एक्स्प्लोर
BLOG | चिंटूसाब.. काळापुढचा कपूर!
ऋषी कपूर हा माणूसच वेगळा आहे. त्यांची आणि इऱफान यांची तुलना करणं वेडेपणाचं ठरेल.
मित्र म्हणाला, ऋषी कपूर गेले.
मी म्हणालो, हो ना यार. काल एक जखम झाली. तीच आज आणखी खोल झाली.
तो म्हणाला, लिही की आता काहीतरी.
मी म्हणालो, अरे इऱफानवर लिहिलं. म्हणजे जे आतून आलं ते लिहिलं. आता ऋषी कपूर जाण्यावरून वाटलं तर लिहीन. घाणा नाहीये माझ्याकडे. ते गेलेत आता लिहीच... असं होत नाही.
तो म्हणाला, अरे लिही तू. मोठा कलाकार होते चिंटू साब.
होतेच, मी.
किती सिनेमे केले त्यांनी. बॉबी, बोल राधा बोल, सरगम, प्रेमग्रंथ, चांदनी.. मस्त, इति तो.
मी गप्प झालो.
..
..
..
यालाही आता तीनेक तास झालेत.
..
..
खरंच मी लिहावं?
अधेमधे वाटतं, गप्पच बसावं.
..
ऋषी कपूर..
ऋ षी क पू र
..
चांदनी, प्रेमग्रंथ, बोल राधा बोल, सरगम, अजूबा.. भरपूर सिनेमे केले त्यांनी. सोबर, चांगला नायक होता. यापुढं काय?
.
..
हं..
माणूस म्हणून मोठाच आहे तो. मी कोण बोलणार त्यावर.
सिनेमाबद्दल म्हणाल तर.. ऋषी कपूर यांनी ते सिनेमे केले त्याचा आदर आहेच. पण मला त्यांचे सिनेमे तितके भिडले नव्हते. सिनेमाबद्दल माझी चव वेगळी आहे म्हणू.
तुम्हाला काय वाटतं?
म्हणजे, कोणताही कलाकार आपल्याला कशामुळं लक्षात राहतो? त्याने केलेल्या सिनेमांमुळे. म्हणजे त्याने केलेले चित्रपट आपल्यावर किती प्रभाव पाडतात किंवा सिनेमात त्याने रेखाटलेल्या भूमिका आपल्याला किती प्रभावित करतात त्यावर त्या कलाकाराचं महात्म्य आपल्या मनात आकाराला येतं.
इरफान मला भावला कारण त्याची अभिनयशैली. त्याच्या सिनेमांची निवड.. त्या सिनेमाचे विषय हे सगळं लाजवाब होतं. म्हणजे, माझ्या जगण्याजवळ नेणारं होतं. शिवाय, माणूस म्हणून त्याचा स्ट्रगल मला खूप आपला वाटतो. कारण माझ्या घरची स्थिती.. माझा संघर्ष हा मला त्याच्यातही दिसला. कारण आपण सगळे मध्यमवर्गीय..असो
इरफान हा आत्ताचा विषय नाही.
ऋषी कपूर हा माणूसच वेगळा आहे. त्यांची आणि इऱफान यांची तुलना करणं वेडेपणाचं ठरेल. पण मला एखादा कलाकार किती जवळचा वाटतो हे त्याने केलेल्या सिनेमातून मी ठरवणार. बरोबर ना?
या विचारापाशी येऊन मी थांबतो.
का थांबलो?
म्हणजे माझ्या लेखी ऋषी कपूर यांची पहिली 25 वर्षं ही 'तद्दन' प्रकारात मोडत होती. अर्थात त्यातही त्यांचं दिसणं, नाच-गाणंच मला दिसत राहिलं. माझ्या मनाचा ठाव त्यांनी पहिल्यांदा घेतला तो 2012 मध्ये. त्या चंदेरी भव्य पडद्यावर रौफलाला अवतरला आणि माझे डोळे विस्फारले. स्लो लर्नर मुलाचा बाप.. काळ्या दुनियेचा बादशाह.. रौफलाला. क्षणाक्षणाला बदलत जाणारे त्यांचे भाव.. शाह का रुतबा गाण्यात आपला स्लो लर्नर मुलगा तबला वाजवतोय म्हटल्यावर सुखावून गेलेला बाप.. त्यातून आनंदाने गाणं म्हणणारा बाप आणि त्याच गाण्यात आपल्या मोठ्या मुलाचं शव पाहणारा बाप.. वेगवेगळ्या परस्पर भिन्न शेडस त्यांनी लोकांच्या अंगावर लीलया उधळल्या. नव्या 'अग्निपथ'बद्दल मला फार बोलायचं नाही.पण या सिनेमाने रौफलाला जन्माला घातला. अमर केला. आणि त्या रूपानं ऋषी कपूर पहिल्यांदा बेमालून आत घुसले.. हक्कानं घुसले.
..
..
उफ...
कोणते ऋषी कपूर खरे?
डफलीवर बोटं नाचवणारे..
गिटार हाती उत्तम पकडणारे.. की
की हे मी पाहिलेले?
त्यानंतर मी दो दूनी चार पाहिला. तोही मला आवडला.
ऋषी कपूर यांना कलाकार म्हणून असं काय सापडलं होतं? की त्यांना हाताळणाऱ्या दिग्दर्शकाला त्यांच्यात असलेलं पोटेन्शिअस समजलं होतं? पण त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली आणि मी ऋषी कपूर यांचा फॅन झालो.
काय गंमत आहे पहा.. कमाल गाजलेल्या नटाची दुसरी इनिंग सुरू झाली आणि मग मला तो आवडू लागला. त्याच्या कामावर मी लक्ष ठेवू लागलो. आणि मग भात्यातून एकेक बाण काढावा तश्या त्यांच्या फिल्मस आल्या. डी डे, मुल्क, 102नॉट आऊट, कपूर एंड सन्स..
प्रोस्थेटिक मेकअप करून हा इसम कॅमेऱ्यासमोर उतरला. ही सगळी कामं त्यांनी झपाटून केली. म्हणजे, परीक्षेचा पेपर सुटायची वेळ जवळ आल्यावर अडलेल्या प्रश्नांची उत्तरं सापडावीत आणि ते प्रश्न घाईघाईने अत्यंत विश्वासाने सोडवायला घ्यावेत तसं झालं असावं त्यांचं असं मला वाटतं.
अभिनय आणि त्याचं अवकाश कपूर साहेबांना उशीरा उमगलं की यापूर्वी त्यांच्यावर असलेल्या स्वेटरखानी छापाने त्यांनी आपल्यातून बाहेर येऊ दिलं नाही, कोण जाणे.
असो.
या दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ मोजक्या काही सिनेमांनी ऋषी कपूर यांना मोठं केलं होतं. तब्बल 25 वर्षांपेक्षा जास्त काळ चॉकलेट हिरो म्हणून बिरूद मिरवलेल्या या उमद्या अस्सल कलाकाराला त्यांच्या दुसऱ्या इनिंगमधल्या काही सिनेमांनी चॉकलेटपासून चतुरस्र बनवलं होतं.
आणि तेच मोजके सिनेमे मला त्यांच्याशी कनेक्ट करतात.. कायमचे. त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांना मोठं बनवतात.
म्हणजे.. आता कसं सांगावं..
जेव्हा, पडद्यावर एंग्री यंग मॅन हिरो होता. त्याला लार्जन दॅन लाईफ दाखवायचा प्रयत्न होत होता, तेव्हा ऋषी कपूर चंदेरी दुनियेतला साधी राहणी असलेला नायक वाटत होते. म्हणजे ढोबळ मानाने असं म्हणू की, जिथे नायक शर्टची पहिली दोन बटणं एटिट्यूड ठेवून उघडी ठेवायचे तिथे हा नायक स्वेटर घालून गाणी म्हणायचा. आणि आता जेव्हा ते दुसऱ्या इनिंगमध्ये आले तेव्हा ते सामान्य घरातली सामान्य वावरणारी असामान्य व्यक्ती म्हणून सिनेमात दिसू लागले.. भूमिका वठवू लागले. कोणताही अविर्भाव न मिरवता. सहज.. सोपी अभिनय शैली.
येतंय का लक्षात?
फार गोंधळ होतोय. डोक्यात.
मोठा माणूस होते.. कपूर साब.
इरफान गेल्या गेल्या लगेच यांचं जाणं.. विमनस्क बनवतं.
मला कळतंय की इरफान आणि कपूर साहेबांचं जाणं धक्कादायक आहे. पण त्यांचा एकमेकांशी तसा काहीच संबंध नाही. नट म्हणून दोघांची आपआपली जातकुळी वेगवेगळी आहे.
पण एक गोष्ट दोघांना लागू होती..
दोघांनी आपआपल्या हातात बॅट घेतली होती.
येईल तो बॉल हाणायचा हे त्यांनी हेरलं होतं.
त्यांच्यासाठी सिनेमे बनू लागले होते... आणि काळानं घाव घातला.
..
इरफान गेल्यावर मनावर चरा उमटला आहे.
कपूर साहेब गेल्याचं कळल्यावर हूरहूर वाटते आहे.
..
..
ऋषी कपूर जाण्याकडे मी कसं पाहातो?
मला वाटतं, अभिरूची, अभिव्यक्ती आणि अभिनय जपणारा हा माणूस होता. आपल्या मताशी प्रामाणिक असलेला. मतं धीटाईने मांडणारा.. आणि मतांवरच्या मतभेदांनाही अंगावर घेणारा.
त्यांची दुसरी इनिंग पाहून वाटतं, आपणही एकंदर प्रवास करत असताना मध्येच थोडं थांबायला हवं का?
आपल्या कामाकडे..
काम करायच्या पद्धतीकडे पुन्हा एकदा पाहायला हवं का?
कदाचित त्यातून थोडे विलग होऊ शकलो तर तेच काम आणखी सकस आणि जिवंत बनवता येऊ शकतं.
ऋषी कपूर साहेबांनी तेच केलं असेल.
पहिली इनिंग झाल्यावर दुसरी इनिंग सुरू करताना मध्ये जी गॅप असेल.. त्यात ते काही गप्प बसले नसणार.. आता त्यांचं नशीब की ते कपूर घराण्यात जन्मले. त्यामुळे विचार करायला त्यांनी काही वर्षं घेतली असतील.
आपलं तसं नाही हो. इतका वेळ कुणी देणारं नाही आपल्याला. पण, वर्षं नाहीत तर नाहीत.
काही महिने..??
काही दिवस?
...
..
आपण करत असलेल्या कामाकडे जरा नव्याने पाहून बघूया असं मला वाटू लागलं आहे.
चिंटूसाहेबांसारखं!
सौमित्र पोटे यांचे अन्य ब्लॉग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement