गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्याने अवयव प्रत्यारोपण या वैद्यकीय उपचारात उत्तुंग भरारी घेतली आहे. काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य राज्यात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत मक्तेदारी होती असं म्हटलं तर हरकत नाही. आपल्या राज्यातील अनेक रुग्णांना प्रत्यारोपणासाठी तामिळनाडू राज्यातील शहारत जावे लागत असायचे. मात्र, कालातंराने महाराष्ट्रात सर्व मुख्य अवयवांचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ लागल्या. मेंदूमृत अवयव दानाबाबत बऱ्यापैकी जनजागृती निर्माण झाली आहे. त्याचेच बक्षीस म्हणून गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्याला अवयवदानातील उत्कृष्ट राज्याचा पुरस्कार केंद्र सरकारतर्फे देण्यांत आला होता. त्यातच आणखी एक गोष्ट मुंबईच्या परळ येथील एक खासगी रुग्णलयात घडली ती म्हणजे 'हाताचे प्रत्यारोपण' शस्त्रक्रिया करण्यात आली.

राज्यातील अशाप्रकारची दोन्ही हाताचे यशस्वी प्रत्यारोपण करण्याची पहिलीच वेळ असून यापूर्वी अशा प्रकारचे देशातील पहिले हाताचे प्रत्यारोपण केरळ येथील एका रुग्णालयात पार पडले होते. या शस्त्रक्रियेमुळे ज्या व्यक्तीचे हात अपघातात गमावले आहेत त्या व्यक्तीसाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या काळात देशातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या अवतीभोवती फिरत असताना या काळात अतिशय गुंतागुंतीची कठीण शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्यामुळे त्याचे सर्वच स्तरारून कौतुक करण्यात येत आहे. आपल्या राज्यात अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ असून असा स्वरूपाच्या फारच कमी शस्त्रक्रिया पूर्ण भारतात झाल्या आहेत. त्यामुळे या शस्त्रक्रियेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आपल्या राज्यात डोळे, किडनी, यकृत, स्वादुपिंड, हृदय, फ्फुफुस, गर्भाशय या अवयवांचे प्रत्यारोपण होत आहे, त्यात आता हाताचे प्रत्यारोपण होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई मध्ये अजून दोन लोकांनी अशाच पद्धतीने 'हात' मिळावेत म्हणून विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (मुंबई ) यांच्याकडे नावे नोंदवून ठेवली आहेत. त्या दोन व्यक्तीचे नावे प्रतीक्षायादीवर आहेत. येत्या काळात अशा पद्धतीचे प्रत्यारोपणास मागणी होण्याची शक्यता नाकारत येत नाही. आतापर्यंत आपल्याकडे हात प्रत्यारोपणाला 'प्रोस्थेसिस' हा पर्याय उपलब्ध आहे. यापूर्वी अशाच पद्धतीची शस्त्रक्रिया पुणे येथील रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती पण त्यावेळी हवे तसे यश प्राप्त झाले नव्हते.

वैद्यकीय तज्ञांच्या मते हाताचे प्रत्यारोपण ही खूपच अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. हात बसवल्यानंतर काही दिवसांनी रुग्ण हातांच्या हालचाली सहजपणे करू शकतो. याशिवाय या रुग्णांना मोठ्या काळासाठी औषधं घ्यावी लागतात. ती औषधं तात्काळ बंद करतात येत नाही. खासगी रुग्णालयात हात प्रत्यारोपणाचा खर्च लाखोंच्या घरात असल्यानं सर्वसामान्यांना परवडण्याजोगा नसतो. त्यामुळे अनेक रुग्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपासून दूर राहतात. हाताचे प्रत्यारोपणही करता येऊ शकते हे फारच कमी लोकांना माहिती आहे. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना वाटतं की, हात दान केलं तर मृत रुग्णाचं शरीर कसं दिसेल. मात्र, हात काढल्यानंतर त्याजागी कृत्रिम हात बसवले जातात हे लोकांना ठाऊक नाही. त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. जेणेकरून मेंदूमृत अवयव दानामध्ये रुग्णाचे हातही दान केले जातील.

