गेले अनेक दिवस पुण्यातील कोरोनाचे आकडे हे झपाट्याने वाढत असल्याचे सगळ्यांनीच पाहिले होते, कितीतरी दिवस पुण्याने या आकड्यांबाबत मुंबईला मागे टाकले होते. त्याचीच गंभीर दखल घेऊन शासनाने तेथे जंबो फॅसिलिटी रुग्णालयाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात नुकतेच पुणे शहरात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणामध्ये (रक्तद्रव सर्वेक्षण) सुमारे ५१.५० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज (रोगप्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी) विकसित झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे निम्म्या पुणेकरांना कोरोना होऊन गेला असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. त्यामुळे लगेच पुणेकरांचा हर्ड इम्युनिटी (समूह रोगप्रतिकार शक्ती) कडे प्रवास सुरु झाल्याचे बोलणे उचित होणार नाही. देशात आणि राज्यात अनेक शहरात अशा पद्धतीचे सिरो सर्वेक्षणाचे आयोजन अनेक ठिकाणी केले आहे मात्र कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांनी देशात कुठेही आजतागायत ठामपणे हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे असे सांगितलेले नाही कारण तशी परिस्थितीच अजून निर्माण झालेली नाही. त्यामुळे ह्या सर्वेचा अर्थ अजूनही संसर्गाचे प्रमाण वाढतच आहेच आणि त्यामुळे सर्वानी सुरक्षिततेचे नियम पाळून आपला वावर ठेवला पाहिजे इतकाच काय तो काढला पाहिजे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाल्या आहे याचा अंदाज घेण्यांसाठी निवडक पाच प्रभागामध्ये सिरो सर्वेक्षण २० जुलै ते पाच ऑगस्ट या कालाधीत करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी कसबा पेठ-सोमवार पेठ, रास्तापेठ-रविवार पेठ, लोहियानगर-काशेवाडी, येरवडा आणि नवीपेठ-पर्वती प्रभागाची निवड केली होती. या प्रभागातील विविध ठिकाणच्या १६६४ नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्याच्यामध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज आहे हे तज्ञांनी तपासून पहिले असून त्यांना हे प्रमाण ३६.१ टक्के ते ६५.४ टक्क्यांपर्यंत विविध प्रभागात आढळून आले. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या निवास्थान राहण्याऱ्या व्यक्तींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. अर्थात घनदाट वस्तीमधील नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणातील नोंदीची सरासरी काढली तर ५१.५० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खरं तर हा प्रातिनिधिक स्वरूपाचा सर्वे आहे हे सर्वानीच ध्यानात घेतले पाहिजे. हे सर्वेक्षण करण्याकरिता नामंकित संस्थांनी पुढाकार घेतला असून त्यामध्ये भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल स्वास्थ्य आणि तंत्रज्ञान संस्था आणि वेल्लोर येथील खिश्चन वैद्यकीय महाविद्यालय या संस्थांमधील तज्ञांचा समावेश होता.
याप्रकरणी राज्याचे वैद्यकीय सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, " या सर्वेक्षणातून पुणेकरांनी हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे असा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. याउलट संसर्गाचे प्रमाण वाढतच आहे हे डोक्यात ठेऊन शासनाने सुरक्षिततेचे जे काही नियम आखून दिले आहे ते कशाप्रकारे पाळले जातील याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आज जर पुण्यातील रस्त्यांवर पहिले तर काही नागरिक असे आहेत ते कोणतेही नियम पळत नाहीत. परिणामी त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे . या अशा सर्वेक्षणातून आपल्याला फक्त या आजराचा कल कळतो. त्याचप्रमाणे आता गणपतीचा उत्सव येत आहे या काळात पुणेकरांच्या सोबत महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. या सर्वेक्षणातून संसर्गाचे प्रमाण व्यवस्तिथ असून त्याचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे."
समाजात कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉजिटीव्ह येते त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झालाअसल्याची शक्यता नाकारता येत नाही, किंवा त्याला तो आजार होऊनही गेला असल्याचे कळत नाही.
"पहिली गोष्ट म्हणजे ह्या सर्वेक्षण करण्याकरिता जो नागरिकांचा आकडा (डेटा) घेण्यात आला आहे तो फार छोटा आहे. तसेच ज्या भागात हा सर्वे करण्यात आला आहे त्याभागामध्ये मुळातच रुग्णाचे प्रमाण जास्त होते. उलट हे सर्वे करण्यापेक्षा ज्या भागात रुग्णाचे प्रमाण जास्त त्या भागातील सर्व लोकांची चाचणी केली पाहिजे. त्यामुळे किती नागरिकांना हा आजार हे आपल्याला लक्षात येईल. या सर्वेवरून पुणेकरांमध्ये हर्ड इम्युनिटी आली आहे हा अर्थ काढणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच यावरून असाही अर्थ काढता येऊ शकतो कि या परिसरात बरेच रुग्ण हे लक्षणविरहित आहे. ही एक भीती असून या भागातील जास्त जास्त लोकांनी चाचण्या करून घ्यायला पाहिजे. यावरून या भागातील लोकांनी चाचण्या करून घेतलेल्या नव्हत्या. तसेच अशाच प्रकारे पुण्यात ज्या ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी चाचण्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे." असे मत पुणे येथील डॉ अविनाश भोंडवे यांनी मांडले. डॉ भोंडवे हे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष आहेत.
अशाच प्रकारचा प्रयोग मे महिन्याच्या सुरुवातील संपूर्ण देशात करण्यात आला होता. नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी (इम्युनोग्लोबीन) एलिसा चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडीज शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी किट तयार करण्यात आले होते, त्यांच्या साहाय्याने करण्यात आली होती. याकरिता केंद्राने २१ राज्यातील ६९ जिल्ह्याची निवड केली होती. मात्र नागरिकांमध्ये फारसा रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले नव्हते. हे सर्वेक्षण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्र यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. संसर्गाच्या संपर्कात असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण समजून घेण्यासाठी, देखरेखीसाठी अँटीबॉडीज चाचणी महत्त्वपूर्ण ठरत असते.
राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे सांगतात की, " मुंबई शहरांमध्ये ज्या पद्धतीने सर्वेक्षण होते थोड्य फार फरकाने पुण्याचे सर्वेक्षणाचे आकडेही तेच दर्शवित आहेत. ज्या ठिकाणी घनदाट वस्ती आहे त्या ठिकाणी अधिक लोकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्या आहेत. शिवाय पुण्यात मध्यमवर्गीय वस्तीमध्ये नागरिकांमध्ये काही प्रमाणात अँटीबॉडीज दिसत आहेत. यामुळे एक अर्थ काढता येऊ शकतो तो म्हणजे एवढ्या लोकांना अँटीबॉडीज दिसत असतील तर संसर्ग प्रसाराचा वेग मंदावू शकतो. यापलीकडे या सर्वेक्षणाचा अर्थ घेऊ नये."
अशाच पद्धतीचे काही आणखी सर्वेक्षण पुणे आणि परिसरात केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या या काळात गेली अनेक दिवस आपण विविध वैद्यकीय तज्ञांकडून हर्ड इम्युनिटी हा शब्द ऐकत आहोत. त्याचा नेमका अर्थ काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हर्ड या शब्दाला सर्वसाधारण मराठी अर्थ कळप असा आहे, आणि इम्युनिटी शब्दाला रोगप्रतिकारक शक्ती असे म्हणतात. कळपातील किंवा समूहातील रोगप्रतिकारक शक्ती असा शब्द प्रयोग सर्वसाधारणपणे वापरला जातो. वैद्यकीय शास्त्रानुसार, जेव्हा नागरिकांमध्ये सुरु असलेल्या एखाद्या साथीच्या आजारा विरोधात मोठ्या प्रमाणात प्रतीकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्यावेळी त्या आजाराचा संसर्ग झाला तरी फारसा कळून येत नाही. आता हे मोठे प्रमाण म्हणजे ७०-७५% इतके असू शकते. त्यामुळे अशा पद्धतीची एखाद्या आजाराच्या विरोधात हर्ड इम्युनिटी तयार होत असेल तर ते दिलासादायक चित्र असल्याचे मानण्यास हरकत नाही. सध्या देशभरात आपल्याकडे जे लस बनविण्याचे काम सुरु आहे त्याचा हेतू तोच आहे, ती लस शरीरात टोचल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीच्या शरीरात त्या आजाराच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होत असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला तो आजार होण्याची शक्यता कमी असते किंवा होत नाही.
"मुळात ह्या सर्वेक्षणासाठी ज्या ठीकिणाची निवड करण्यात आली आहे ती ठिकाणं पहिलीपासून कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे निष्कर्ष येऊ शकतात. माझ्या मते ज्या संस्थांनी हा सर्वे केला आहे त्यांनी परत एक किंवा किंवा दोन महिन्यांनी त्याच लोकांचे परत रक्तद्रव घेऊन पुन्हा एकदा तपासणी केली पाहिजे कि त्या नागरिकांच्या शरीरात ह्या अँटीबॉडीज किती काळ टिकत आहेत. कारण आज पर्यंत कुठल्याच संस्थेने शरीरात किती काळ अँटीबॉडीज टिकतात याचा अभ्यास केलेला नाही यानिमित्ताने तो अभ्यास पण होऊन जाईल. सध्या जो सर्वे केला आहे त्यामधील सर्वेक्षणाचा आकडा फार लहान आहे. अशा पद्धतीचे सर्वे मोठ्या संख्येने केले जावे अशी अपेक्षा आहे. हर्ड इम्युनिटी येण्याकरिता मोठा आकडा अपेक्षित असतो ती परिस्थिती सध्या दिसत नाही. " असे डॉ स्वप्नील कुलकर्णी याना वाटते, ते सध्या श्वसनविकारतज्ञ म्ह्णून पुणे येथील के इ एम रुग्णालयात कार्यरत आहेत.
या सर्वेक्षणातून पुणेकरांनी अधिक सजग राहावे असे सर्वच वैद्यकीय तज्ञ मत व्यक्त करीत आहे. तसेच राज्यातील सर्वच नागरिकांनी कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता दक्ष राहण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील संपूर्ण लॉकडाउन हटविण्याची घाई करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्य सरकार टप्प्या-टप्प्याने शिथिलता आणत आहेत. ते सावध पद्धतीने पावले उचलीत आहे, याचा अर्थ नागरिकांनी सुद्धा सावधानतेनेच वागले पाहिजे.