BLOG | काही नावालाच 'डॉक्टर'
आरोग्याची वाट सुलभ करून देणाऱ्या देवदूतावार कारवाई करण्याची कुणाचीही इच्छा नाही, मात्र त्यांनी संकट समयी रुग्णांची सेवा करावी अशी आशा शासनाने व्यक्त केली असली तर त्यात चूक नसल्याचं खुद्द आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.
डॉक्टर' हा शब्द जरी ऐकला तरी रुग्णाला अर्ध बरं झाल्यासारखं वाटतं कारण त्याला खात्री असते की डॉक्टर त्याला बरं करेल. आपल्याकडे तर अनेक जण डॉक्टरांना देवाची उपमा देतात, मानसिक आणि शाररिक दुःखातून बाहेर काढणाऱ्या या डॉक्टरांना कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची गणना 'योद्धे' म्हणून केली आहे. अशा कठीण प्रसंगात अनेक डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णांना उपचार करून बरे करत आहेत. या लढाईत मात्र काही योद्धे कोरोनाची लागण होऊन घायाळ झाले आहेत. शिवाय दिवसेंदिवस मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चाललाय, अशा काळात डॉक्टरांची या शहराला नितांत गरज भासत आहे. या कठीण काळात काही डॉक्टर्स मात्र नावाला 'डॉक्टर' असल्याची भूमिका बजावत आहे, त्यांनी आपल्या कर्तव्यापासून दूर राहण्यास पसंती दिली आहे. अशा डॉक्टरांनी समाज हिताकरिता किमान 15 दिवस पालिकेच्या किंवा शासनाच्या रुग्णालयात सेवा देण्याची सूचना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने केली आहे.
आरोग्याची वाट सुलभ करून देणाऱ्या देवदूतावार कारवाई करण्याची कुणाचीही इच्छा नाही, मात्र त्यांनी संकट समयी रुग्णांची सेवा करावी अशी आशा शासनाने व्यक्त केली असली तर त्यात चूक नसल्याचं खुद्द आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. कोरोनाबाधितांची शहरातील वाढती संख्या लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून यापूर्वीच शासनाने खासगी डॉक्टरांना कोरोनाकाळात रुग्णसेवा करावी लागेल यासाठी चाचपणी करून ठेवली होती. अनेक डॉक्टर कोरोना बाधित रुग्णांना उपचार देत आहे या प्रक्रियेत काही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचाराकरिता 14 दिवसकरिता अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधितांचा ज्या पद्धतीने आकडा वाढत आहे त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासन बेड वाढविण्याच्या दृष्टीने विविध प्रयत्न करीत आहे. खासगी रुग्णालयाचे काही टक्के बेड हे कोरोनाबाधितांसाठी आरक्षित असून त्या संदर्भातील हॉस्पिटलची यादी तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय काही नागरिकांना जर गरज भासली तर विलगीकरण कक्ष मोठया प्रमाणावर उभारण्याचे काम सध्या मुंबईतील विविध भागात सुरु आहे.
शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही खासगी डॉक्टर्सनी कोरोनाचा प्रादुर्भाव नको या उद्देशाने आपले दवाखाने बंद ठेवले होते. शासनाने वेळोवेळी बैठक घेऊन त्यांना दवाखाने सुरू करून नागरिकांना उपचार देण्याचे आवाहन केले होते. मात्र याला काही डॉक्टरांनी प्रतिसाद दिला असला तरी काही डॉक्टरांनी मात्र दवाखाने बंदच ठेवले आहे. दोन दिवसापूर्वी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने फतवा काढला असून यामध्ये जे डॉक्टर सध्या कोणतीही वैद्यकीय सर्व देत नाही त्यांना शासनास 15 दिवसाची सेवा द्यावी असे सांगण्यात आले आहे. या संदर्भातील पत्र मुंबईतील सर्व डॉक्टरांना ई-मेल वरून पाठविण्यात आले आहे. याकरिता महाराष्ट्र वैद्यक परिषदेची मदत घेण्यात आली आहे. ही सेवा जे डॉक्टर कोठेही सेवा देत नाही यांच्याकरिता आहे. तसेच शहरातील प्रत्येक डॉक्टरने शासनाला माहिती द्याची आहे कि सध्या ते कोणत्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देत आहे.ही सूचना मुंबईतील डॉक्टरांसाठी असून सूचनेत नमूद केलेल्याला ई-मेल वर माहिती देणे बंधनकारक आहे.
याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे, प्रभारी संचालक, डॉ तात्याराव लहाने, सांगतात की, "मुंबई शहरातील परिस्थितीची सध्या सर्वांना जाण आहे. डॉक्टरांची सध्या मोठ्या प्रमाणात गरज आहे. जे डॉक्टर काहीच काम करत नाही त्यांच्याकडून ही सेवा अपेक्षित आहे. जे डॉक्टर जेथे आपले रुग्णांवर उपचार देत आहे, त्यांनी त्यांचं काम करत राहावे. मात्र महापालिकेच्या सहकार्याने जे काही सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये काही डॉक्टर्स आपले क्लिनिक बंद करून बसले आहेत. उलट या अशा साथीच्या काळात रुग्णांना उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिले. अशा डॉक्टरांना त्यांच्या सोयीनुसार जवळच्या हॉस्पिटल मध्ये मुभा देण्यात येणार आहे. तसेच त्यांनी 15 दिवस सेवा दिल्यानंतर 14 दिवसाचा विलगीकरणाचा काळ धरून 29 दिवस राहण्याची-खाण्याची सोय करण्यात येणार आहे. शिवाय डॉक्टरांना सर्व सुरक्षा साधने पुरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आम्हाला कुणावरही कारवाई करायची इच्छा नाही. परंतु प्रतिसाद न दिल्यास नक्कीच कारवाई करावी लागेल."
या सेवेतून ज्यांचे वय 55 वर्षापेक्षा अधिक आहे, गरोदर महिला, 1 वर्षापेक्षा लहान मूळ असलेल्या माता, तसेच ज्यांना काही व्याधी आहेत जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हृदयविकार त्यांना यातून सूट देण्यात आली आहे.
"आम्ही सर्व डॉक्टर रोज सेवा देत आहोत. शहरातील माझ्या मते बहुतांश डॉक्टर सध्या रुग्णांना सेवा देत आहे त्यांचे खरोखर अभिनंदन. मात्र जे कुणी हे डॉक्टर सेवा देत नसतील तर त्यांनी पुढे येऊन समाजहिताकरीता सेवा दिली पाहिजे असे माझे मत आहे. यामध्ये वरिष्ठ डॉक्टरना सूट देण्यात आली आहे. " असे, डॉ शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यक परिषद, यांनी सांगितले.
देशातील काही भागात वरिष्ठ डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत. काही दिवसापूर्वी 79 वर्षीय डॉक्टरांचा ठाणे येथे मृत्यू झाला मात्र ते शेवटच्या क्षणापर्यंत रुग्नांना सेवा देत होते. राज्यातील रेसिडेंट डॉक्टर दिवस रात्र रुग्णांना उपचार देता आहे. खरं तर अशा कठीण काळात डॉक्टरांनी रुग्ण सेवा दिली पाहिजे.अशा पद्धतीचे आवाहन करण्याची वेळ शासनावर येत काम नये. यापूर्वी अनेक समस्यांना मुंबईतील डॉक्टरांनी तोंड दिले आहे. असह्य वेदनेतून रुग्णांची सुटका करणारे 'ते' डॉक्टर निश्चित यावेळीही लढाई करण्याकरिता मैदानात उतरतील.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'ऐशीतैशी' कोरोना गंभीरतेची