2014 साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया करण्यात शुक्रवारी उशिरापर्यंत करण्यात आली. याकरिता 32 वर्षीय एका मेंदूमृत व्यक्तीकडून हे हात मिळाले असून ते चेन्नईवरून येथे आणण्यात आले आहे. दोन वर्षांपासून मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला हात मिळावेत म्हणून नाव प्रतीक्षा यादीत टाकून ठेवले होते. तो पर्यंत तिला 'प्रोस्थेसिस लावण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया परळ येथील ग्लोबल रुग्णलयात पार पडली असून त्याकरिता 15 तासांचा अवधी लागला असून 11 डॉक्टरांचा यामध्ये सहभाग होता. डॉ. निलेश सातभाई यांनी ह्या संपूर्ण शस्त्रक्रियांचे नेतृत्व केले असून मायक्रोव्हयस्कुलर, ऑर्थोपेडिकस, प्लास्टिक सर्जन आणि ऍनेस्थेसिस्ट या विविध विषयातील तज्ञांचा या टीम मध्ये समावेश होता. तिच्या दोन्ही हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली असून काही दिवस तिला अजून अतिदक्षता विभागात ठेवण्यात येणार आहे. अशा रुग्णांना कुठल्याही पद्धतीचा संसर्ग होणार नाही याची हॉस्पिटल व्यवस्थापन काळजी घेत असते.

"डॉक्टरांनी सांगितले आहे की शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली आहे. गेली अनेक दिवस माझ्या बहिणीचे स्वप्न होतं तिला हात मिळावेत ते खऱ्या अर्थाने आज साकार झाले आहे. आम्ही सगळे आनंदी आहेत. आता आम्ही वाट बघतोय की ती अतिदक्षता विभागातून कधी बाहेर येईल. माझी बहीण लॉकडाउन व्हायच्या अधिपर्यंत एक खासगी रुग्णलायत सुपरवायझर म्हणून काम करीत होती. लॉकडाउनच्या काळात तिने काम थांबविले होते." असे कार्तिक मोरे याने सांगितले. कार्तिक, मोनिका यांचा लहान भाऊ असून तो एम डी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या शेवटच्या वर्षाला आहे.

आपल्या देशात आणि राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अवयव प्रत्यारोपण केले जाते. कालांतराने या कायद्यात अधिक बदल करून 2014 साली काही सुधारणा करण्यात आल्या. 2019 साली सुमारे 160 मेंदूमृत अवयवदान पार पडले होते, त्यामुळे 445 पेक्षा अधिक रुग्णांना नवीन जीवन मिळाले होते. जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. राज्याचे देशपातळीवर कौतुक करण्यात आले होते. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता जास्त असतानाच नेमका या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अख्या देशात झाला आणि या सामाजिक मोहिमेला एक प्रकारची खीळ बसली. मेंदूमृत अवयवदानामुळे अनेकांना नवीन आयुष्य मिळण्यास मदत होत असते. मार्च ते जुलै या महिन्यात केवळ 22 अवयदान राज्यात पार पडले होते, गेल्यावर्षीच्या तुलनेनं हा आकडा खूपच कमी आहे. 2020 सालात, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जे काही मेंदूमृत अवयवदान झालेत त्यामधून 86 रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले होते. त्यानंतर कोरोनाचा काळ सुरु झाला. त्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यात जे काही मेंदूमृत अवयवदान झालेत त्यामधून 21 रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहेत. यावरून या काळात मेंदूमृत अवयवदान किती झाले आहेत याची प्रचिती येते. ही माहिती राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेकडून प्राप्त झाली आहे, राज्यातील अवयवदान आणि त्या संदर्भातील सर्व गोष्टीवर देखरेख ठेवणारी म्ह्णून संस्था काम करत असते.

कोरोनाच्या काळात हात प्रत्यारोपण सारख्या अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. याबाबत डॉक्टरांचे कौतुक केलेच पाहिजे. ह्या शस्त्रक्रियेमुळे अनेकांच्या आयुष्यात नवीन उमेद निर्माण केली आहेत. आपल्या राज्यात अनेक लोकांचे हात अपघातात गमावलेले आहेत. अनेकांना माहित नाही की अशा स्वरूपाचे प्रत्यारोपण करता येते. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेकरिता येणारा खर्च खूप आहे आणि मेंदूमृत अवयव दान प्रक्रियेत लवकर कुटुंबीय हात दान करायाला तयार होत नाही. हात प्रत्यारोपणाबाबत समाजात जागरूकता खूप कमी आहे. अवयवदानाबाबत प्रचार केला जातो आहे. मात्र, हाताच्या प्रत्यारोपणाबाबत लोकांना माहितीचं नाही. त्यामुळे शासकीय संस्थांबरोबर यापुढे सामाजिक संस्थांनी हात दानाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग