Paravarachya Gappa : पारावरच्या गप्पा : एक करंजी, दोन लाडू
(गावातली समदी माणसं शेता भाता कडे)
तात्या (तुका पाटील) : बाळ्या, पार वाट लावली या पाण्यानं! दोन दिस थांबला असता तर काय झालं असत?
बाळ्या : व्हय ना तात्या? दिवाळी तोंडावर आली अन समदा इस्कोट झाला....आता पोरान्ला काय खाऊ घालू...
धन्या : व्हय, बाळ्या दादा, अर समद्यांची हीच गत झालीया, संमदीकडं पाणीच पाणी हाय
तात्या : आवरा स्वतःला, चला घरला चला, बायका पोरं वाट पाहत असतींन..
बाळ्या : पर तात्या, वर्षभर जीवापाड जपलेल्या ह्या पोराचं काय?
तात्या : अर, म्हणून तर आपण शेती मातीत जन्माला येतूय.. आपल्या आयुष्यातच संघर्ष लिव्हलाय... चला घरला चला...
(दुसऱ्या दिवशी पाऊस उघडलेला...काही तरुण मंडळी पारावर बसलेली)
संत्या : काय म तान्या, कशी चाललीय दिवाळी? कंपनीचा बोनस झाला कि नाय
तान्या : चाललीय जशी काय तशी? कसला बोनस अन कसला काय?
संत्या : हाव नं राव, आमचा आजूक पगार बी झाला नाय..!
धन्या : आपली दिवाळीचं काय खरं नसतंय, शहरात दिवाळी भारी अस्तेय.
(तेवढ्यात समोरून एक टेम्पो, मोठी कार येतांना दिसते..)
तान्या : संत्या, हे नक्कीच खाऊ वाले असतील बरं?
संत्या : मलाबी तेच वाटतंय..
(गाडीतून खाली काही माणसं उतरतात)
साहेब 01 : पत्र्याचा पाडा हाच का?
धन्या : व्हयं साहेब..
साहेब 02 : व्हा म, गावकऱ्यांना बोलवून आणा,
मॅडम 01 : दिवाळीचा फराळ आणलाय तुमच्यासाठी
संत्या : ये धन्या, व्हयं चक्कर मारून ये..
तान्या : संत्या , तात्यांना बोलवून आणतो..!
संत्या : आरं, ते रानांत गेले असत्याल, कोणाकडं निरोप दे हवंतर..
तान्या : बरं..
साहेब 01 : ये मित्रांनो, या हे सामान घेऊ लागा, अन तुम्ही इथंच थांबा खाऊ कपडे वाटायला..
संत्या : ओके सर..
(दहा पंधरा मिनिटांत गावातली चिल्लीपिल्ली, बाया माणसं, काही म्हातारी माणसांची गर्दी होते)
मॅडम 01 : सर्वानी लाईन लावा.. लहान मुलांची वेगळी, महिलांची वेगळी..
(कुणीही लाईन लावण्याच्या नादात नाहीत, कसातरी करून खाऊ कपडे वाटप करण्यात येतात.. साहेब जात असतात, तेवढ्यात तात्या येतात..)
संत्या : थांबा, थांबा साहेब आमचे तात्या आलेत, गावचे पाटील हायेत ते..
साहेब 01 : नमस्कार पाटील साहेब..
तुका पाटील : राम राम, झालं वाटून?
मॅडम 01 : हो हो झालं, आता निघतच होतो..
तुका पाटील : या बसा दोन मिनिटं , अय संत्या चहा ठिवायला सांग ..
साहेब 02 : छान वाटलं तुमच्या गावात येऊन..
तुका पाटील : हो, शहरापेक्षा गाव भारीच असतात, फक्त सोयी सुविधांमुळे जरा..
साहेब 02 : हो, बरोबर आहे तुमचं ?
तुका पाटील : आता माझं ऐका, पाऊस हाय का शहरात?
साहेब 01 : हो काका आहे ना?
तुका पाटील : व्हय ना? आता येताना काही दिसलं का नाही?
साहेब 01 : हो, मग निसर्ग रम्य परिसर पाहत आलो, भारीच असत इकडं!
तुका पाटील : तुम्हाला पाण्यानं भरलेली शेती दिसली नाय का? शेतकरी ओक्सबोक्शी रडताना दिसला नाय का? त्यांला दिवाळी नाही का?
मॅडम 01: काय झालं पाटील?
तुका पाटील : हे फराळ पुराण थांबवा आता, आमच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवा.. दिवाळीत लय संस्था असं फराळ वाटपाच काम करता, पण तिथल्या लोकांशी बोलला का तुम्ही, नाही ना? पावसानं होत्याच नव्हतं केलं, वर्षभर जपलेलं शेत एका झटक्यात मातीत मिसळलं! आता शेतकऱ्याने दिवाळी कशी करायची? अहो आजही गावात पाणी नाय का चांगला दवाखाना नाय, यावर तुम्ही काहीतरी करा, दिवाळीच्या टायमाला येता तुम्ही, आजारी माणसाला बिस्कीट पुडा घेऊन आल्यासारखं... असं नका करू...शेतकऱ्याला अडी नडलीला मदत करा..एवढीच इच्छा...
साहेब 01 : खरचं, चुकलंच आमचं?
मॅडम 01 : पाटील साहेब, खरंय तुमचं, आम्ही ३६५ दिवसांतून एकदाच येतो तुमच्याकडं... पण आम्ही यापुढं शेतकऱ्यांच्या मदतीला, हाकेला धावून जाऊ... तुम्ही हाये म्हणून आम्ही आहोत...!