तकिया कलाम : एक विलुप्त होत चाललेली कला
भारतीय सिनेमाला तकिया कलामांची उज्ज्वल परंपरा आहे. माझं चुकत नसेल तर पडद्यावर तकिया कलाम बोलण्याची उज्वल परंपरा श्री श्री प्रेम चोप्रा यांनी 'बॉबी' सिनेमातून सुरु केली असावी.
लग्नात नवरदेवाचे मित्र करत असणारा नागीन डान्स, नोटबंदीनंतर एटीएममधून पैसे, आणि अक्षय खन्नाच्या डोक्यावरून केस या गोष्टी जशा गायब होत आहेत, तसंच सिनेमातून खलनायकाच्या तोंडून बाहेर पडणारे तकिया कलाम पण हळूहळू गायब होत चालले आहेत हा एक राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे .आता तुम्ही तकिया कलाम म्हणजे काय असं विचारणार असाल तर 'हाय कंबख्त तुने पी ही नही' च्या धर्तीवर 'हाय कंबख्त तुने हिंदी सिनेमा देखा ही नही' असं म्हणावं लागेल. तरी लोकांवर ज्ञानामृताचा शिडकाव करण्यासाठीच आमचा जन्म झाला आहे अशी आमची खात्री असल्याने आम्हीच तकिया कलाम म्हणजे काय ते उलगडून सांगतो.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकातल्या बहुतेक सिनेमामध्ये खलनायकाच्या किंवा दुय्यम खलनायकाच्या तोंडी असा एक संवाद असे, ज्याचा उच्चार तो दर दोन वाक्यांनंतर करत असे त्याला तकिया कलाम म्हणत. उदाहरणार्थ 'तोहफा' नावाच्या प्रेक्षकांच्या कलात्मक जाणिवा जागृत करणाऱ्या सिनेमात शक्ती कपूर हा महान नट प्रत्येक संवाद बोलण्याच्या अगोदर 'आऊ, लोलिता' असा तकिया कलाम बोलत असे. मी मागे एकदा सिनेमाच्या नावासमोर येणाऱ्या विचित्र टॅगलाईन या विषयावर लिहिलं होतं.
तकिया कलाम हा प्रकार निरर्थकपणात या टॅगलाईनच्या पण दोन पावलं पुढं आहे. कारण प्रसंग कुठलाही असो उदाहरणार्थ नायकाच्या बहिणीवर बलात्कार होण्याचा प्रसंग असो (जो ऐंशी आणि नव्वदच्या दशकातल्या सिनेमात हमखास असायचा), इमानदार पोलीस इन्स्पेक्टरला जीवे मारण्याचा प्रसंग असो , हिरोच्या आईला 'अड्ड्यावर' बांधून ठेवल्यावर विकट हास्य करताना असो सर्वच ठिकाणी खलनायक एकच तकिया कलाम बोलायचा. हा एकाच वेळी काही प्रेक्षकांसाठी इरिटेटिंग आणि काही प्रेक्षकांना मोहरुन टाकणारा प्रकार होता. छोट्या शहरातल्या सिंगल स्क्रीन थेटरात सिनेमा बघण्यात आयुष्य गेलेले प्रेक्षक, जे अजूनही टाय कोट घालणाऱ्या खलनायकाला पण 'डाकू' असच संबोधतात ते दुसऱ्या प्रकारात मोडणारे. तकिया कलाम या प्रकाराला आमच्या भावविश्वात हिरोईन इतके नसले तरी महत्वाचे स्थान आहे, हे आवर्जून नमूद करावे लागेल.
भारतीय सिनेमाला तकिया कलामांची उज्ज्वल परंपरा आहे. माझं चुकत नसेल तर पडद्यावर तकिया कलाम बोलण्याची उज्वल परंपरा श्री श्री प्रेम चोप्रा यांनी 'बॉबी' सिनेमातून सुरु केली असावी. 'बॉबी' मध्ये खरं तर प्रेम चोप्राचा रोल फारसा महत्वाचा नव्हता. तरी पण त्यात चोप्रा साहेबांचा 'प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा' हा तकिया कलाम डिंपलच्या मिनी स्कर्ट एवढाच गाजला. अजूनही प्रेम चोप्रा पडद्यावर दिसला तरी हाच डायलॉग पहिले आठवतो इतका या तकिया कलामचा 'डीप इम्पॅक्ट' आहे. या तकिया कलामनी नंतर प्रेम चोप्राचा पूर्ण कारकिर्दीभर पिच्छा पुरवला.
'सौतन' सावनकुमार टाक दिग्दर्शित अजून एका महान कलाकृतीमध्ये चोप्रा 'मै वो बला हू, जो शिशे से पथ्थर को तोडता हू' हा तकिया कलाम किमान पन्नास वेळा बोलतात. 'दुल्हेराजा' मधला 'नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या' आणि 'राजाबाबू' मधला 'कर भला तो हो भला' ह्या संवादातून प्रेम चोप्रा हे त्यांच्या पात्रांच्या जीवनाचं तत्त्वज्ञानच सांगत असतात अशी आमची गाढ श्रद्धा आहे. पण तकिया कलाम या इमारतीचा पाया प्रेम चोप्रा यांनी रचला असला तरी या इमारतीवर कळस चढवण्याचं काम 'आऊ' शक्ती कपूर आणि 'बॅड मॅन' गुलशन ग्रोव्हर यांनी केलं आहे.
शक्ती कपूरची खासियत म्हणजे तो एकच तकिया कलाम सिनेमातल्या वेगवेगळ्या पात्रांकडे बघून वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतो. उदाहरणार्थ 'बंधन' नावाचा सलमान खानचा एक सिनेमा आहे. त्यात शक्ती कपूरने एका दुय्यम खलनायक -कम -विनोदवीराची भूमिका बजावली आहे. त्यात त्याच्या तोंडी 'हड्डी तोंड दूंगा' नावाचा तकिया कलाम आहे . तो हा संवाद सलमानकडे बघून वेगळ्या पद्धतीने बोलतो, अशोक सराफ यांच्याकडे बघून वेगळ्या पद्धतीने बोलतो, रंभा कडे बघून वेगळ्या पद्धतीने बोलतो आणि श्वेता मेननकडे बघून वेगळ्या पद्धतीने बोलतो. सुज्ञ प्रेक्षक प्रत्येकवेळेस या डायलॉगचा अपेक्षित अर्थ बरोबर काढतो. 'चालबाज' या श्रीदेवीच्या डबल रोल असणाऱ्या सिनेमात पण शक्ती चाचा 'मै तो नन्हा सा छोटा सा प्यारा सा बच्चा हु' हा संवाद श्रीदेवीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रसंगात, अनु कपूरने केलेल्या नौकराशी बोलताना आणि बहिणीची भूमिका करणाऱ्या रोहिणी हट्टंगडीशी वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो.
आचरट तकिया कलाम बोलण्यात शक्ती कपूरचा हात कुणीच पकडू शकत नाही . 'वीरूदादा' नावाच्या सिनेमात शक्ती कपूरने एका तृतीयपंथी खलनायकाचा रोल केला आहे. त्या सिनेमात काही अनाकलनीय कारणांमुळे शक्ती 'मेरे कने चक्कू है' हा संवाद पुन्हा पुन्हा बोलत असतो. त्याशिवाय 'नंदू सबका बंधू' हा राजाबाबुमधला, 'मेरा नाम है क्राईम मास्टर गोगो, आँखे निकालकर गोटीया खेलून्गा', हा अंदाज अपना अपना मधला, 'ब्याज काट के ' हा हर दिल जो प्यार करेगा मधला तकिया कलाम हे काही तकिया कलामच्या इतिहासात गाजलेले डायलॉग. 'लाडला' नावाच्या एका मास्टरपीस मध्ये, शक्तीजी श्रीदेवीकडे विशिष्ट प्रेमळ भाव नजरेत आणून 'तून्ना तून्ना' हा संवाद बोलतात तेंव्हा ती एका आदिम प्रेरणेची अभिव्यक्ती असते.
या प्रांतात शक्तीजी कपूरजी यांनी जी मुशाफिरी केली आहे तेवढीच आपल्या इंडस्ट्रीचे बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर यांनी पण केली आहे. सोहनी महिवाल नावाच्या सिनेमात 'गन्ना चुस के' हा ओपन एंडिंग अर्थ असणारा संवाद बोलून वाचकांच्या कल्पनाशक्तीला गुलशनजी आव्हान करतात. आमच्या अजय सरांच्या 'दिलवाले' या सिनेमात 'सपना के संग गाना गाऊंगा' हा संवाद गुलशनजींनी बोलला आहे. या सिनेमात सपना हे नाव नायिकेचे आहे हे त वरून ताकभात कळणाऱ्या प्रेक्षकांना माहित असेलच. 'दिलजले' नावाच्या सिनेमात 'जिंदगी का मजा खट्टे मे है' या तकिया कलाम मधून अनुभवातून आलेलं ज्ञानच ते वाटत असतात. अक्षय कुमार, रेखा या लोकांचा 'खिलाडीयो का खिलाडी' नावाचा सिनेमा आहे. त्या शहराचं कथानक एका फिरंगी शहरात घडत. त्या शहरात भारत देशाचा इतका प्रभाव वाढला असतो की, इतका प्रभाव वाढला असतो की तिथले सगळे गोरे लोक पण हिंदीमध्येच बोलत असतात. अगदी अंडरटेकर आणि क्रश पण हिंदी मध्येच बोलत असतात. रेखाने केलेली 'माया' ही त्या शहरातली डॉन असते. गुल्लूजी तिचे प्रतिस्पर्धी असतात. एका फिरंगी शहरात वर्चस्व असावं म्हणून दोन भारतीय भांडत असतात हे दृश्य बघून अनेक प्रेक्षकांना हुंदका फुटला होता असं म्हणतात. त्या सिनेमात 'माया तेरी तो मै बदल लुंगा काया' असा तकिया कलाम गुल्लूजी वापरतात.
शक्ती कपूर हा आचरट वन लाइनर्सचा बादशहा असेल तर 'गुंडा' हा सिनेमा या तकिया कलामची मक्का मदिना /व्हॅटिकन /काशी आहे. 'मै हु पोते, जो किसीके नही होते', 'मेरा नाम है चुटिया', 'मेरा नाम है बुल्ला, हमेशा रखता हू खुल्ला' अशी तकिया कलामची मांदियाळी त्या सिनेमात उसळली आहे .
याशिवाय बच्चन आणि अमरीश पुरी या फुटकळ कलाकारांचे पण 'रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप है' आणि 'मोगॅम्बो खुश हुआ' असे तकिया कलाम आहेत पण शक्तीजी आणि गुल्लूजी यांची सर त्यांना नाही.
खूप लोक तुम्ही अशा फुटकळ विषयावर लिहून तुमची एनर्जी वाया का घालता असं विचारतात. अनेकजण लोक तुम्हाला समीक्षक म्हणून सिरियसली घेणं सोडतील असंही बोलतात. पण आचरटपणा हा आमचा स्वभावविशेष असल्यामुळे आचरटपणा हाच ज्या काळाच्या सिनेमाचा स्थायीभाव आहे त्यावर लिहिणे हे आम्ही आमचं राष्ट्रीय कर्तव्यच समजतो.
आमचं लिखाण वाचणारा एक मोठा वर्ग पण आचरटच असल्यामुळे त्यांच्या विषयी लिहिणं हे पण आमचं दुसरं राष्ट्रीय कर्तव्यच (आमची अशी अनेक राष्ट्रीय कर्तव्य आहेत)आहे. ग्राहकांची ख़ुशी हाच आमचा संतोष. जाता जाता आम्ही आमचा तकिया कलाम सांगूनच जातो - आमच्याकडे मागणीप्रमाणे लेख पाडून मिळतील आणि शिनेमाच्या स्टोऱ्या गाडून मिळतील .
ता. क .- अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, दिबांकर बॅनर्जी, फरहान अशा वाट चुकलेल्या दिग्दर्शकांनी त्यांच्या सिनेमात असे तकिया कलाम टाकल्याशिवाय त्यांच्या सिनेमाला जनमान्यता मिळणार नाही.