Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Nagpur News : नागपूर जिल्ह्यात महसूल प्रशासन वेळेत जात प्रमाणपत्र देत नसल्याने अनेक गरीब पारधी विद्यार्थिनींवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे.
नागपूर : जिल्ह्यातील पारधी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अर्ज केल्यानंतर अनेक महिने तर काहींना दोन-दोन वर्षापर्यंत त्यांचे जात प्रमाणपत्र (Caste Certificate) महसूल विभागाकडून मिळत नाही, त्यामुळे अनेक तरुणींवर शिक्षण अर्धवट सोडून व समाजाच्या दबावात अल्पवयात लग्न वेळ आली आल्याची दुर्दैवी बाब एबीपी माझाने समोर आणली होती. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
एबीपी माझाने बातमी दाखवल्याच्या अवघ्या काही तासातच जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शिक्षण सोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तीनही राजपूत बहिणींना प्रशासनानं जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरापर्यंत महसूल अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या 87 जात प्रमाणपत्रांना मंजुरी देत स्वाक्षरी केली आहे. राजपूत बहिणींसह हिंगणा तालुक्यातील शेष नगर व आजूबाजूच्या परिसरातील 87 विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच इतर पारधी नागरिकांचे जात प्रमाणपत्रसाठीचे प्रलंबित अर्ज मंजूर करण्यात आले असून लवकरच सर्वांना जात प्रमाणपत्र हातात सुपूर्द केले जाणार आहे.
दरम्यान, एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेतून अनेक प्रश्नही निर्माण झाले आहे.
१) अवघ्या काही तासात अर्ज मंजूर झाल्याने हे सिद्ध होते की सर्व अर्ज महसूल कार्यालयांमध्ये रीतसर उपलब्ध होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होतं.
२) नागरिकांनी अर्ज केल्यानंतर दोन दोन वर्षे जात प्रमाणपत्र दिले जात नव्हते, यासाठी जबाबदार अधिकारी कोण?? आणि त्या विरोधात कारवाई होईल का???
३) गेले दोन वर्ष हिंगणा तालुक्यातील पारधी समाजाच्या जात प्रमाणपत्रांच्या अर्जाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या कालावधीत शिक्षण सोडलेल्या आणि मोलमजुरी करण्यास मजबूर झालेल्या तरुण-तरुणींच्या भवितव्याचा आणि आलेल्या अडचणींचा जबाबदार कोण??? (कारण मोठ्या संख्येने गेल्या काही महिन्यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण आणि करिअरचे स्वप्न सोडून आर्थिक परिस्थितीचे वास्तव स्वीकारत मोलमजुरीला सुरुवात केली आहे.)
महसूलमंत्र्यांकडून गंभीर दाखल
दरम्यान, महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई होत असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "आजच आम्ही या संदर्भातील बैठक घेऊ आणि पारधी समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यामध्ये यांनी दिरंगाई केली असेल, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा