All Green Movie Review: ऑल ग्रीन : पंक स्पिरीटेड झेन झी फेमिनिस्ट

All Green Movie Review: जपान (Japan) हे प्रगत राष्ट्र आहे. पण तिथं ही ग्रामिण आणि शहरी असा मोठा फरक पाहायला मिळतो. छोट्या शहरांतल्या लोकांना मोठ्या शहरांची स्वप्न पडतात. सध्याचं शहर स्वप्नांची भरारी घेण्यासाठी छोटी पडतात. खासकरुन जनरेशन झी अर्थात झेन झीची स्वप्नं मोठी असतात. अश्याच एका शहरात हिदेमी बोकु (सारा मिनामी), मिरुकु यागुची (नत्सुकी डेग्ची) आणि मिझिकी यशिदा अशा तीन मैत्रिणी शाळेत शिकतायत. हिदेमीला रॅपर व्हायचंय, मिरुकुला स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय आणि मिझिकीला काहीही का असेना या शहरातून बाहेर पडायचंय. तिघी एकाच शाळेत आहेत. आधी त्या एकमेंकांना ओळखत नसतात. एक दिवस तीन वेगवेगळ्या दिशेने येत असताना भर रस्त्यात एक गाडी थांबते, हातात छोटं बाळ असलेल्या बाईला गाडीतून ढकलून देते. ती जखमी आहे. तिला मारहाण झालेय, याचा सहज अंदाज येतो. ती उठते आणि लंगडत लंगडत पळून जाते. हे सर्व या तिघी पाहत असतात. दुसऱ्या दिवशी तिनं बाळासोबत आत्महत्या केल्याची बातमी येते. तिघींवर या घटनेचा जबरदस्त परिणाम होतो. आपल्याला असं जगायचं नाही, किंबहुना असं मरायचं नाही. म्हणून मग त्या तिघी एकत्र येतात, रिस्क घेतात, त्यांची गँग बनते, ध्येय एकच या छोट्या शहरातून बाहेर पडायचं. त्यासाठी काहीही रिस्क घेण्याची त्यांची तयारी आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश येतं का? यावरच आहे जापनिज दिग्दर्शक तकाशी कोयामा याचा ऑल ग्रीन्स (2025) हा सिनेमा आहे.
ऑल ग्रीन्स (2025) हे जपानमधल्या पितृसत्ताक समाजाला झेन झी फ़ेमिनिस्ट मुलींनी दिलेली ज़ोरदार धडक आहे. हिदेमी बाकुला रॅपर व्हायचंय, घरात सर्वच कोंडी आहे. वडिल आई-भावाला दारु पिऊन मारतात, त्यामुळं रॅपरच काय चांगला माणूस ही होऊ की नाही याबद्दल तिला शंका आहे. दुसरीकडे मिरुकी घरची परिस्थितीमुळं ऑड जॉब्स करतेय. हिच अवस्था त्यांची तिसरी मैत्रिण मिझुकी योशिदाची पण आहे. आता या 16-17 वर्षांच्या मुलींना हे शहर आणि त्यांच्या वातावरणाचा कंटाळा आलाय. त्यांना मोठ्या शहरात जायचंय. पैसे नाहीत. मग त्यांना एक रिस्की कल्पना सुचते. ग्रीन क्लबच्या नावाखाली तिघी शाळेच्या टेरेसवर गांजाची शेतीच करतात. माफिया नेटवर्कमध्ये जातात आणि नुसता पैश्याचा पाऊस पडायला सुरुवात होतो. वयात आलेल्या या तीन मुली गांजा तस्करी सारख्या पुरुषी अवैध धंद्यात टिकणं शक्य आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडतो. दिग्दर्शक तकाशी कोयामानं संपूर्ण कथानकाची मांडणी अशी काही केलेय की प्रेक्षक या तिघी आता या माफियांच्या कचाट्यातून आता कशा वाचणार असा सतत प्रश्न पडतो. तिनही कॅरेक्टर आपआपली धडपड कायम ठेवतात, पण यातून सहज बाहेर पडतात की नाही यावर पुढचा सिनेमा बेतलेला आहे.
संपूर्ण सिनेमाचा पोत हा झेन झी फेमिनिस्ट म्हणजे नव्या पिढीतला स्त्रीवादी दृष्टीकोन असा आहें. 16-17 या मुली आपलं आयुष्य सुधारण्यासाठी कुठला पुरुष किंवा कुटुंबावर अवलंबुन राहत नाहीत. त्या आपला मार्ग स्वतः शोधतात. पडत, धडपडत आणि जीवाची रिस्क घेत ध्येय गाठायचंच हा त्यांचा परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे. महिलांची पारंपारीक कामं त्यांना नकोयत. लग्न, त्यानंतर मुल आणि आयुष्यभर मारखोर नवऱ्याकडून जख्मी होऊन रस्त्यावर पडायचं नाहीय.
पंक स्पिरीट झेन झी संकल्पना आपण ऐकली असेल. आता पंक स्पिरीट म्हणजे डू इट युअरसेल्फ. साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं बंडखोर आणि आत्मकेंद्री. पंक स्पिरीटेड व्यक्ती आसपास घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर प्रश्न उपस्थित करतात, स्वताबद्दल जास्त विचार करतात, स्वताचं काम स्वता करतात, अन्यायाविरोधात लढा देतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही झालं तरी झुकत नाही. पैसा असेल नसेल यांचा कणा नेहमी ताठ असतो. तो त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. आपल्या पध्दतीनं कठिण आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद त्यांच्याकडे असते. किंबहुना ते परिस्थिती आपल्या हातात घेतात. त्यातू बाहेर पडण्याचा आपल्या पध्दतीचा तोडगा काढतात. ऑल ग्रीन्स सिनेमातल्या तीनही झेन झी नायिकांमध्ये हे पंक स्पिरीट ठासून भरलेलं आहे.
दिग्दर्शक तकाशी कोयामाची ही गोष्ट जापनिज मुलींची स्वप्न, त्याची भविष्याविषयीची चिंता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी स्विकारलेला अत्यंत धोकादायक मार्ग हे पुरुषी चौकटीला तोडण्याची त्यांची ठोस मानसिकतेचं प्रतिक आहे. त्यांना पुरुषांची बंधनं नकोयत. पारंपारीक कुटुंबात त्या डिजेक्टेट हार्ट आहे. म्हणजे काय तर त्यांना आपल्या कौटुंबिक वातावरणात अस्वस्थ होतं, त्यातून त्यांना निराशा येते. आशेचा किरण दिसत नाही. यातून एक फ्रस्ट्रेशन वाढतं, अस्वस्थता वाढते म्हणून मग त्या तिघी रिस्क घेऊन पण बाहेर पडतात.
तकाशीचा हा सिनेमा जपानमधला आजच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा मानला जाईल. जपानमध्ये वृध्दांची संख्या वाढतेय. इंडस्ट्रीचा विकास जोरानं होतोय, अश्यावेळी कौटुंबिक प्राधान्यांकडे दुर्लक्ष होणं साहाजिक आहे. समाजात पुरुषाचा मान जास्त त्यामुळं सर्वकाही त्याच्या मर्जी प्रमाणे, यात या तिघी मैत्रिणी पुरुषी सत्तेलाच सुरुंग लावतात. ही नवी अल्ट्रा फेमिनिस्ट लेन्स तकाशीनं जापनिज समाजाला लावलेय. जगभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण कोरियातल्या बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर झाला. तिथं तो चांगलाच गाजला. त्यानंतर टोकियो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याचा जापनिज प्रिमियर झाला. महिलांनी खासकरुन झेन झी फेमिनिस्ट महिलांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलाय. या सिनेमात त्यांना फक्त उमेद नव्हे तर कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची आणि आपला मार्ग आपण निवडण्याची ताकद देईल असा जबराट कंटेंट आहे.

























