ये काम करते. हे सर्व व्यवसाय हे भविष्यात टिकतील आणि वेगाने वाढतील असे व्यवसाय आहेत. आणि आपण जे शेअर्स खरेदी करतो ते ‘भविष्यासाठी’ आणि ‘भविष्यकडे बघून’ खरेदी करणे आवश्यक आहे. त्यात मग अशा एक-दोन नाही तर शेकड्याने कंपन्या सापडतील.
हे इतकं रंगवून सांगण्याची गरज अशासाठी भासली की नुकत्याच सामान्य गुंतवणूकदारांच्या काही बाबी निदर्शनास आल्या होत्या. त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड इत्यादिमधील गुंतवणूक काढून घेण्यास किंवा थांबवण्यास सुरुवात केली आहे. काही जणांनी तर SIP सुद्धा थांबवली आहे. त्यात काहीजणांची आर्थिक अडचण आहे त्यांची तडजोड समजण्यासारखी आहे पण काहीजणांनी ‘चांगला परतावा मिळत नाही’ किंवा ‘बाजारात काही जोर दिसत नाही’ असं म्हणून ही गुंतवणूक थांबवली आहे. त्यांच्यासाठी वरील यादी दिशादर्शक ठरू शकते.
शेअर बाजार हा संयमाचा खेळ आहे. जसं आपण जमिनीत बी पेरल्या-पेरल्या झाडाच्या सावलीची अपेक्षा करत नाही; थोडासा वेळ जाऊ देतो तसंच आपल्या गुंतवणुकीला वेळ देणे गरजेचे आहे. कोरोंनानंतर शेअर बाजारात पडझडही झाली आणि तितकीच तेजीही आली. पण गेल्या वर्षीपासून विविध आर्थिक संकटांमुळे जगभरातील शेअर बाजार ढेपाळले आहेत. अशा परिस्थितीत परतावा फार मिळत नसतो ही वास्तविकता मान्य करता आली पाहिजे. कधी-कधी ‘विसावा’ नावाचा प्रकार शेअर बाजारातही पाहायला मिळतो. आणि आर्थिक ओढाताण होत असताना Midcap आणि Smallcap क्षेत्रात तर अधिकच सुस्ती येते. पण थोडा वेळ दिला आणि चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक असेल तर नक्कीच चांगला परतावा मिळतो. आणि असंही नाही की स्वतः असे शेअर्स शोधून गुंतवणूक केली पाहिजे. ज्यांना हा प्रपंच नको असतो त्यांनी Mutual Funds ची वाट निवडावी. ज्या Midcap Smallcap क्षेत्रातील या कंपन्यांचे शेअर्स आहेत ती थीम असलेल्या Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकता. केवळ उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर Nippon India च्या Small Cap Fund मध्ये गेल्या तीन वर्षात उत्तम परतावा मिळालेला दिसून येईल.
एका बाजूला सकारात्मकता बघत असताना त्यातील दुसरी बाजुही, अर्थात जोखमीची, तपासली पाहिजे. जेंव्हा बाजारात चांगला परतावा देणारे स्टॉक्स असतात तेंव्हा Wealth Destructive Stocks सुद्धा असतात. त्यांची यादीही काही कमी नाही. अलीकडेच अदाणी प्रकरणात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे शेअर्स कोसळतानाही पाहिलं आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना काळजी सुद्धा तितकीच घेतली पाहिजे.
एकंदरीत सांगायचं झालं तर चांगले व्यवसाय शोधणं गरजेचं आहे. जे भविष्यात तग धरतील, वेगाने वाढतील आणि फलदायी ठरतील. ते शोधण्यासाठी अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल तपासावे लागतील आणि विश्लेषण करावं लागेल. आजकाल म्युच्युअल फण्ड्स चे पोर्टफोलियो पाहायला मिळतात तेही तपासू शकता. विविध सेबी नोंदणीकृत विश्लेषक वृत्तपत्र, न्यूज चॅनल किंवा समाजमाध्यमातून अशा शेअर्सबाबतील माहिती देत असतात. मार्ग अनेक आहेत.
जो माणूस तुमच्या-आमच्यासारखा सामान्य नाही, असामान्य कामगिरी करणारा आहे; ज्याच्यात अशक्यप्राय शक्य करण्याची क्षमता आहे त्याला आपण Superman म्हणत असतो. त्याचप्रमाणे हे शेअर्स आहेत, Superman Stocks, जे आपल्या पोर्टफोलिओला नफ्याच्या शिखरावर नेऊ शकतात आणि मजबूत परतावा मिळवून देऊ शकतात! आपआपल्या परीने त्यांचा शोध घेत राहणे आणि खराब बाजारातही न डगमगता आपल्या गुंतवणुकीवर टिकून राहणे, सातत्य ठेवणे हे सर्वसामान्य गुंतवणूकदाराचं लक्ष्य असलं पाहिजे!
(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही).