बेलेन : अर्जेटिनातल्या स्त्रीवादी ग्रीन वेव्हची रंजक कहानी

Belen Movie Review: अर्जेंटिनात (Argentina) 2015 ते 2020 या कालावधीत हक्कांसाठी महिलांची तीव्र आंदोलनं झाली. तिथं या पाच वर्षांच्या कालावधीला ग्रीन वेव्ह असं म्हटलं जातं. महिला हिरवे स्कार्फ घालून आंदोलनात उतरल्या होत्या. 'नी उना मेनोस' अर्थात 'नॉट वन वुमन लेस' हे आंदोलन पहिल्यांदा 2015 मध्ये झालं. त्या काळात बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याकडून मारहाण आणि महिलेची हत्या होण्याचे प्रकार प्रचंड वाढले होते. जवळपास दिवसाआड एखाद्या तरी महिलेचा मृतदेह सापडत होता. या विरोधात हजारो महिला पहिल्यांदा रस्त्यावर उतरल्या. सरकारला नमतं घ्यावं लागलं. महिलांवर हल्ला करणाऱ्यांना कडक शिक्षेची कायदेशीर तरतूद करण्यात आली. पण यावर तिथल्या फेमिनिस्ट एक्टिविस्ट्सचं समाधान झालं नाही. 2016-17 या दोन वर्षांच्या कालावधीत ‘माय बॉडी, माय रुल’ असा एल्गार महिलांनी केला. गर्भपाताचा कायदेशीर अधिकार महिलेला मिळावाच यासाठी लाखो महिला देशभर रस्त्यावर उतरल्या.
अर्जेंटिना कट्टर कॅथलिक देश आहे. धर्मात गर्भपात म्हणजे पाप असं म्हटलंय. प्रत्यक्षात डिलिव्हरीच्यावेळी आणि चोरुन-लपून गर्भपात करताना असंख्य महिलांचा बळी गेलाय. त्यासाठी हे गर्भपाताच्या अधिकाराची मागणी करणार मोठं आंदोलन देशभर पेटलं. डिलोरेस फोंझी दिग्दर्शित बेलेन (2025) या सिनेमात या आंदोलनाची सुरूवात नक्की कशी झाली याची गोष्ट आहे. बाईचा तिच्या शरीरावर हक्क असला पाहिजे आणि गर्भपात करणं हा गुन्हा ठरु नये यासाठी मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली अखेर तसा कायदा ही मंजूर झाला. 2020 ला चौदा आठवड्यापर्यंतची गर्भपाताची परवानगी मिळाली. तिथल्या महिलांची हा सर्वात मोठा विजय होता. दिग्दर्शका डोलेरस फोंझीचा हा बेलेन (2025) सिनेमा या संघर्षाचीच गोष्ट सांगतो.
बेलेन (2025) हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित आहे. 2014 साली 27 वर्षांची एक तरुणी पोटात दुखतंय म्हणून सार्वजनिक रुग्णालयात दाखल झाली. ती प्रेग्नंट होती. ब्लिडींग सुरु झालं आणि तिचा लगेच गर्भपात झाला. हे नैसर्गिक होतं. पण डॉक्टर आणि पोलीसांनी ते बेकायदा ठरवलं. तिला अटक झाली. दोन वर्ष ती जेलमध्ये होती. कुठल्याही पुराव्याशिवाय. अखेर कोर्टानं तिला 8 वर्षाची शिक्षा सुनावली. अर्जेटिनाच्या स्त्रीवादी महिलांनी या घटेनेला उचलून धरलं. एका गरीब मुलीला नैसर्गिक गर्भपातासाठी गुन्हेगारासारखी वागणूक का दिली जात आहे? असा थेट सवाल सरकारला केला. तिची ओळख लपवण्यासाठी बेलेन हे काल्पनिक नाव देण्यात आलं. 'आम्ही सर्व बेलेन' असा नादघोष अर्जटिनाभर घुमला. स्त्रीवादी महिला रस्त्यावर उतरल्या. सुरुवातीला हे आंदोलन टुकुमन या भागात होतं. सावकाश सावकाश ते देशभर पसरलं. गळ्यात हिरव्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या लाखो महिला रस्त्यावर आल्या. त्यांनी सरकारला सळो की पळो करुन सोडलं. अर्जेटिनाच्या सर्वोच्च न्यायालयानं या आंदोलनांची दखल घेतली आणि अखेर त्या महिलेची सुटका झाली.
रस्त्यावर महिलांची ग्रीन वेव्ह आली होती आणि कोर्टात गर्भपाताच्या न्यायालयीन लढाईवर सरकार आणि बेलेनच्या वकिलांमध्ये फैरी झाडल्या जात होत्या. सर्वात मोठा अडसर होता तो धार्मिक. जर धर्मात गर्भपात पाप मानलं जात असेल तर कसा अधिकार द्यायचा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. त्यावर बेलेनच्या स्त्रीवादी वकिलांनी शरीर जर महिलेचं आहे आणि तर त्याचं बरं वाईट करण्याचा अधिकार ही तिचा आहे. कुणी हौशेसाठी गर्भपात करत नाही. तर काहीतरी मजबूरी असते म्हणून महिला गर्भपाताचा पर्याय निवडते. असा प्रतियुक्तीवाद झाला. बाहेरचं आंदोलन आणि आतला युक्तिवाद अखेर जिंकला आणि बेलेनची सुटका झाली. त्यानंतर 14 आठवड्यापर्यंत गर्भपाताची परवानगी देण्याचा निर्णय तिथल्या संसदेत पार व्हायला आणखी 2 वर्ष लागले. 2020 मध्ये हा कायदा अखेर मंजूर झाला आणि महिलांनी त्याचा जल्लोष साजरा केला.
या आंदोलनासाठी महिलांनी वेगळी पध्दत अवलंबली होती. अंगावर एक ही कपड़ा न घालता पूर्ण नग्नावस्थेत अर्जेटिनात महिलांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. आंदोलनात सहभागी झाल्या म्हणून अनेकींना अटक करण्यात आली होती. त्यामुळं आता सफेद रंगाचे मास्क घालून या महिला रस्त्यावर उतरल्या. पण थांबल्या नाहीत, लढत राहिल्या. सोशल मिडिया आणि टेलिव्हिजनचा वापर हे आंदोलन पेटवण्यासाठी करण्यात आला. हे सर्व सिनेमात जसंच्या तसं दाखवण्यात आलंय. दिग्दर्शिका डोलेरस फोंझी बेलेनला न्याय मिळवून देणाऱ्या स्त्रीवादी वकिल महिलेची प्रभावी भूमिका केली आहे. मी जाणिकपुर्वक गर्भपात केला नाही, माझ्या शरीरावर माझा काही हक्क आहे की नाही? या चौकशी समिती समोरच्या वाक्यानं सिनेमाची सुरुवात होते. आणि सिनेमा महिला विजयाच्या जल्लोषात मास्क काढून फेकण्याच्या दृश्यानं संपतो. दीड तासाचा हा सिनेमा प्रचंड वेगवान घडामोडींनी उत्कंठावर्धक बनवलेला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अर्जेटिनामध्ये महिला विषय कायद्यांमध्ये अमुलाग्र बदल झालेत. हा ग्रीन वेव्हचा परिणाम आहे. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवताना ज़र ऐन मोक्याच्यावेळी पुरुषानं कंडोम काढला आणि त्याचं आत वीर्यपतन झालं तर त्याविरोधात पोलीसात तक्रार करण्याची मुभा आता मिळालेय. महिलेला नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी ही तरतूद कायद्यात करण्यात आलीय. बेलेन सिनेमा हा अर्जटिनासाठी महत्त्वाचा सिनेमा आहे.

























