एक्स्प्लोर
मरणाची किंमत - फक्त 17 रुपये
पोटाची खळगी भरण्यासाठी देहाचा खेळ मांडणाऱ्या स्त्री देहावर वासनांचे किळसवाणे उभार आणले जातायेत. ते ही फक्त सतरा रुपयांत. कणाकणाने जवळ येणाऱ्या मरणाची, शरीरात भीनत जाणाऱ्या विषाची, चेहऱ्यावरच्या हरवलेल्या निरागसतेची, कोवळ्या उमलत्या शरीरांची आणि अखेर निब्बर झालेल्या कातडीची, विझत जाणाऱ्या डोळ्यांची किंमत आहे फक्त सतरा रुपये...

त्या दिवशी माझी नाईट शिफ्ट होती. रात्री एक-दीडची वेळ... उगाच काही काम नाही म्हणून आम्ही नाईटशिफ्टला काम करणारे सगळे रिपोर्टर एकत्र चहा पिण्यासाठी भेटलो. सायकलवरचा चहा पित असताना मला त्या दोघी दिसल्या. मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा इतक्या जवळून मी त्या मुलींना पाहात होते. तसं अधूनमधून त्या नजरेस पडायच्या...चुकचुकण्या शिवाय आपण फार काही करु शकत नाही हे देखिल माहित असायचं... त्या दिवशी मात्र अगदी एका हाताच्या अंतरावर उभ्या असलेल्या त्या दोघींना मी निरखून पाहिलं...वय अंदाजे 17-18 असेल...जुना पण झगमगता टिकल्याटिकल्यांचा स्कर्ट, स्लिवलेस टॉप, कोरडे झालेले- फिक्कट केस पाठीवर मोकळे सोडलेले, पायांत अशाच जुन्या पेन्सिल हिलच्या सँडल..त्यावर तोल सावरत त्यांचं शरीर आणि मन उभं होतं.
आपापसात काहीच न बोलता गळ्यातल्या लांब माळेशी चाळा करत त्या आजुबाजूला अनुभवी आणि हिशेबी कटाक्ष टाकत उभ्या होत्या. काळ्या रंगाचे गहिरे पण खोल गेलेले डोळे, चेहऱ्यावर भरगच्च मेकअप थापलेला, गाल मध्येच खड्ड्यांतून टेकडी उगवल्यासारखे हाडावर वर आलेले आणि जाड झालेल्या ओठांवर लालभड्डक लिपस्टिक चोपून लावलेली...त्यांच्या निब्बर कातडीवर निरागसपणाची एकही खूण दिसत नव्हती...त्यांचं वय खेळण्या-बागडण्याचं, शिकण्याचं...पण, या पोरी त्या पलीकडे जाऊन दुनियादारी शिकत होत्या.
आम्ही कॅमेरेवाले आहोत हे कळताच त्या झटकन तिथून सटकल्या...त्यावेळी मला वाटलं की या मुली तशा कमी वयाच्या वाटतात खऱ्या पण, अशा बघितल्या तर जरा थोराडच दिसतात...तो तश्या आणि अश्या नजरेचा घोळ मी तिथेच सोडला आणि तिथुन निघाले...काही वर्षे उलटली आणि एक आर्टिकल वाचनात आलं की या मुली तशा कमी वयाच्या असल्या तरी अशा थोराड दिसण्यासाठी त्यांच्यावर काही प्रयोग केले जातात...
या प्रयोगांनंतर या मुलींचे नुकतेच उमलायला लागलेले स्तन एकाएकी मोठ्ठ्या फुग्यासारखे दिसायला लागतात... मांड्या-पोटऱ्या भरीव होतात, नितंबांना शरीराच्या उंचीपेक्षा मोठा आकार यायला लागतो...कमरेवर गच्च आवळून बांधलेल्या परकरातून चरबी सांडायला लागते...चेहरा कायम सुजल्यासारखा जाड होतो, एक ओठ दोन ओठांएवढ्या जाडीचा होतो...वेगवेगळी औषधं, इंजेक्शन घेऊन हे सगळे प्रयोग कोवळ्या शरीरांवर होत राहतात...
ज्या शरीरावर हे प्रयोग होतात त्या शरीराला जगवण्यासाठी बाहेरुन निब्बर कातडी असलेल्या पोटाच्या आतली भूक भागवायची असते.. त्या शरीरावर इतर बरेच जीवही अवलंबून असतात...त्यांच्या भूकांना भागवण्यासाठी मग सुरु होतो गोळ्या, औषधं आणि इंजेक्शन्सचा मारा...यातून कोवळ्या शरीरात हार्मोन्सच्या सुया खुपसल्या जातात... असे हार्मोन्स जे तुम्हांला अकाली प्रौढ करतात...यांतलंच एक भयानक संप्रेरक म्हणजे ऑक्सिटोसिन...हे या कोवळ्या जिवांसाठी अकाली प्रौढ करणारं, कणाकणाने मारणारं आणि शरीरात कर्करोग रुजवणारं महाभयानक विष...
काय आहे ऑक्सिटोसीन?
हे एक संप्रेरक आहे. या औषधांचा वापर होतो तो मुख्यत्वे प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी. प्रसूतीनंतर स्तनदा मातांसाठी... प्रसुतीनंतर ऑक्सिटोसीनचा डोस दिला की लगेच नवजात बाळाला अंगावर पाजता येत नाही. सुरुवातीला येणारं आईचं दूध फेकून मग काही काळानंतर बाळाला दूध पाजण्याची परवानगी देता येते. मात्र ऑक्सिटोसीनचा वापर गरोदर बायकांच्या प्रसूतीऐवजी इतर ठिकाणीच अवैधरित्या जास्त केला जातो. या अवैध वापरांपैकी ऑक्सिटोसीनचा थेट मानवी शरीरावर गैरवापर होतो तो वेश्यावस्तीत...
ऑक्सिटोसीन हे लालबत्ती परिसरात सर्वात उपयोगी म्हणून ओळखलं जाणारं औषध आहे...आशादर्पण या संस्थेतल्या अनेक कार्यकर्त्यांशी मी प्रत्यक्ष जाऊन बोलले... तेव्हा देवता या त्यांच्यातल्याच एका कार्यकर्तीने सांगितलं की फक्त शरीरावरचे उभार खुलवण्यासाठीच नाही, तर वेगवेगळ्या कारणांसाठी इथल्या स्त्रिया वेगवेगळी औषधं घेतात...तुम्ही नेमकी कोणती औषधं घेता आणि का घेता हे विचारल्यावर तोंडावर पदर ठेऊन त्या स्त्रिया सुरुवातीला माझ्याकडेच संशयाने बघायला लागल्या... मग म्हणाल्या "हमे तो ऐसी दवा लेने की जरुरत नही, हम है वैसे ठिक है ऐसे वो मेडिकलवालाच बोला...लेकीन, हमारेमें जो नयी लडकीयाँ है उनको ये दवायी दी जाती हैं...कोई कोई इंजेक्शन लेता हैं, कोई गोली लेता हैं...बोलते है रंग गोरा करने के लिये, छाती चौडी करने के लिये लेता हैं...हमें तो दवा का नाम नहीं पता लेकीन, बोलते है आयुर्वैदिक है ले लो कुछ नहीं होयेगा"...
शेवटच्या वाक्याला मी हादरलेच... कारण, ऑक्सिटोसीनचा प्रयोग करताना तो डोळे झाकून करता यावा यासाठी त्याला आयुर्वेदाच्या वेष्ठनातही गुंडाळलं जात होतं.
यानंतर ऑक्सिटोसीनची अधिक माहिती घेण्यासाठी मी गेले ते कर्करोग तज्ञ असलेल्या डॉ. सुभाषचंद्रा यांच्याकडे.. ऑक्सिटोसीन यांसारख्या संप्रेरकांनी होणाऱ्या कर्करोगावर डॉ. सुभाषचंद्रा या शास्त्रज्ञाने बराच अभ्यास केलाय. ते म्हणतात की " ऑक्सिटोसीनचा प्रयोग हे अडलेल्या गरोदर बाईसाठी वरदान आहे. मात्र, ते देखिल योग्य प्रमाणात दिलं गेलं तरच. मात्र, अवैधरित्या होणारा ऑक्सिटोसीनचा प्रयोग हा वेगाने कर्करोग पसरवणारा आहे. बऱ्याचदा ही औषधं वेगवेगळ्या नावांनी रिब्रँडिंग करुन विकली जातात. आयुर्वेदाच्या नावाखालीही खपवली जातात. पिटोसिन हा त्याचा एक प्रसिद्ध असणारा ब्रँड आहे"
मात्र, ऑक्सिटोसीनचं हे विष फक्त लालबत्तीतच पेरलं जातंय हा समज डॉ. सुभाषचंद्रांशी बोलल्यावर तुटला. कारण, याच ऑक्सिटोसीनमुळे आधी मैलभर लांब असणारा कॅन्सर आता हातभर अंतरावर आलाय.
एफडीएच्या आतापर्यंतच्या धाडींमध्ये या ऑक्सिटोसीनचा प्रयोग भाज्या, फळं आणि दूभत्या जनावरांवर झालेला दिसून आलाय आणि हे खुद्द एफडीएने देखिल मान्य केलंय. डॉ.सुभाषचंद्रा यांच्या म्हणण्यानुसार "ज्या भाज्या, जी फळं आणि जे दूध तुम्ही घरी विकत आणता तेव्हा त्याची स्वच्छता तपासता...मात्र, त्याच्या उत्पादनाच्या वेळीच त्यात विष मिसळलं गेलं असेल तर नुसती स्वच्छता काय कामाची... कर्करोगासंबंधात जे पेशंट येतात त्यांना कोणतं ना कोणतं व्यसन असणार हे आम्ही गृहित धरलेलंच असतं. पण, सध्या अशा पेशंटची संख्या वेगाने वाढतेय ज्यांनी कधी दारु, सिगारेट, तंबाखु, गुटखा, मावा यांना स्पर्शही केला नाही आणि तरी त्यांना कॅसर झालाय...यात महिलांची संख्या जास्त आहे"
ऑक्सिटोसीन अवैधरित्या कुठे कुठे वापरलं जातं?
फळं, भाज्या अकाली पिकवण्यासाठी, त्यांचा आकार आणि उत्पादन वाढवण्यासाठी हे इंजेक्शन अवैधरित्या वापरलं जातं.
दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी गायी-म्हशींवरही याचा प्रयोग होतो.
ऑक्सिटोसीनसारख्या संप्रेरकांचा प्रयोग केलेल्या भाज्या, फळं, दूध यांच्या सेवनाने कर्करोग होण्याची शक्यता वाढते आणि वेश्यावस्तीत, लालबत्तींच्या उजेडात तर खुलेआम हेच इंजेक्शन देऊन कोवळे जीव अकाली प्रौढ केले जातात.
एवढं भयानक विष आणि त्याचा होणारा गैरवापर पाहता खरं तर ऑक्सिटोसीन खुलेआम विकण्यावर बंदी येणं आवश्यक आहे. आतापर्यंत सरकारच्या लेखी ऑक्सिटोसीन हे कर्नाटका अँन्टिबॉयोटिक्स या पब्लिक सेक्टरच्या कंपनीतच निर्माण होतं आणि तिथून हे देशभरातल्या रुग्णालयांना, प्रसुतीगृहांना वितरीत होतं. मात्र, ऑक्सिटोसीनचं रिब्रँडिंग सहज केलं गेलं आणि ते मेडिकल स्टोअरवर अवैधरित्या विकलंही गेलं. त्यानंतर भारत सरकारने या औषधाला एच या कँटेगिरीत टाकलं. एच वर्ग म्हणजे जी औषधं प्रिस्क्रीप्शन शिवाय देता येत नाहीत. मात्र, याच्या अवैध विक्रीला धरबंध राहिला नाही आणि भारत सरकारने आणखी एक परिपत्रक काढून ऑक्सिटोसीनची गणना एच वर्गातून कीढून एच वन या वर्गात केली. एच वन वर्गातील औषधे म्हणजे संवेदनशील ड्रग्ज...जे विकतांना त्याची नोंदणी होणं आवश्यक आहे, खरेदी करणाऱ्याचे नाव आणि खरेदीचे कारणही नोंद होणं गरजेचे आहे. अर्थातच एच वन वर्गातील औषधांसाठी डॉक्टरांची परवानगी गरजेची आहेच. पण, आजपर्यंत जे फाट्यावर मारले जातात तेच नियम अशी ज्यांची व्याख्या आहे तसेच नियम सध्या लागू आहेत.
भारत सरकारच्या परिपत्रकानुसार आजपर्यंत ऑक्सिटोसीन जे सामान्य मेडिकल दुकानांवर उपलब्ध होऊ शकत नव्हतं ते आता सहज उपलब्ध होईल. त्याच्या विक्रीवर बंधन असणार नाही. ऑक्सिटोसीनच्या विक्रीसाठी नियम मात्र असतील. मात्र, डॉक्टरांची परवानगी, प्रिस्क्रीप्शन, ऑक्सिटोसीन विकल्याची नोंदणी हे सर्व नियम आधीही धाब्यावर बसवले गेले आणि आताही ते तुडवलेच जातायेत... कोवळ्या जिवांना निब्बर करण्याची गेंड्यांची कातडी ज्यांच्याकडे आहे ते असले नियम पाळतायेत कशाला?
खरं तर ऑक्सिटोसीनच्या मेडिकल स्टोअरवरच्या विक्रीला ऑल इंडिया फुड अँन्ड ड्रग्ज लायसन होल्डर फाऊंडेशनने सुरुवातीपासूनच विरोध केला...मात्र, मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने मेडिकल स्टोअरवर या ड्रगच्या उपलब्धतेसाठी आग्रह धरला. तसंच, एकाच कंपनीकडून पुरवठा होत असल्याने प्रसूती गृहात, रुग्णालयात ऑक्सिटोसीनचा तुटवडा देखिल जाणवायला लागला. यासाठी नियम कठोर करुन ऑक्सिटोसीनच्या खुल्या विक्रीला परवानगी देण्यात आली.
मात्र, हे नियम कसे पायदळी तुडवले जातात ते मी स्वत: प्रत्यक्ष अनुभवलंय...ही बातमी करतेवेळी मी एक स्टिंग ऑपरेशन केलं...मुंबईतल्या सायन, परळ भागांतल्या अगदीच मोजक्या म्हणजे 5-6 मेडीकल स्टोअरवर मी गेले आणि तिथे ऑक्सिटोसीन मागितलं...अगदी तिसऱ्या प्रयत्नातच माझ्या हातात ऑक्सिटोसीनचं इंजेक्शन होतं. हे इंजेक्शन विकत घेताना मला कुणीही माझं नाव-गांव विचारलं नाही. इतर कारणाची वगैरे चौकशी करण्याचा काही प्रश्नच नाही. हे औषध घेतांना माझ्याकडे डॉक्टरांचं प्रिस्क्रीप्शन आहे का हे ही कुणी तपासलं नाही. अगदी सहज एखादी डोकेदुखीची गोळी घ्यावी तसं हे ऑक्सिटोसीन नावाचं विष मला फक्त 17 रुपयांत विकण्यात आलं. इतर मेडिकल दुकानदारांनी स्टॉक तासाभरांत येईल असं सांगितलं, एकाने तर फक्त एक इंजेक्शन देणार नाही अख्खा खोकाच घ्यावा लागेल म्हटलं, एकाने मला होलसेलमध्ये खरेदी केली तर 10% सूट देण्याचंही कबुल केलं. तर एकाने, ऑक्सिटोसीन देईन पण विदाऊट बिल घ्यावं लागेल ते ही दुपारच्याच वेळेत असंही सांगितलं.
हा अनुभव घेऊन मी अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएकडे गेले...तिथल्या अमृत निखाडे या सहआयुक्तांना याबाबत माहिती दिली, त्यांनी तात्काळ सायनमधील मेडिकलवर कारवाईचे आदेश दिले...मात्र, आम्ही नियमांच्या अधीन राहूनच ऑक्सिटोसीनच्या अवैध विक्रीवर बंदी घालू असं ते म्हणाले.
या सगळ्यांतून माझ्या एकच लक्षात आलं ते म्हणजे ऑक्सिटोसीनचं हे मार्केट चालू ठेवणं ही काहींची गरज असावी...मी ऑक्सिटोसीन विरोधात काम करणाऱ्या ऑल इंडिया फूड अँन्ड ड्रग्ज लायसन होल्डर फाऊंडेशनच्या अध्यक्षांना अभय पांडेंना भेटले. त्यांच्या म्हणण्यानुसार " ऑक्सिटोसीनवर काढलेलं नवं परिपत्रक आणि एच वन वर्गात केलेला समावेश ही केवळ एक भलावण आहे. प्रत्यक्षात या ऑक्सिटोसीनच्या अवैध व्यापाराचा भाग असणारे अनेकजण या रॅकेटमध्ये आहेत. जेव्हा सरकारने हे परिपत्रक काढलं आणि जाहीर केलं की ऑक्सिटोसीन आता नियमांच्या अधीन राहून खुलेपणाने मेडिकल स्टोअरवर विकता येईल तेव्हा त्या पत्रकात लोकांच्या, संस्थांच्या हरकती, सूचनाही मागवल्या गेल्या. मात्र, या हरकती, सूचनांसाठी केवळ सात दिवसांचीच मुदत देण्यात आली. या सात दिवसांतले चार दिवस सार्वजनिक सुट्टीचे होते" यावरुन खरोखरंच सरकारला आणि प्रशासनाला ऑक्सिटोसीनबाबत किती गांभीर्य आहे हे लक्षात येतं.
सध्या ऑक्सिटोसीनचं हे विष खुलेआम फक्त सतरा रुपयांत विकलं जातंय. निव्वळ सतरा रुपयांत रोजचा भाजीपाला, फळं यात विष पेरुन अनेकजण लाखोंचा नफा कमावतायेत. निव्वळ 17 रुपयांत दुभत्या गायी-म्हशींना क्षमतेपेक्षा जास्त पिळून घेतलं जातंय आणि दूधातून ऑक्सिटोसीनचं विष घराघरात पोहोचवलं जातंय. पोटाची खळगी भरण्यासाठी देहाचा खेळ मांडणाऱ्या स्त्री देहावर वासनांचे किळसवाणे उभार आणले जातायेत. ते ही फक्त सतरा रुपयांत. कणाकणाने जवळ येणाऱ्या मरणाची, शरीरात भीनत जाणाऱ्या विषाची, चेहऱ्यावरच्या हरवलेल्या निरागसतेची, कोवळ्या उमलत्या शरीरांची आणि अखेर निब्बर झालेल्या कातडीची, विझत जाणाऱ्या डोळ्यांची किंमत आहे फक्त सतरा रुपये...
पाहा व्हिडीओ :
View More
























