हॉंगकॉंग येथे एका कोरोना झालेल्या व्यक्तीला जो पूर्ण बरा होऊन घरी गेला. त्याला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. महत्वाचे, त्या व्यक्तीच्या आधीच्या कोरोनाचा विषाणू (व्हायरस) आणि आता ज्यामुळे आता कोरोना झाला आहे, त्या विषाणूंमध्ये फरक आढळून आला आहे. त्यामुळे तेथील शास्त्रज्ञांनी या व्यक्तीला कोरोनाचा पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जगातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे म्हटले जात आहे.


त्यामुळे आता मला कोरोना होऊन गेलाय, आता या आजाराविरुद्ध लढणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती पेशी (अँटीबॉडीज ) शरीरात निर्माण झाल्या आहेत. आता आपल्याला काही पुन्हा कोरोना होणार नाही. या भ्रमात असाल तर नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे. कोरोना मुक्त व्यक्तींनीही शासनाने आखून दिलेले सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला वावर ठेवला पाहिजे. मात्र राज्यात आणि मुंबईत सध्या तरी असे कोणतेही प्रकरण आढळले नसल्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचे दोन प्रकार असू शकतात. त्यामध्ये एक म्हणजे ज्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला आहे आणि पुन्हा कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आहे. त्या व्यक्तीच्या नमुन्यात ज्या आधीच्याच विषाणू पासून कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकीच एखादा जुना विषाणू शरीरात कुठेतरी आतड्यांमध्ये राहिला असेल आणि त्याने पुन्हा डोकं वर काढले असेल तर त्या संसर्गाला जुना संसर्ग उफाळून येणे (रीअॅक्टिव्हेशन) असे म्हणतात, याच्या आणखी काही शक्यता असू शकतात. तर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाला असे म्हणायचे असेल तर त्याला अगोदर झालेल्या कोरोनाचा विषाणू आणि आता पुन्हा चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतरचा विषाणू वेगळा असणे अपेक्षित आहे म्हणजेच त्या विषाणूत काही जनुकीय बदल आढळून आले असतील तर त्या व्यक्तीला पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाले आहे असे म्हणतात. मात्र हे माहित होण्याकरिता त्या व्यक्तीच्या नमुण्याचा विशेष तपास करणे गरजेचे असते. त्यास विषाणूचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) असे म्हणतात. या तपासात विषाणूचे जनुकीय बदल पाहिले जातात.

"दुसऱ्यांदा कोरोना होण्याचे प्रकरण अत्यंत्य दुर्मिळ असे आहे. त्यामुळे तो गंभीर आहे किंवा नाही हे सांगणे कठीण आहे. आपल्याकडे आजपर्यंत असा कोणताही रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे यामध्ये दोन तीन शक्यता वर्तविण्यात येऊ शकतात. पहिली शक्यता ती अशी कि, दुसऱ्यांदा चाचणी पॉझिटिव्ह येत असेल तर जुन्याच विषाणूचे मृत अवशेष त्या चाचणीमध्ये आढळले जाऊ शकतात. दुसरं म्हणजे जुनाच संसर्ग पुन्हा झाला आहे किंवा एखादा विषाणू कुठे सुप्त अवस्थेत आतडयामध्ये असेल तो पुन्हा डोकं वर काढू शकतो. त्यामुळे विशेष असे घाबरण्याचं अजिबात कारण नाही. यासाठी पुन्हा एकदा सिटी स्कॅन करून बघणे जर काही फुफ्फुसांवर बदल दिसत असतील तर त्या प्रमाणे उपचार करणे. त्यामुळे एखादा जुना संसर्ग होणे याला फार तर रीऍक्टिव्हेशन म्हणू शकता मात्र रीइन्फेक्शन त्याला म्हणता येणार नाही. जर त्या गोष्टीच्या आणखी खोलात जायचे असतील तर जीनोम सिक्वेन्सिंग सारखे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत." असे डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात, डॉ कुलकर्णी हे पुणे येथील के इ एम रुग्णालयात श्वसनविकार तज्ञ आहेत.

हॉंगकॉंग मधील 33 वर्षाच्या व्यक्तीला पुन्हा कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. ज्यावेळी साडे चार महिन्यापूर्वी पहिल्यांदा त्या व्यक्तीला कोरोना झाला होता. तेव्हा त्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे होती. मात्र दुसऱ्यावेळी त्याची जेव्हा स्पेनवरून परत आल्यावर तपासणी करण्यात आली तेव्हा त्याची चाचणी सकारात्मक आली. मात्र त्यावेळी त्याला कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नव्हती. तेथील शास्त्रज्ञांनी जेव्हा त्याच्या विविध चाचण्या केल्या तेव्हा त्यामध्ये विषाणूची उपजाती (पहिल्यापेक्षा आताच्या विषाणूत बदल ) आढळून आल्याचे दिसले आहे. या रुग्णामुळे जगात दुसऱ्यावेळा कोरोना होत असल्याची ही पहिलीच केस आहे असे सांगण्यात येत आहे.

राज्य विशेष कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी एबीपी माझा ऑनलाईनशी बोलताना सांगतिले कि, "कोरोना बरे झालेल्या रुग्णाची चाचणी पॉजिटीव्ह येण्याचे एखाद  दुसरे उदाहरण दिसत आहे. या विषयवार आमच्या काही तज्ञ लोकांची चर्चाही झाली आहे. या सर्व बदलांवर बारकाईने नजर ठेवून आहोत. या रुग्णाचे जीनोम सिक्वेन्सिंग करून कोणते बदल आढळतात ते पाहणे गरजेचे आहे. एखाद्यावेळी जुना विषाणू त्या व्यक्तीच्या आतड्यांमध्ये अडकून राहिलेला असू शकतो आणि कालांतराने त्याचा त्याला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी तपासणे गरजेचे आहे."

या सगळ्या प्रकारामुळे ज्या व्यक्तींना कोरोना होऊन गेला आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती (अँटीबॉडीज ) निर्माण झाली आहे. त्यामुळे खरे तर ह्या आजाराचा पुन्हा संसर्ग होणार नाही याचं संरक्षण त्यांना मिळत असते. मात्र हॉंगकॉंगच्या या प्रकरणामुळे आता शरीरात किती काळापर्यंत रोगप्रतिकारक शक्ती (अँटीबॉडीज ) टिकू शकतात हे मोजण्याबाबत अजूनही आपल्याकडे कोणताही अभ्यास झालेला नाही. परंतु तो अभ्यास करणे गरजेचं आहे या अशा उदाहरणावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे समजा भविष्यात एखादी लस आली तर त्यामुळे किती प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती (अँटीबॉडीज ) निर्माण होते आणि किती काळ टिकून राहते, याचा शोध येत्या काळात घ्यावा लागणार आहे.

मुंबईच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे यांच्या मते कोरोना हा संसर्गजन्य आजार आणि त्यास कारणीभूत ठरणारा विषाणू सगळ्यांसाठीच नवीन आहे. ते पुढे सांगतात कि, सुरवातीलाच या विषाणूच्या काही 11 उपजाती असल्याचे म्हटले होते. ज्या काही पुन्हा कोरोनाच्या चाचण्या पॉजिटीव्ह असल्याच्या केसेस आढळून येत आहेत. त्या एक तर एखाद दुसरी अशीच आहे, त्यावरून आता पुन्हा कोरोना होतो हा निष्कर्ष काढणे कठीण आहे. मला वाटत नाही आपल्याकडे काही केसेस असतील, जर एखाद दुसरी संशयास्पद केस असेल तर त्या रुग्णाच्या नमुन्यांचं जीनोम सिक्वेन्सिंग करून घेतले पाहिजे. यामधून त्यांच्या विषाणूमध्ये काही बदल आढळतात का हे पहिले पाहिजे. त्यांनतर पुढचा निष्कर्ष काढणे योग्य राहील. यापुढे अशा व्यक्तीचा एक डेटा ठेवून काही विषाणूंमध्ये कोणते जनुकीय बदल दिसतायेत का यावर लक्ष ठेवले पाहिजे. "

तर मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात कि, " सध्या तरी महापालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयात असे दुसऱ्यांदा कोरोना झालेले कोणतेही रुग्ण आढळून आलेले नाहीत. मात्र कोरोनाच्या उपचारानंतर जर त्यांना काही आणखी त्रास होत असेल तर त्या करिता काही रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आले आहे. काहीवेळा जुना संसर्ग बळावू शकतो त्याला रीऍक्टिव्हेशन म्हणू शकतो. मात्र सध्याच्या घडीला आपल्याकडे रीइन्फेक्शनची कोणतीही केस नाही."

सध्या तरी भारतात कुठेही कोरोना पुन्हा झाल्याचे प्रकरण आढळले नाही. तरीही सुद्धा हा कोरोनाचा विषाणू नवीन आहे त्याच्या भविष्यातील वर्तनाबाबत अनेकांनी खूप दावे केले होते. त्या सर्व तज्ञाचे दावे त्याने फोल ठरविले आहेत. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगण्यापेक्षा सावधानता बाळगलेली केव्हाही चांगली. त्यामुळे आपल्याकडे सध्या तरी कोरोना पुन्हा होत नसल्याचे कोणतेही उदाहरण नाही, ही आपल्यासाठी जमेची बाजू असली तरी नागरिकांनी विनाकारण गर्दी टाळली पाहिजे आणि सुरक्षिततेचे नियम पाळलेच पाहिजे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग