Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यामध्ये ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचाने एक लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Beed News : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीला विरोध केल्याने निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवघ्या महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या न्यायाची मागणी होत असतानाच आणखी एक खंडणीचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये खंडणी हा आता गोरखधंदा झाला आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माजी सरपंच, एक सदस्य तसेच उपसरपंचाचा पती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यामध्ये ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचाने एक लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरपंच मंगल राम मामडगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनंतर माजी सरपंच, एक सदस्य तसेच उपसरपंचाचा पती या तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर आणि उपसरपंच पदावर सुद्धा महिला आहेत. आरोपी विविध कारणे सांगून विकासकामांमध्ये अडथळे सातत्याने आणत होते, खोट्या तक्रारी सुद्धा दाखल करत होते. दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली होती, अशी तक्रार सरपंच मामडगे यांनी केली आहे. पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू
दरम्यान, बीड जिल्ह्यामध्येच तीन सख्खा भावांवर पारधी समाजामधील लोकांनीच केलेल्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले अशी त्यांची नावे आहेत. कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे. या घटनेमधील सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला, याची माहिती समोर आलेली नाही.
वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी
दरम्यान, खंडणीखोर वाल्मीक कराडने खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सीआयडीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले आहे. हत्येप्रकरणी मकोका लागलेल्या कराडची चौकशी करायची असल्याने जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीने कोर्टाकडे केली होती. याच जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे
इतर महत्वाच्या बातम्या