>> संतोष आंधळे


कोरोनाकाळ कधी संपणार याचं उत्तर सध्या भारतात कुणाकडेच नाही, 'उम्मीद पर ही दुनिया कायम है' प्रमाणे सगळेजण आशा करत आहेत की लवकरच या आजाराचा शेवट होईल आणि पुन्हा सगळे पूर्ववत होईल. मात्र तसे घडायच्या आधी ज्या काही संभ्रमात किंवा चक्रव्यूहात नागरिक अडकले आहेत त्यातून बराच गोंधळ उडत आहे. ज्यावेळी या आजाराची निदान करायची एक चाचणी होती, त्याच्या आज विविध प्रकाच्या आणखी तीन चाचण्या आल्या आहेत. एक लस निघणे अवघड असताना आता तीन देशातील तीन कंपन्यांनी आपली 'लस' शेवटच्या टप्प्यात असल्याचे दावे केले आहे. औषधाच्या बाबतीत रेमेडिसिवीर आणि टॉसिलिजुमॅब या औषधासाठी नागरिकांची धावपळ आजही सुरूच आहे, रक्तद्रव ( प्लाझ्मा थेरपी) उपचारासाठी तेच सुरु आहे. बेड मिळण्याच्या बाबतीतील प्रश्न थोड्याफार प्रमाणात निकालात निघाला आहे. अजूनही, म्हणजे चार महिन्यानंतर कुणा व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यावर त्या रुग्णाची आणि त्याच्या नातेवाईकाची जी काही त्रेधातिरपीट होते ते पाहता हा सगळा प्रकार अवघडच आहे.


चार महिन्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर भारतात एकूण 9 लाख 68 हजार 876 रुग्णसंख्या झाली असून सध्या इतके 3 लाख 31 हजार 346 रुग्ण उपचार घेत आहेत तर 24 हजार 915 नागरिक या आजाराने मृत पावले आहेत. महाराष्ट्रात 2 लाख 75 हजार 640  रुग्णसंख्या झाली असून सध्या इतके 1 लाख 12 हजार 099 रुग्ण उपचार घेत आहेत तर 10 हजार 928 नागरिक या आजाराने मृत पावले आहेत, सध्या अशी परिस्थिती आहे. दिवसागणिक संपूर्ण देशात रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा खंबीरपणे या सगळ्या संकटात पाय रोवून उभी राहिली असून रोज रुग्णांना उपचार करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहे त्याचेच फलित म्हणजे संपूर्ण देशातून 6 लाख 12 हजार 814 रुग्ण आजच्या घडीला उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. या सगळ्या प्रकारात राज्यात, एकूण रुग्णसंख्येपैकी सगळ्यात जास्त 31 ते 40 वयोगटातील 54 हजार 106 रुग्ण या आजाराने बाधित झाले आहे. खरं तर हा आजार फक्त लहान मुले, वयस्कर नागरिक आणि गर्भवती महिलांना जास्त होतो हा समाज या आकडेवारीने फोल ठरविला आहे. सगळ्यात जास्त तरुण या आजाराने बाधित झाल्याचे झाल्याचे चित्र आहे.
देशात महाराष्ट्रात सर्व जास्त रुग्णसंख्या आहे. या सगळ्या आजाराला पायबंद घालण्यासाठी शासन आणि प्रश्न विविध उपाययोजना आखत आहे. मात्र अजूनही म्हणावे तसे यश प्राप्त झाल्याचे दिसत नाही. त्यामुळेच तर राज्याच्या काही भागात आज काही दिवसांसाठी टाळेबंदी करण्यात आली आहे.


सध्या कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी केली जात होती. त्याच्यामध्ये रुग्णांचा स्वाब घेतला जातो आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करून निदान करतात. मात्र ह्या चाचणीचा निकाल येईपर्यन्त २४-२८ तासाचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी व्हावा याकरिता अँटिजेन टेस्ट’ वापरली जाणार आहे. त्याच्यामध्येही रुग्णांचा स्वाब घेतला जातो. या नव्या टेस्ट किटमुळे अवघ्या तासाच्या आत कोरोनाचे निदान होणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि एम्सने कोरोना चाचणीसाठी अँटिजेन किटच्या वापरला परवानगी दिली आहे. या चाचणीत जर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्यास, त्या व्यक्तीची आरटी-पीसीआर टेस्ट होणार नाही. मात्र, जर या टेस्टमध्ये एखादी व्यक्ती कोरोना निगेटिव्ह असेल, तर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. यापलीकडे जाऊन भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही चाचणी रक्ताचे नमुने घेऊन करता येते. कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉजिटीव्ह येते, त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


सध्याच्या या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात काही घटना घडल्या त्या इतक्या किळसवाण्या होत्या की माणुसकीला काळिमा फासणाऱ्या होत्या. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रक्तद्रव ( प्लाझ्मा थेरपी) ही उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. डॉक्टरांची मते व निरीक्षणावरून ‘प्लाझ्मा थेरपी’ कोविड -१ रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी(डोनेशन) मोहीम सुरू केली आहे.प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे.काही निवडक रुग्णालयात ही उपचार पद्धती करण्यात येते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत. प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविड मधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांना कडून घेतले जाऊ शकतात. सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध युक्त्या देखील वापरत आहेत.डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्री संदर्भात फसवणूक होऊ शकते. त्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईलच. तथापि सर्व संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरूक रहावे. प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधतांना काळजी घ्यावी.नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे. जर या संदर्भात काही फसवणूक होत असेल तर कृपया आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनला कळवा, असे आवाहन करण्याची वेळ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आली आहे.


काही रुग्णांमध्ये रेमेडिसिवीर औषध वापरून बघितल्यानंतर त्याचा उपयोग झाला आहे. ह्या औषधाचा काळाबाजार करताना काही जणांना ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे.नातेवाईक आपला रुग्ण वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा गैर फायदा समाजातील काही लोकं घेताना दिसत आहेत. टॉसिलिजुमॅब या औषधाच्या बाबतीतही हेच घडताना दिसत आहे . खरे पाहता हे औषध केवळ गंभीर रुग्णांना देणे अपेक्षित आहे. मात्र काही दिवसांपासून या औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे त्यामुळे काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहे.


कोरोनाचं आगमन झाल्यानंतर महिन्याभरातच जगभरातील औषधनिर्मात्या विविध कंपन्यांनी औषध आणि लस काढण्याचे दावे केले आहे. त्यात भारतातील एक भारत बायोटेक ही कंपनी आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने या भारत बायोटेक कंपनी सोबत करार केला असून त्यांच्या या 'कोव्हॅक्स' या लसीच्या मानवी चाचण्याला परवानगी दिली आहे. या हैद्राबाद स्थित कंपनीने ही लस पुणे येथील राष्टीय विषाणूविज्ञान संस्थेबरोबर संयुक्तपणे विकसित केली आहे. तसेच जगभरात प्रथम अमेरिकेतल्या माॅडर्ना कंपनीने लस बनवून मानवी चाचण्या करण्यास सुरुवात केली असून त्याआता अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. तर रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने सुद्धा करोना आजारावर लस बनविल्याच्या बातम्या सगळीकडे आल्या आहेत.


एकंदर भारतात आणि भारताबाहेर कोरोनाची अशी परिस्थिती आहे. जगाच्या पाठीवर कोरोना आजाराच्या संदर्भातील क्रमवारीत भारताचा तिसरा क्रमांक आहे. आपल्याकडे अनेक विविध गोष्टीचा वापर कोरोनाला पायबंद घालण्यासाठी केला जात आहे. अजून येत्या काळात कीती गोष्टी येतील ह्या येणाऱ्या काळातच कळू शकतील. भारतातील नामांकित कंपनी कोरोनाच्या समूळ उच्चटणासाठी प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे दिवसागणिक कोरोनाच्या लक्षणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाकाळात नागरिक हैराण झाले असून 'कोरोना' च्या अवतीभवती फिरणाऱ्या उपचारपद्धती संपता संपताना दिसत नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग