ज्या पद्धतीने कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्याप्रमाणे रुग्णांमध्ये कोरोनाचं वेगवेगळ रूप वैद्यकीय तज्ञांसमोर येत आहे. डॉक्टरही नवनवीन आव्हानाचा सामना करत रुग्णांवर उपचार करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून काही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डायबेटिसचं (मधुमेह) लक्षणीय प्रमाण आढळून आले आहे. विशेष म्हणजे या कुणालाही अगोदर डायबेटिस नव्हता. कोविडच्या प्रादुर्भावाने रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची सर्वसाधारण गोष्टी जाणून घेण्याकरिता रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये काही तरुणांमध्येही डायबेटिस असल्याचे आढळून आले आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते डायबेटिस जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव शरीरात आहे तोपर्यंत राहतो. एकदा का रुग्ण बरा झाला कि डायबेटिस नियंत्रित झाल्याचे आढळून आले आहे. मात्र काही रुग्णांना डायबेटिस नियंत्रित ठेवण्याकरिता कोरोना बरा झाल्यानंतर सुद्धा औषधाची गरज भासत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे असं का होतंय?हा प्रश्न वैद्यकीय तज्ञांना पडला असून त्याची उत्तर शोधण्याचं काम सुरु आहे, यावर लवकरच शोधनिबंध सादर करण्यात येणार असल्याचेही तज्ञांनी सूचित केले आहे.


डायबेटिस या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही. तसेच शरीरातील तयार झालेल्या इन्सुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. त्यामुळे साखरेची पातळी अनियंत्रित होते. डायबेटिसच्या या रुग्णांमधे लघवीस वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तसेच तोंडाने घ्यावयाची औषधे, किंवा काही रुग्णांमध्ये दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे, सध्या तरी हे उपाय प्रचलित आहे.

याप्रकरणी राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी, एंडोक्रिओनॉलॉजिस्ट (अंतःस्रावी तज्ञ) सांगतात की, "आपण काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे की कोरोनाचा ज्यावेळी रुग्णांना प्रादुर्भाव होता त्यावेळी कोविड -19 चे विषाणू हे रुग्णाच्या काही महत्वपूर्ण अवयवांवर हल्ला करतात त्यापैकी फुफ्फुस, हृदय आणि स्वादुपिंड हे असल्याचं काही दिवसाच्या अभ्यासावरून लक्षात आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना ज्यांना डायबेटिस पूर्वी नव्हता त्यांच्यामध्ये पण डायबेटिस नियंत्रित नसल्याचे आढळून आले आहे. त्या दरम्यान त्यांना डायबेटिस नियंत्रित करण्यासाठी काही गोळ्या दिल्या जातात. कोरोना बरा होण्याबरोबर काही लोकांचा डायबेटिसचा आजार ही जातो. मात्र काही लोकांना डायबेटिस नियंत्रित करण्याकरिता एक गोळी चालू ठेवावी लागत आहे. प्रामुख्याने कोरोनाच्या संसर्गाने स्वादुपिंडाला इजा झाल्याने इन्सुलिन तयार करण्याच्या शरीरातील क्रियेला अडथळा निर्माण होतो त्यामुळे रुग्णांमध्ये साखरेची पातळी अनियंत्रित होते."

डॉ जोशी पुढे असेही सांगतात की, "हे काही सर्वच रुग्णांमध्ये होत नाही. पण ज्या काही रुग्णांमध्ये दिसत आहे त्याच्यावर इलाज केला जात आहे.कोरोनाबाधित काही रुग्णांमध्ये हा डायबेटिस वाढीचा ट्रेंड का दिसतोय यावर सर्वच वैद्यकीय तज्ञांमध्ये विचार विनिमय सुरु आहे, आम्ही लवकरच यावर एक शोधनिबंध सादर करणार आहोत."

कोरोनाच्या आगमनानंतर खरं तर सातत्याने चर्चा होत आहे की ज्या नागरिकांना आधीपासूनच कोमोरबीडीटी म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हृदयरोग आणि किडनीचे विकार आहेत अशा व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये विशेष करून वरिष्ठ नागरिकांचा आणि ज्यामध्ये आधीपासून काही जटिल व्याधी होत्या त्यांचा मुख्यत्वे समावेश आहे.

डॉ हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय, सांगतात की, "सध्याची कोरोनाची जी काही रुग्ण आहेत त्यामध्ये निरीक्षानाअंती असं दिसून आले आहे कि ज्यांना स्थूलत्व आहे आहे अशा कोरोबाधित रुग्णांमध्ये डायबेटिसचं प्रमाण वाढून आलेलं आहे. मात्र एकदा कोरोनाचे उपचार पूर्ण झाले की रुग्णाचा डायबेटिस नियंत्रित होत आहे. कारण कोरोनामध्ये स्वादुपिंडावर हे विषाणू हल्ला करतात त्यामुळे स्वादुपिंडाच्या कार्यात बिघाड निर्माण होतो त्यामुळे साखरेची पातळी वर -खाली होत असते. मात्र सध्या तरी आम्ही ही निरीक्षणं नोंदवून ठेवत आहोत. भविष्यात या सांगायला माहितीचा उपयोग करून यावर नक्कीच संशोधन केले जाईल."

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल तयार करत आहे. या विभागाने 27 जून रोजी जाहीर केलेल्याला अहवालानुसार, ज्या 4 हजार 144 कोरोनाबाधित मृतांचा आकडा घेऊन विश्लेषण केले आहे. त्यामध्ये 2 हजार 898 नागरिकांचे मृत्यू झाले आहेत, म्हणजे 70% त्या लोकामंध्ये अगोदर पासून काही तरी जटिल व्याधी असल्याचे दिसून आले आहे.

बुलढाणा येथील डायबेटोलॉजिस्ट डॉ विनायक हिंगणे सांगतात की, "यामध्ये दोन- तीन मुद्द्यांचा विचार केला गेला पाहिजे. कुठल्याही आजारात संसर्ग झाला की साखरेची पातळी वर-खाली होत असते. त्याला काही कारण आहेत त्यापैकी आजारामध्ये बहुतेकांचं स्ट्रेस हॉर्मोन वाढतात, शिवाय आजारामध्ये स्टिरॉइड औषध म्हणून दिली जातात या दोन्ही बाबी एकत्र झाल्यामुळे साखर अनियंत्रित होऊ शकते. कारण या काळात शाररिक हालचाली कमी होतात, तसेच बंदच्या काळात, प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्याच्या नादात लोकांचं खाण्यावर नियंत्रण राहिलेले नाही. या सगळ्या गोष्टीचा एकत्रितपणे परिणाम थेट साखर पातळीवर होतो. तसेच माझ्याकडे स्वतःकडे कोरोनाबाधित रुग्ण नाहीत पण, जो काही प्रतिसाद-प्रतिक्रिया लोकांडाकडून समजत आहे त्यामध्ये दिसून आली कि कोरोनाबाधित लोकांमध्ये डायबेटिसचं प्रमाण वाढलेलं आहे. ते त्या आजारापुरतं राहतं आणि आजार बरा झाला की निघून साखर नियंत्रित होते."

नागरिकांनी हा आजाराचं होऊ नये या करीत सुरक्षिततेचे नियम पाळून वावर ठेवला पाहिजे. कोरोनामय काळात जर मधुमेह झाला तर डॉक्टर त्यावर उपाय करून तो नियंत्रित ण्यात त्यांना यश मिळत आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखं कारण नाही. हा डायबेटिस केवळ कोरोनाचा संसर्ग शरीरात आहे तोपर्यंत असतो. एकदा का हा आजार बारा झाला तर तोही बरा होत असल्याचे निरक्षणातून दिसत आहे. तूर्तास तरी या सर्व निरीक्षणाचा अभ्यास केला जाईल आणि त्यावर शोधनिबंध सादर केला जाईल. यामुळे यापुढे सर्व नागरिकांनी संतुलित आहार आणि व्यायाम यावर भर दिला पाहिजे, हे सांगण्याची गरज नाही.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग