राज्यात कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून मुंबई शहर हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. सगळ्या देशाचे लक्ष मुंबईच्या 'तब्येतीकडे' होते. काही दिवसापासून थोड्या फार प्रमाणात का होईना मुंबईच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसायला सुरुवात झाली आहे. मात्र या हॉटस्पॉटची जागा आता बदलली असून मुंबई नजीकच्या पुणे जिल्ह्यात कोरोनाने तांडव करण्यास सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसापासून पुण्यातील रुग्ण संख्या वाढण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. पुणे शहरआणि जिल्हा ज्या पद्धतीने बदलत गेला, त्या पद्धतीने तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मात्र जैसे थे आहे. काही खासगी रुग्णालये सोडली तर शासनाने किंवा महापालिकेने फार क्रांतिकारक बदल आरोग्य व्यवस्थेत केलेले दिसत नाहीत. खरं तर पुण्याला साथीचे आजार नवीन नव्हे, मात्र तरीही यावेळच्या संसर्गजन्य आजाराने या जिल्ह्याला अधिकच छळले आहे.अनेक साथीच्या आजाराचे केंद्र सुरुवातीपासून पुणेच राहिले आहे. इतिहास कालीन प्लेग, स्वाईन फ्लू आणि आता कोरोना या आजाराची सुरूवात पुण्यातूनच झाली आहे. विशेष म्हणजे सध्या संपूर्ण देशात जो साथरोग नियंत्रण कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. त्याची निर्मितीच मुळात 1896-97 च्या पुण्यातील महाभयंकर प्लेगच्या साथी नंतर करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला कोरोनाने प्रशासन व्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे केले.


काही दिवसापूर्वी पुण्यात लॉकडाऊन करून झाले आहे. काही अटी शिथिल करून पुन्हा पुणे हळू-हळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली तरी वाढत्या रुग्णसंख्येनं नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तर टेस्टिंगचं प्रमाण जास्त असल्याने रुग्णसंख्या दिसत असल्याचे काही वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत. पुण्यातील रुग्णसंख्या 'उणे' करण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याची गरज असून त्याकरिता वेगाने निर्णय घेऊन तो तात्काळ अंमलात आणण्याची गरज आहे. पुणे शहरातील साथीच्या आजाराच्या रुग्ण संख्येचा आकडा पाहता महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलवर कायमच अन्याय होतोय असेच कायम वाटत राहते. हे रुग्णालय तसं म्हणायला गेलं तर दुर्लक्षित राहिलं आहे. गेल्या शतकापेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या या रुग्णालयावर साथीच्या आजारात मोठा ताण येत आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. सध्या रुग्णसंख्येचा मोठा भार हा शासनाचे ससून रुग्णालय घेत आहे. गेल्या काही दिवसापासून रुग्णांना बेड्सची चणचण भासत होती. मात्र साथीच्या आजारचा दांडगा अनुभव असलेल्याला पुण्यात आरोग्य व्यस्थेशी निगडित मोठे बदल अपेक्षित असताना फार काही झालेलं दिसत नाही. पुणे शहराची संख्या झपाटयाने वाढत आहे. आय टी क्षेत्रातील वाढलेल्या कंपन्या त्यांचे कामगार आणि देशभरातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी येतच आहे. पुण्याचे भौगौलिक आकारमान वाढले आहे, त्या तुलनेने येथील सुविधा वाढायला हव्यात. सध्या आहे त्या व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. पुणे शहराबरोबर पिंपरी - चिंचवड भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे


"हे खरंय संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र त्याचवेळी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की टेस्टिंगचे प्रमाणही त्याच पटीने वाढले आहे. पूर्वी फक्त प्रचलित आर टी - पी सी आर चाचणी, कोविड-19 च्या निदानाकरिता करण्यात येत होती. आता अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. त्यात विशेष म्हणजे जर एकंदर परिस्थिती बघितली तर 3-4 टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे आहेत. चार महिन्यापेक्षा जास्त या आजाराच्या रुग्णांवर मी उपचार करीत आहोत. रुग्ण जर वेळेत रुग्णालयात आला तर बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. माझं एक मत आहे लोकांनी आजार होऊन घाबरण्यापेक्षा हा आजार होऊ नये म्हणून जे सुरक्षिततेचे नियम आहे त्याला घाबरून ते व्यवस्थित पाळले पाहिजे, म्हणजे आपोआपच या आजाराचा प्रादुर्भाव थांबायला मदत होईल." असे, डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात. ते सध्या पुणे येथील के इ एम रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.


राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 592 रुग्ण राज्यात विविध भागात उपचार घेत आहेत. त्यापैकी 48 हजार 672 रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे या घडीला संपूर्ण राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या याच जिल्ह्यात जास्त आहे. या जिल्ह्यातील एकूण 78 हजार 130 रुग्णांपैकी 27 हजार 620 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर 1 हजार 838 नागरिकांचा या संसर्गजन्य आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे सांगतात की, "पुण्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णसंख्या जास्त दिसत आहे. रुग्णांवर येथे व्यवस्थित उपचार केले जात आहे. बेडची संख्या वाढावी म्हणून प्रशासनातर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या संस्थेसोबत येथील संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या असून या आजाराला आळा घालण्याकरिता आम्ही त्याचसोबत काम करणार आहोत. प्रशासन, डॉक्टर त्यांचं काम करत आहेत. मात्र नागरिकांचं काय ? त्यांनी सुद्धा त्यांची कर्तव्य पार पाडली पाहिजे. अनेक लोक पुण्यात सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून हिंडत असतात. अनके कोरोनाबाधित लोकांना वाटतंय एकदा कोरोना होऊन गेला आहे, म्हणजे आता आपल्याला कोरोना होणार नाही असा फाजील आतमविश्वास बाळगत फिरत असतात. मात्र त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. लोकांनी शिस्त पाळलीच पाहिजे."


सोमवारी पुणे जिल्ह्यातील संभाव्य रुग्ण वाढ लक्षात घेऊन शासनाने तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच कोरोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.


साथीचे आजार हे यापूर्वी पण आले होते, आज आहेत आणि या पुढेही येतच राहणार आहेत, हे डोक्यात ठेवून राज्यातील एकूणच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत साथीच्या आजारासाठी स्वत्रंत रुग्णालये निर्माण करण्याची गरज आहे. कारण खासगी रुग्णालयाचे दर सर्व सामान्य नागरिकांना परवडतीलच असे नाही. त्यामुळे राज्याचा एकूण उत्पन्नाच्या महत्तवपूर्ण खर्चाचा हिस्सा हा आरोग्य व्यवस्थेवर करणे काळजी गरज आहे. यापुढे आरोग्य व्यस्थेला गृहीत धरून चालणार नाही हे या कोरोनाच्या सध्याच्या संकटाने आपल्याला शिकविले आहेत त्यातून बोध घेऊन गाफील न राहता सुधारणा केल्या नाहीतर भविष्यत मोठ्या धोक्यांना सामोरे जाण्याची शक्यात नाकारता येत नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग