एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खादाडखाऊ : दिवाळीची खरेदी अन् पुण्यातील खवय्येगिरी!
'दागिने,कपडे आणि इतर वस्तूंची खरेदी झाल्यावर सहाजिकच लोकांच्या डोक्यात पहिला विचार पेटपुजेचा येतो आणि खरेदीला आलेली पावले आपोआप हॉटेल्स,खाऊगल्लीकडे वळतात.'
दिवाळीचं दुसरं नाव खरेदी ठेवलं तरी ते आनंदानी चालेल आपल्या लोकांना. आता अमेझॉन,फ्लिपकार्टच्या अॅप्सनी खरेदी वर्षभर फक्त आपल्या घरातच नाही तर हातात आणून ठेवली आहे. तरीही दिवाळीत लक्ष्मी रोडवर एक चक्कर मारून आल्याशिवाय खऱ्या पुणेकराचे खरेदी पूर्ण झाल्याचं समाधान काही केल्या होत नाही. तो रिवाज पुण्याच्या भाषेत पूर्वापार असतो.
लक्ष्मी रस्त्याला गर्दीची कमी तशी कधीच भासत नाही पण दिवाळीत हीच गर्दी वर्षभरातला खरेदीचा उच्चांक गाठत असते. दिवाळीच्या आधीच्या शनिवार, रविवारच्या खरेदी करायला उतरलेल्या गर्दीची स्पर्धा तर केवळ गणपती उत्सवात होणाऱ्या गर्दीशी होऊ शकेल. दसऱ्यापासून पगारदारांचे बोनस व्हायला सुरुवात होते आणि लक्ष्मी रस्त्याची तमाम दुकानं आपला सोमवार बंद १ ते ४ बंद हा नियमही विसरतात. (चितळे बंधू लक्ष्मी रस्त्यावर नसल्याने ह्याला अपवाद आहेतच)
दागिने,कपडे आणि इतर वस्तूंची खरेदी झाल्यावर सहाजिकच लोकांच्या डोक्यात पहिला विचार पेटपुजेचा येतो आणि खरेदीला आलेली पावले आपोआप हॉटेल्स,खाऊगल्लीकडे वळतात.
गेले काही वर्ष लक्ष्मी रस्त्यावरची हॉटेल्स, स्पॉट कमी होत चालली आहेत त्यामुळे अपरिहार्यपणे आठवण होते ती लहानपणी पाहिलेल्या हॉटेल्सची, ठिकाणांची. तुळशीबागेकडेकडून आईच्या नेतृत्वात सुरु झालेली आमची वरात हळूहळू उंबऱ्या गणपती चौकाकडून विजय(लि.ना.चि.म) कडे निघालेली असायची. पण तुळशीबाग आटपल्यावर पावले तुळशीबागेच्या तोंडाशी नवीनच झालेल्या ‘अगत्य’ मध्ये डोसा,कांदा उत्तप्पा खायला वळायची. त्यावेळेच्या अगत्यचा थाट काय वर्णावा महाराजा? टाईप होता.
आता अनेक वर्षात अगत्यमध्ये जाण्याची वेळ आली नाही पण पूर्वी आत गेल्यागेल्या उजवीकडे छोटेसे कारंजे,त्याच्या आजूबाजूला मांडलेली काही टेबल्स,आत हॉल आणि वरच्या मजल्यावरही बसायची छानशी सोय. अदबीने हिंदीत विचारून ऑर्डर घेणारे मॅनेजर्स (त्यांना कॅप्टन म्हणतात हे फारच उशिरा समजलं) लहान मुलांशीही अदबीने बोलणारे उडपी वेटर्स ह्या सगळ्यांचे,त्यावेळेच्या कुठल्याही पुणेरी मुलांना असू शकेल तेवढेच मला अप्रूप होतं.
जुन्या पुणेकरांना आठवत असेल तर,जिलब्या मारुती मंडळाच्या चौकात भाऊ महाराज बोळाच्या अगदी सुरुवातीला, पहिल्या मजल्यावर ‘आरस’ म्हणून शेट्टी आण्णाचं एक हॉटेल होतं, ते साधारण अगत्य सुरु व्हायच्या सुमारास म्हणजे ८६-८७ साली बंद झालं. आरसमधली इडली,डोसा सांबार खायला लोकं आवर्जून लांबून यायचे. आता आरसची जागा तशीच रिकामी दिसते.
‘अगत्य’मध्ये आमचं आदरातिथ्य संपून बिल भागवून झालं की आम्ही परत ग्राउंड रियालिटीला म्हणजे लक्ष्मी रस्त्याला यायचो. मग थेट प्रभात थियेटरशेजारच्या सातपुते काकांकडे वर्षात एकदा मिळणाऱ्या चपलांची खरेदी करून परत नगरकर तालीम चौकातल्या गणू शिंदे ह्यांच्या कोल्ड्रिंक हाऊसमध्ये दोन्ही हातात पिशव्यांची माळ घेतलेली आमची वरात पोचायची.
तुळशीबागेत जाऊनही कावरेंचं नाव न घेतलं हे जुन्या पुणेकरांना खटकलं असेल पण आम्हाला कावरेंकडचे कसाटा फक्त उन्हाळी सुट्ट्यात तेही क्वचित मिळणारी गोष्ट होती. ‘गणू शिंदे’ मधलं थंडगार दूध कोल्ड्रिंक मात्र आईची एकंदर खरेदी मनासारखी झाल्याची पावती असायची.
कधी खरेदीला लवकर गेलो आणि जाताना दुपार सरली असेल तर तुळशीबागेत फिरुन आल्यावर ‘श्रीकृष्ण’मधली मिसळ व्हायची. मुलांना घरगुती लोणी लावलेले ब्रेड स्लाईस मागवले जायचे. श्रीकृष्णचे मालक घरच्यांच्या परिचयाचे म्हणून ब्रेडवर लोण्याबरोबर पिठीसाखर पेरून स्लाईस ब्रेड आमच्यासमोर व्हीआयपी पद्धतीने सर्व्ह केला जायचा. खरेदी थोडक्यात आटपून त्याच बाजूने बाहेर पडलो आणि श्रीकृष्ण बंद असेल तर पुढे शनिपार रस्त्यावर असलेल्या ‘अनोखा केंद्र’ इथे डोसा मिळायचा. डोसा हॉटेलच्या किचन मधून थेट ‘ओपन स्टॉलवर’ आणण्यासाठी ‘अनोखा केंद्र’चे नाव घ्यावं लागेल.
दुकानच्या तोंडाशी लावलेल्या तापलेल्या तव्यावर पाणी टाकत चर्र आवाज येणाऱ्या,जाणाऱ्या लोकांना आवाज देत असलेले कारागीर लक्ष वेधून घेत. क्वचित खाल्ले असले तरी डोस्याची चव मात्र यथातथाच असायची. त्यांनतर मात्र गणू शिंदेंकडच्या दूध कोल्ड्रिंक ऐवजी शनिपार चौकातल्या ‘मुरलीधर’मधल्या ऊसाच्या रसावर आम्हा मुलांची बोळवण व्हायची. तिथून आईवडिलांचा हात धरून तडक शनिपारच्या बस स्टॉपवर आमची वरात पोचायची.
मला वाटतं त्यावेळी खरेदी झाल्यावर लोकांची खाण्याची ठिकाणं त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तमपणे दर्शवायचे. आमच्यासारखे मध्यमवर्गीय अगत्य,अनोखा केंद्र, गणू शिंदे/मुरलीधर करून बस, रिक्षा करून निमूटपणे घरचा रस्ता धरायचे. आमच्यापेक्षाही कमी पैश्यात खरेदी करणाऱ्या लोकांना विश्रामबागेच्या समोरच्या त्यावेळी असलेल्या डोस्यांच्या गाड्यांचा आधार असायचा. आमच्यापेक्षा आर्थिक परिस्थिती भारी असलेली लोकं गाड्यांत बसून तडक गरुड गणपती चौकाच्या अलीकडे त्यावेळी असलेल्या पॉश म्हणता येईल अश्या ‘द्वारिका’च्या बाहेर (छोले भटुरे,फ्रुट शेक चांगले मिळायचे.) किंवा डेक्कनला जायची. एकमेकांना येताजाता ‘हॅपी दिवाळी’ करताना दिसायची.
काळ बदलला,लक्ष्मी रस्त्याचं महत्व पूर्वीएवढं राहिल नसलं तरी संपलं कधीच नाही. आता अनेक सराफांनी,कापड दुकानदारांनी आपापल्या ब्रँचेस शहराच्या विविध भागात सुरु केल्या असल्या तरी बाहेरच्या अनेक नव्या शोरूम्स लक्ष्मी रस्त्यावर उभ्या राहिल्या आहेत. आयटीत काम करणाऱ्या तरुणाईचा कल मॉल्समधले ब्रँडेड कपडे घेण्याकडे वाढत चालला असला तरी जुना पुणेकर आपली दिवाळीची खरेदी आवर्जून लक्ष्मी रस्त्यालाच करतो. काहीही असेल तरी आमचा लाडका लक्ष्मी रोड जगातल्या स्पर्धेची पर्वा न करता, लोकांना पाहिजे ते पुरवायचे आपले काम चोख बजावतो आहे.
‘गणू शिंदे’,पूना गेस्ट हाऊस ह्यांच्यासारखे हॉटेल्समधले अपवादात्मक मराठी लोक आपापला व्यवसाय लक्ष्मी रस्त्यावर पूर्वीच्याच ‘शान’ मध्ये करतात हे पाहून बरं वाटतं. पूर्वी ‘द्वारिका’ला दिसणारी गर्दी आता मुंबईवरून कुंटे चौकाजवळ आलेल्या ‘आर.भगत तारांचंद’मध्ये स्टार्टर्स मध्ये खिचा चुरी, जेवायला पंजाबी डिशेस आणि डेझर्टमध्ये रबडी खाऊन रस्त्यावर रेंगाळताना दिसते.
दिवाळीच्या दिवसात गावात फिरताना, दहा-बारा दुकानं धुंडाळून आपल्या तुटपुंज्या बजेटमधली खरेदी करून घरी निघालेली जोडपी दिसतात. कंटाळलेल्या मुलाला हाताशी धरलेली आई, पेंगुळलेल्या मुलीला खांद्यावर घेतलेले वडील, शनिपार-मंडई रस्त्याला कुठेतरी चालताना दिसतात. ते बघून उगाचच अनेक गोष्टी आठवत रहातात. हातात पिशव्या आणि थकून काळवंडलेल्या, घामेजलेल्या चेहऱ्यावर मुलांची तरी खरेदी चांगली केल्याचं समाधान दिसतं. ते दृश्य लांबून बघताना ते समाधान आपल्याही चेहऱ्यावर पसरल्याचा भास होतो. मुलांना घेऊन घरी निघालेल्या त्या जोडप्याकडे बघताना स्वतःच्या नकळत मी मनातल्या मनात त्यांना ‘हॅपी दिवाळी’ कधी म्हणून जातो हेही समजत नाही.
खादाडखाऊ सदरातील इतर ब्लॉग :
खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?
खादाडखाऊ : जखमा उरातल्या
खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण
वडापाव -काही आठवणीतले, काही आवडीचे
खादाडखाऊ : मराठी पदार्थांसाठी फक्कड
खादाडखाऊ : गणेशोत्सवातली खाद्यभ्रमंती आणि बदलत चाललेलं पुणं
खादाडखाऊ : गणेशोत्सव आणि मास्टरशेफ
खादाडखाऊ : पुण्यातला पहिला ‘आमराई मिसळ महोत्सव’
खादाडखाऊ : खाद्यभ्रमंती मुळशीची
खादाडखाऊ : मंदारची पोह्यांची गाडी
खादाडखाऊ : आशीर्वादची थाळी
खादाडखाऊ : पुण्यातील महाडिकांची गाडी
खादाडखाऊ : पुन्हा एकदा लोणावळा
खादाडखाऊ : ‘इंटरव्हल’ भेळ आणि जय जलाराम
खादाडखाऊ : ‘तिलक’चा सामोसा सँपल
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
ब्लॉग : खादाडखाऊ : हिंगणगावे आणि कंपनी
खादाडखाऊ : पुण्यातील 106 वर्षं जुनी ‘वैद्यांची मिसळ’!
खादाडखाऊ: खाद्य इतिहास पुण्याचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement