(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | 'ऐशीतैशी' कोरोना गंभीरतेची
खरं तर तिसऱ्या टप्प्याला सामोरे जाताना राज्यातील चित्र फारसं चांगलं नाही. अजूनही आपण महाभयंकर 'कोरोनामय' वातावरणात जगतोय.
आज आपण लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतोय, या अगोदर आपण 40 दिवसांची टाळेबंदी अनुभवली आहे. अजूनही परिस्थिती आटोक्यात यायला थोडा अवधी आहे म्हणून की काय केंद्र सरकारने लॉकडाउनचा तिसऱ्या टप्प्याला ग्रीन सिग्नल देऊन 14 दिवस अजून टाळेबंदी करावी यावर शिक्कामोर्तब केलं. खरं तर तिसऱ्या टप्प्याला सामोरे जाताना राज्यातील चित्र फारसं चांगलं नाही. अजूनही आपण महाभयंकर 'कोरोनामय' वातावरणात जगतोय. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या ही वाढत आहे, या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे ती दारूची दुकाने उघडणार बातमीने. सध्या सगळीकडे ह्याच बातमीची चर्चा आहे. त्यामुळे कालपासून 'काही' नागरिक कमालीचे खुश झाले आहेत. सरकारने अर्थव्यवस्था हळूहळू चालू करण्याच्या दृष्टीने बहुधा चांगल्या हेतूने हे पाऊल उचललं असावं. मात्र, या सगळ्या वातवरणात कोरोनाचा गांभीर्य जराही कमी झालं नाही तर, याची आपणास मोठी किंमत चुकवावी लागू शकते हे मात्र विसरता काम नये.
खरं तर दारू प्यावी किंवा पिऊ नये ही पूर्णतः हा वैयक्तिक बाब आहे. यावर कुणी हरकत घेण्याची अजिबात गरज नाही. शासनाने जर दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय घेतलाच असेल तर त्यामागे काही कारणं नक्कीच असू शकतात. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत नागरिकांनी कसं वागायचं हे भान निश्चित ठेवलं पाहिजे. कारण कोरोनाचा आपलं युद्ध संपलेले नाही. आता तर उलट युद्ध जोरदार सुरु आहे. सगळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था एकदिलाने लढत आहेत. प्रत्येकजण जीवाची बाजी लावून नागरिकांना इमाने इतबारे सेवा देत आहे. त्यांचं मनोबल खच्चीकरण होईल असं कोणतेच कृत्य नागरिकांकडून घडणार नाही याची मात्र दक्षता आपण सर्वानी मिळून घेतली पाहिजे.
आपण मागील तीन दिवसातील राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी पाहूया, 1 मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 506 असून 485 मृत्यू झाले असून 1 हजार 8 नवीन रुग्णानांची नोंद झाली आहे. 2 मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 असून 521 मृत्यू झाले असून 790 नवीन रुग्णानांची नोंद झाली आहे. 3 मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 974 असून 548 मृत्यू झाले असून 678 नवीन रुग्णानांची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून आपल्याला कोरोनाचं गांभीर्य लक्षात आलं असेल तर या तीन दिवसात दररोज 650 पेक्षा जास्त कोरोनबाधित रुग्ण वाढतच आहे.
पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ असीम सरोदे सांगतात की, "सगळ्या प्रकारामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना नाकारता येत नाही. खरी संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन सुरु असताना सहपद्धतीने दारूची दुकाने उघडण्याची ही वेळ खरं तर चुकीची आहे. गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील लोकांकडे आधीच दीड महिन्याच्या लॉकडाउनमुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहे. त्यामध्ये अशा प्रकारे मिळाली तर काहीजण कुटुंबाबतील खर्चाची रक्कम दारूकडे वळवली जाण्याची शक्यता आहे. सध्या अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे. आजही आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्याने पैसे खर्च करण्याचे बहुतांश अधिकार हे पुरुषांकडे असल्याने ते दारूसाठी पैसे खर्च करतील आणि यामुळे कुटुंब अडचणीत येऊ शकते."
ते पुढे असेही सांगतात की, "राज्याचा आर्थिक व्यवस्थेपेक्षा कुटुंबातील सामाजिक आणि आरोग्य व्यवस्था महत्वाची आहे. जर ही व्यवस्था टिकली तर लोक आनंदाने जगू शकतील. त्याचप्रमणे जागतिक आरोग्य परिषदेनुसार मद्यपान केल्याने कोरोना सारख्या आजारांना बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही."
तिसऱ्या टप्प्यात प्रवेश कारण्याअगोदरच, शासनाने काही गोष्टी जाहीर केल्या आहेत. त्यापैकी काही मोकळीक देण्याकरिता नियम आखण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने ऑरेंज आणि ग्रीन झोनचा विचार केला जाणार आहे. मात्र, रेड झोनमध्ये फारच कमी प्रकारची शिथिलता करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे देशात कुठल्याही प्रकारची रेल्वे सेवा, विमान सेवा, चालू केली जाणार नसून शाळा, महाविद्यालय, मॉल्स आणि चित्रपटगृहे संपूर्ण देशात बंद राहणार आहेत. आपल्या राज्यात 14 जिल्हे रेड झोन, 16 जिल्हे ऑरेंज झोन तर 6 जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत. त्यामुळे लोकांनी आपण कुठल्या झोन मध्ये आहोत आणि आपल्याला कोणत्या सवलती मिळाल्या आहेत याचीच सध्या चर्चा रंगताना पाहावयास मिळत आहे. खऱ्या अर्थाने आता नागरिकांनी सजग आणि सावधगिरी बाळगण्याची गरज असून आता पर्यंत जे नियम पाळले आहेत. त्याचा अवलंब कायम केला पाहिजे.
या सर्व निमित्ताने आजचा एक प्रसंग येथे सांगावासा वाटतो, आज एक बाळंतीण महिला या कोरोनासाठी स्वतंत्र असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर दाखल करून घ्यावे म्हणून ताटकळत बसली. तीच मुलं जिथे तीच बाळंपण झाली तिथे काचेच्या पेटीत ठेवलं आहे. तर दुसरीकडे आईला कोरोनाबाधित आहे म्हणून दुसऱ्या रुग्णालयात पाठविले आहे. मात्र, तिकडे लवकर दाद मिळली नाही. अनेक लोकांनी सहकार्य केल्यामुळे त्या महिलेला संध्याकाळी एक सरकारी रुग्णालयात प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, आईची आणि लेकरांची काही तासात झालेली ताटातूट होण्याची घटना पाहिली की हृदय पिळवटून येतं. (रुग्णाचे नाव आणि रुग्णालयाचे नाव टाकू नये असे सांगितल्याने अधिक तपशील टाकता येत नाही)
तर दुसऱ्या बाजूला एक वृत्तवाहिनीवर एक 'तळीराम' मी अमुक संख्या इतक्या दारूच्या बाटल्या घेईन, अमुक किलो इतकं मटण खाईन. तीन दिवस झोपून राहणार अशा बातम्यांच्या क्लिप दिवसभर समाजमाध्यमांवर फिरत आहे. तर कुठे दारूच्या दुकानाबाहेर पहिल्या ग्राहकचा सत्कार केला जातोय त्याचं छायाचित्र व्हायरल होते आहे. या सगळ्या गोष्टी पहिल्या की खूप वाईट वाटतं.
एका बाजूला चांगल आरोग्य मिळावं म्हणून धडपड करणारं दाम्पत्य आणि दुसरीकडे ह्या प्रवृत्ती. लोकांनी स्वतःहूनच या सगळ्या प्रकारामधून आज बोध घेण्याची गरज आहे.
शासनाने दारूची दुकाने गोंधळ घालण्यासाठी उघडलेली नाहीत. लॉकडाउन मधील काही झोन मधील शिथिलता म्हणजे कोरोना संपलेला नाही. कारण कोरोना आजार हा संसर्गजन्य रोग आहे, जर घाई गडबड गोधंळ झाला आणि लोकांनी नियम पायदळी तुडवलेत तर यांची मोठी शिक्षा आपण सर्वाना भोगावी लागू शकते हे फक्त लक्षात ठेवा. आज दिवसभर समाज माध्यमांवरील विडिओ पाहून महाराष्ट्रात फक्त 'तळीराम' राहतात कि काय अशी शंका उपस्थित होत आहे. महाराष्ट्र राज्याला मोठी संस्कृती आहे. आपल्या अशा वागण्याने या संस्कृतीला डाग लागणार नाही याची प्रत्यकाने काळजी घेतली पाहिजे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा