>> संतोष आंधळे


देशभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातलं असून केवळ शासन, प्रशासन आणि कोविडयोद्धे यांनी कोरोना विरोधातील लढाई लढून चालणार नाही. या वैश्विक महामारीला आळा घालायचा असेल तर लोकसहभाग फार महत्तवाचा आहे, नागरिकांनी आता कोरोनाविरोधी लोकचळवळ उभी करायची गरज आहे. ही चळवळ करत असताना मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करणे अपेक्षित असून वाड्या-वस्त्यांवर, गाव-शिवारात, गृहनिर्माण संकुलात, चाळ -कमिट्यांनी या संसर्गजन्य आजाराविरोधात आता आवाज पुकारण्याची हीच ती वेळ. आपला देश गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोनाविरोधात लढा लढत आहे, तर, राज्यातील व्यवस्था गेली पाच महिने दिवस-रात्र काम करत आहे. सरकारी आणि आरोग्य व्यवस्थेवर दिवसागणिक ताण वाढतच आहे. त्या व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी कोणते उपाय आखता येतील हेच या चवळीचे उद्दिष्ट ठेवून काम करत पुढे जावे लागणार आहे. लोकांनी लोकांसाठी उभी करण्याची गरज असलेल्या या कोरोनाविरोधी चळवळीला बळ प्राप्त होण्यासाठी सकारात्मक संवादाची झालर असणे क्रमप्राप्त आहे.


काही दिवसापासून कोरोना बाधिताच्या आणि मृताच्या आकड्यांनी नागरिकांच्या डोक्याचा 'बोऱ्या' झालाय. कुठेही कुणाशी संवाद साधला तर तिकडेही आकड्याचा खेळ चालू असतो. मात्र आकड्याची उचल-मांड केल्याशिवाय साथीच्या आजाराचा ठाव-ठिकाणा लागणे मुश्किल आहे, शास्त्रात आकड्यांना महत्त्व आहे. त्या आकड्यांच्या आधारवर अनेक आरोग्य व्यवस्थापनाशी निगडित धोरणं आखली जातात त्याचा महत्त्वपूर्ण उपयोग हा जनतेच्या रोजच्या जीवनाशी निगडित असतो. अनेक ठिकाणी कोरोना काळात नकरात्मकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मानशास्त्रानुसार प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाची टक्केवारी कमी झाली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याच-त्याच वातावरणात राहिल्यामुळे तरुणांसोबत विशेष करून वरिष्ठ नागरिकांची प्रचंड चीड-चीड होत आहे. सगळ्या गोष्टी झुगारून बाहेर जाण्याचे मन करत आहे, मात्र या कृतीमुळे गंभीर धोके संभवतात. त्यामुळे अशा वातावरणात मन प्रफुल्लित कसं ठेवता येईल याकडे ओढा असणे अपेक्षित आहे. यासाठी ढोबळ मानाने घरगुती उपाय म्हणजे योग, प्राणायाम, सकारत्मक वाचनाची आवड, संतुलित आहार आणि व्यायाम या गोष्टी करणे शक्य आहे. या गोष्टी लहान असल्या तरी अशा उपायामधून समाधान मिळण्याची शक्यता अधिक आहे. सध्याच्या कोरोना काळातील लोक चळवळीत अशा लहान गोष्टी समाविष्ट करून लढा अविरतपणे सुरु ठेवला पाहिजे.


आजही राज्यातील काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याच्या आजूबाजूचे काही अतिशहाणे नागरिक त्यांना तुच्छतेची वागणूक देतानाच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणी करण्यास मज्जाव केला जात आहे, काही घटनांमध्ये तर त्यांच्यावर त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. रक्षणकर्त्या पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात आहे त्यांच्याशी सुरक्षिततेच्या नियमांवरून हुज्जत घातली जात आहे. या महाभयंकर आजाराच्या संकटाच्या काळात या आजारासाठी उपयोगी पडणाऱ्या औषधांचा काळाबाजार केला जात आहे. खासगी आरोग्य व्यवस्थेतील काही महाभाग परिस्थितीचा फायदा उचलताना दिसत आहेत. रुग्णवाहिकेचे दर अव्वाच्या सव्वा लावले जात आहेत. या सर्व घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. त्या तात्काळ थांबल्या पाहिजेत. येथे नमूद केलेल्या बऱ्यापैकी घटना नागरिकांना सहज टाळणे शक्य आहे. या वरील घटनांमुळे पोलीस आणि आरोग्य व्यवस्थेवर विनाकारण ताण येत आहे. नागरिक व्यवस्थेचा ताण हलका करण्यात काही अंशी या त्यांना मदत तर नक्कीच करू शकतात.


त्यामुळे कोरोना विरोधातील लोक चळवळ म्हणजे काय हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या जवळच्या परिसरातील एखाद्या व्यक्तीस आजाराची कोणती लक्षणं असतील तर त्याच्या कुटुंबियांना किंवा त्या रुग्णाला सोशल डिस्टनसिंगचे पालन करून त्यांना नजीकच्या दवाखान्यात जाण्यास उद्युक्त करणे. कारण या आजारावर सुरुवातीच्या काळातच उपचार करणे फायदेशीर ठरल्याचे आतापर्यंतच्या परिस्थितीवरून दिसून आले आहे. कारण अनेक जण लक्षणं लपवून घरीच अंगावर दुखणं काढतात, आणि जेव्हा ते गंभीर होतात तेव्हा धावपळ करण्यास सुरवात करतात. त्यामुळे बराच रुग्ण बरा करता येऊ शकत असलेला 'गोल्डन पिरियड' कालावधी निघून गेलेला असतो. आतापर्यंत जे रुग्ण दगावलेत त्यामध्ये शेवटच्या क्षणी जे गंभीर रुग्ण आलेत त्यांची संख्या बऱ्यापैकी आहे, वैद्यकीय तज्ञांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे कुठेही आजाराची लक्षणे असलेला रुग्ण आढळला तर तात्काळ जमल्यास आरोग्य सेवेशी त्यांचा संपर्क करून द्यावा कींवा त्या संदर्भात मार्गदर्शन करावे, त्यामुळे मृत्यू दर रोखण्यास मदत होऊ शकते.


त्याचप्रमणे या आजारावरील माहितीची शास्त्रशुद्ध पद्धतीने जनजागृती करणे फार गरजेचे आहे. कारण सध्याच्या काळात सामाजिक माध्यमांवर या आजाराला घेऊन अनेक चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराबद्दल गैरसमज निर्माण होत आहे. तसेच काही गोष्टीबद्दल अनाठायी भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे ती योग्य माहिती नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहचविली जाऊ शकते याचा विचार करून ती जन सामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. या गोष्टी या चळवळीच्या माध्यमातून उभ्या करणं सहज शक्य आहे. आज आधुनिक तंत्राचा वापर करून योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहचविणे सहज शक्य आहे.


विशेष म्हणजे ही चळवळ सुरु करण्यासाठी कोणत्या विशिष्ट नेतृत्वाची गरज नसून प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून या चळवळीस सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक छोट्या गोष्टी सांगण्यासाठी प्रशासनाची गरज लागत कामा नये. कारण सध्याची जी कोरोनाविरोधात जी लढाई सुरु आहे ती या देशातील आणि राज्यातील नागरिक आरोग्यसंपन्न, निरोगी आणि या आजारांपासून सुरक्षित राहावे म्हणूनच सुरु आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेची काळजी स्वतः घेतली पाहिजे. नागरिकांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्याबरोबर आपल्या आजूबाजूचे लोकं कसे सुरक्षित राहतील याची दक्षता घेणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील आजारी कुटुंबाविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी आरोग्य यंत्रणेला माहिती देऊन योग्य ती मदत करणे आता सध्याच्या परिस्थितील गरज बनली आहे. प्रत्येकाने आपल्याला जशी जमेल तसं या चळवळीसाठी सहकार्य केले पाहिजे. आजही अनेक जण साधे शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने आखून दिलेले नियम पाळत नाहीत. त्याकरिता पोलिसांना नागरिकांना वारंवार नियम दाखवावे लागत आहे. ह्या सगळ्या गोष्टी सहज टाळता येण्यासारख्या आहेत. शासनाने नियम हे नागरिकांच्या हिताकरिता केले आहेत हे आधी आपण जाणून घेतले पाहिजे. जगभरात ह्याच नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे आपल्याकडे वेगळे असे काही नियम केलेले नाहीत.


नागरिकांनी स्वतःला शिस्त लावून घेण्याचा हा काळ आहे आणि वस्तूस्थिती सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. आपण पूर्वी जसे राहत होतो तसे वागणे निश्चितच आपण या काळात तसेच ठेवणे योग्य राहणार नाही. बदल ही काळाची गरज आहे असे मानून नागरिकांनी आपले वर्तन ठेवणे अपेक्षित आहे. कोरोनाचा काळ कधी संपेल हे सध्याच्या घडीला कोणीच तज्ञ सांगू शकत नाही. मात्र आहे त्या परिस्थितीत कसे वागावे यावर अनेक वैद्यकीय तज्ञांनी नियमावली आखून दिली आहे. त्याचा वापर करीत दैनंदिन आयुष्य रोजचे व्यवहार सुरळीत करण्याची गरज आहे. या कोरोनाचा वैद्यकीय शेवट सांगणे म्हणजे कोरोनाची साथ संपली आता एकही रुग्ण सापडणार नाही असा होतो, मात्र असा दिवस लवकर येणे मुश्किल आहे. त्यामुळे उपलब्ध स्थितीत प्रत्येक नागरिकाने कोरोना मुक्त राहण्या सोबत कोणताही आजार होणार नाही असे तंदुरुस्त राहिले पाहिजे. आपल्या देशातील परिस्थिती सुधारवायची असेल तर नागरिकांनी ही मोहीम आता हाती घेणे गरजेचे आहे. या सकारात्मक मोहिमेमुळे निश्चित चांगला बदल झाल्याशिवाय राहणार नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग