BLOG | मुंबईची 'तब्येत' सुधारतेय!
मुंबईतील कोरोनाची परिस्थीती कशी सुधारली?
राज्यात सर्वच ठिकाणी कोरोनाने 'हजेरी' लावून प्रशासनातील व्यवस्थेपुढे मोठं आव्हान उभं केलं असतानाच विविध भागात कोरोना आटोक्यात यावा म्हणून स्थानिक पातळीवर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखता यावा म्हणून शासन आणि प्रशासन नवनवीन गोष्टी राबवण्याच्या प्रयत्न करत आहेत. सुरक्षिततेचे नियम पाळले तरच या आजाराचा सामना करणं शक्य होणार असल्याचे सर्वच वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. अशा या सर्वच भयंकर वातावरणात सुरवातीच्या काळापासूनच अख्या देशात कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेल्या मुंबई शहरातील रुग्णसंख्येने सगळ्याचं लक्ष आकर्षित करून घेतलं होतं. त्याच मुंबई शहराची 'तब्येत' आता हळूहळू सुधारत आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 70 टक्क्यापर्यंत पोहचलं असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 51 दिवसांवर आला आहे. या सगळ्या भीतीच्या छायेत जगणाऱ्या मुंबईकरांसाठी ही सुखद बाब असली तरी पावसाळ्यात सतर्क राहावं लागणार आहे. अजूनही मुंबई शहराला सुधारणा करण्यासाठी बराच वाव आहे, विशेष म्हणजे मृत्यू दर एका टक्क्यापेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागणार आहे.
मुंबई महानगर पालिकेने काही कामं करताना चुका केल्या आहेत, तर काही चांगली कामंही त्यांनी केली आहेत त्याच्यामुळे कोरोनाला थोड्या प्रमाणात का होईना रोखण्यात यश प्राप्त झाले आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सर्व आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील (जी.टी हॉस्पिटल आणि सेंट जॉर्जेस हॉस्पिटल) सर्वच रुग्णालये या आजाराशी एकदिलाने मुकाबला करत आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयातील सर्वच डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी रुग्णांना बरं करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. या सध्याच्या महामारीच्या काळात रुग्णांना सुविधा पुरवताना अनेक चुका त्यांच्याकडून होत आहेत मात्र त्या सगळ्या समस्यांवर मात करत पुढे जाण्याची हीच ती वेळ आहे. एवढ्या मोठया संकटात चूक होऊ नये अशी अपेक्षा असली तरी चूक होणारच नाही असे म्हणण कठीण आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालये, दवाखाने आणि त्यातील डॉक्टर कर्मचाऱ्यांचा यामध्ये मोठा वाटा आहे. सध्या रुग्ण बरा होऊन घरी यावा असं सर्वानाच वाटत असते. ज्याच्या घरचा रुग्ण असतो आणि तो सुखरूप होऊन घरी परततो याचा आनंद त्या घरातील नातेवाईकांनाच माहीत. योग्य वेळी हवी ती टीका त्या ठिकाणी केलीच पाहिजे, प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, मात्र एखादं काम चांगले झाल्यावर त्याचं कौतुक करण्याचा मोठेपणा दाखवला तर या व्यवस्थेत काम करण्याऱ्या सगळ्यांनाच आणखी काम करण्याचे 'बळ' प्राप्त होते.
या काळात महापालिकेने, विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहिमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक असा औषधी साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा एक ना अनेक चौफेर उपाययोजनांनी कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणायला मदत झाली आहे. प्रशासनाने 22 जून रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 37 दिवस होता. हा कालावधी दोन ते तीन आठवड्यात 50 दिवसांवर नेण्याचे लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1 जुलै 2020 रोजी 42 दिवसांवर पोहोचला. तर 13 जुलैला हा कालावधी 51 दिवसांवर आला आहे.
मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर 1 जुलैला 1.68 टक्के इतका होता. हा दर 12 जुलैला 1.36 टक्क्यांवर घसरला आहे. याचाच अर्थ रुग्ण वाढ मंदावत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे, आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये कोविड 19 बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णशय्या (बेड) रिकामे असण्याचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीत विविध समर्पित कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र मिळून 22 हजार 756 रुग्णशय्या उपलब्ध आहेत. यापैकी 10 हजार 130 बेड रिकामे आहेत. दरम्यान, महानगरपालिकेकडून होणाऱ्या कोविड चाचण्यांची दैनंदिन क्षमता पूर्वीच्या सरासरी 4 हजार वरुन आता 6 हजारापर्यंत वाढली आहे. डॉक्टरांच्या लिखित प्रपत्राशिवायदेखील चाचणी करुन घेण्याची मुभा देणारे मुंबई हे देशातील पहिलं शहर आहे. चाचण्यांची संख्या वाढावी, अधिकाधिक रुग्ण शोधता यावे, यासाठी महानगरपालिकेने आपल्या धोरणामध्ये सुसंगतता आणली. त्यामुळे चाचण्या वाढल्या. असं असलं तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा परिणाम म्हणून बाधित रुग्ण आढळण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण पूर्वीच्या 1,400 वरुन आता 1,200 पर्यंत खाली आले आहे. यातही लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांचे (एसिम्प्टोमॅटिक) प्रमाण सुमारे 80 टक्के आहे.
राज्य सरकारच्या कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात की, "नक्कीच मुंबईची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. पहिल्यापेक्षा खूप बदल झालेला आहे. मोठ्या प्रमाणात बरे होणाऱ्यांची रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र तरी मृत्यू दर कमी करणे हे आपले उद्दिष्ट आहे. सध्याच्या मृत्यूदरावरून आपल्याला एक टक्कयापर्यंत पोहचायचं आहे. त्यासाठी याच पद्धतीने काम करत राहणं गरजेचं आहे आणि यासाठी लोकांनी सुरक्षिततेचे नियम व्यवस्थित पाळले पाहिजेत."
राज्याच्या इतर भागातील वाढलेला कोरोना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. काही दिवसांपूर्वी आपण सर्वानी बघितलं आहे की, धारावीमध्ये 1 एप्रिल ते आठ जुलै या दरम्यान सुरू असलेल्या या कोरोनाच्या युद्धात सगळ्याच काम करणाऱ्या शहरातील यंत्रणांना यश संपादन झालं आहे. दिवसागणिक नव्याने शेकडोने सापडणाऱ्या रुग्णसंख्येत हळू-हळू वाढ कमी झाली आणि गेल्या आठवाड्यात केवळ एकाच नवीन रुग्णांची नोंद धारावी परिसरात करण्यात आली. साथीच्या आजारांवर मिळविलेला हा ऐतिहासिक विजय होता. त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आणि जागतिक आरोग्य परिषदेने धारावी येथील कामाचे कौतुक केले आहे. अशाच प्रकारे धारावीचा पॅटर्न राबवावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.