चार महिन्यापेक्षा जास्त लोटलेल्या या कोरोनाच्या काळात रुग्णसंख्येच्या आणि मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत एक गोष्टीत सातत्य आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्येत सगळ्यात जास्त रुग्ण पुरुष आणि ज्यांना सह-आजार (रुग्णास कोरोना होण्याच्या आधीपासून काही व्याधी असतात) आहेत अशाच दोन वर्गवारीतील व्यक्तीचा आकडा सर्वात जास्त आहे. तसेच या संसर्गजन्य आजराने एकूण मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही पुरुषांचाच आणि ज्यांना सह-आजार आहे, त्यांचा आकडा सर्वाधिक आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव या दोन वर्गातील नागरिकांना जास्त असल्याचे चित्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून जाहीर होते. ज्यांना कोरोनासोबत सह-आजार आहेत, त्यांच्याबाबतीत पहिल्या दिवसापासून वैद्यकीय तज्ञांनी भीती व्यक्त करून अशा व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असे सूचित केले होते. मात्र पुरुषांनाच कोरोनाची लागण जास्त प्रमाणात का होते आणि मृताचे प्रमाणही त्यांचामध्येच अधिक असण्यामागचे कारण अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.


कोरोनाची वक्रदृष्टी पुरुषांवर अधिक असण्याचे शास्त्रीय कारण आजपर्यंत कुणीही शोधून काढलेलं नाही. मात्र, ढोबळ मानाने दोन-तीन कारणं जी पुढे येत आहे, ती अशा प्रकारची आहेत की, महिलांची रोगप्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा चांगली असते. तसेच पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण फार कमी आहे. शिवाय या काळात महिला जास्त घराबाहेर पडल्या नाहीत, ज्या तुलनेने पुरुष बाहेर पडलेत. त्या स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेत असतात, थेट रुग्णालयात त्या जात नसल्या तरी काहींना काही घरगुती उपचार ते करत असतात. मात्र, हा 'ट्रेंड' जगभरात असाच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुरुषांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे. पुरुषांनी उगाचच आम्हाला काहीही होत नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगणे आता तरी बंद केले पाहिजे.


राज्य शासनाच्या मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे सांगतात की, " जगभभरात अशाच पद्धतीचे चित्र आहे की, महिला आणि पुरुषांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याची संख्या ही महिलांपेक्षा मोठ्या संख्येने अधिक आहे. याला विशेष असे कारण नाही की ज्याला शास्त्रीय आधार आहे. साधारणतः महिलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, असे म्हटले जाते. कारण त्यांना फारशा पुरुषांसारख्या व्यसनाच्या सवयी नसतात. या विषयवार सध्या तरी कुणी अभ्यास केलेला नाही, परंतु जी कोरोनाबाधितांची आकडेवारी उपलब्ध आहे त्यावरून तरी हेच निदर्शनास येत आहे."


वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातर्फे दररोज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येविषयी विश्लेषणात्मक अहवाल सादर केला जातो. 17 जुलैच्या अहवालानुसार कोरोनाबाधित महिला आणि पुरुषांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण रुग्णाची आकडेवारी 2,74,758 इतकी आहे. त्यापैकी 1,68,626 पुरुष रुग्ण असून त्यांची टक्केवारी 61 इतकी आहे. तर 1,06,132 रुग्ण महिला असून त्याची टक्केवारी 39 इतकी आहे. तसेच राज्यात एकूण मृत्यू 4,484 झाले असून त्यापैकी 2,901 पुरुष मृत्यू पावले असून त्याची टक्केवारी 65 इतकी आहे, तर 1,583 महिला मृत्यू पावल्या असून त्याची टक्केवारी 35 इतकी आहे. त्याचप्रमाणे, विशेष म्हणजे राज्यात 70 टक्के मृत्यू ज्याचे झाले आहेत. त्यांना सह-आजार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.


"जर तुम्ही सातव्या-आठव्या महिन्यात जन्मलेली बाळ बघितली जी पूर्ण नऊ महिने पूर्ण करण्याआधीच जन्माला येतात. त्यामध्ये मुलगी असेल तर मुलाच्या तुलनेने जगण्याची तिची शक्यता अधिक असते. महिला जेनेटिकली पुरुषांपेक्षा अधिक कणखर असतात आणि महिला जास्त काळजी घेतात. त्यामुळे असे चित्र दिसत असावे." असे स्त्रीरोग तज्ञ डॉ नीता वर्टी सांगतात, गेली तीन महिने वरळी येथे उभारलेल्या कोविड फिल्ड हॉस्पिटलमध्ये त्या काम करत आहेत.

सुरुवातीच्या काळात हा आजार फक्त लहान मुले, वयस्कर नागरिक आणि गर्भवती महिलांना जास्त होतो हा समज या आकडेवारीने फोल ठरविला आहे. याउलट, जमेची बाजू म्हणजे या काळात कोरोनाचा संसर्ग सगळ्यात कमी लहान मुलामध्ये झाला आहे. खरं सांगायचं यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरु आहे. मात्र, हे वास्तव आहे की लहान मुलांमध्ये कोरोनामुळे बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे आणि संसर्ग होण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र याचं नेमकं असं शास्त्रीय कारण सांगणं सध्याचा घडीला सांगणे अवघड आहे. विषेश म्हणजे या वयोगटात मृत्यू होण्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. वयोगटातील रुग्णसंख्येच्या तुलनेत तरुणामध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.


गेली 30 वर्षांपासून धारावीत रुग्णांना सेवा देणारे आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, सांगतात की, "ज्या व्यक्तीमध्ये सह-आजार असतात जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, यकृत आणि स्वादुपिंडाचे आजार, अस्थमा, हृदयशी संबंधित आजार हे आणि असेच जुनाट आजार असणाऱ्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता इतर ज्यांना सह-आजार नाही यांच्या तुलनेत होण्याची शकयता जास्त असते. त्यामुळे सुरवातीपासूनच अशा लोकांनी काळजी घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहे, सगळे डॉक्टर सांगत आहे.


या सर्व आकडयांची पाहणी केली तर ज्यांना सह-आजार आहे त्यांनी तर काळजी घेतली पाहिजे. मात्र पुरुष मंडळींनी या सर्व प्रकारातून धडा घेतला पाहिजे. सर्वत्र पुरुषार्थ गाजविण्यापेक्षा स्वतःच्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरुष आणि महिलांना दोघांसाठीही, घराच्या बाहेर पडताना आरोग्य विभागाने आखून दिलेल्या सर्व सुरक्षिततेच्या नियमाचे पालन केले पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग