BLOG | शशिकला, कष्टाने यश मिळवलेल्या अभिनेत्री
प्रख्यात अभिनेत्री शशिकला यांचे आज वयाच्या 88 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. नेहमी टापटीप राहणाऱ्या शशिकला या वयातही अत्यंत ग्रेसफुल दिसत असत. हिंदी आणि मराठी सिनेमात त्यांनी यशाचं शिखर गाठलं होतं. पण त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत, कष्ट याची अनेकांना कल्पना नसेल. शशिकला यांनी बॉलिवूडध्ये नायिका, खलनायिका, नृत्यांगना, सहनायिका, खाष्ट सासू अशा अनेक भूमिका साकारत स्वतःला तावून सुलाखून काढले होते.
4 ऑगस्ट 1932 ला मुंबईत जन्मलेल्या शशिकला यांचे सौंदर्य थक्क करणारे होते हे त्यांचे जुने ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाहिल्यानंतर स्पष्ट होते. बॉलीवुडमध्ये फक्त सौंदर्यच नव्हे तर मेहनत आणि नशिब या दोन्ही गोष्टींची साथ लागते आणि शशिकला यांनाही साथ चांगली मिळाली होती. शशिकला यांचे वडील अनंतराव जवळकर श्रीमंत होते. भावाला परदेशात चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यामुळे ते लवकरच दिवाळखोरीत गेले. भावानेही परत आल्यानंतर त्यांना मदत केली नाही. त्यामुळे जवळकर कुटुंब रस्त्यावर आले. त्यानंतर जवळकर कुटुंब मुंबईला आले आणि जगण्याचा संघर्ष करू लागले. घरची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याने शशिकला यांना पडेल ती कामे करावी लागली होती.
चित्रपटात त्यांचा प्रवेश योगायोगानेच झाला. प्रख्यात अभिनेत्री, गायिका नूरजहाँ यांनी त्यांना पाहिले. शशिकला यांचे सौंदर्य पाहून त्या थक्क झाल्या आणि त्यांनी आपल्या पतीला सैयद शौकत हुसैन रिझवी यांना सांगून शशिकला यांना चित्रपटात काम मिळवून दिले. हा चित्रपट होता ‘झीनत’. 1945 मध्ये शशिकला यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने तोंडाला जो रंग लावला तो आजपर्यंत उतरवलेला नाही. या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना 25 रुपये बिदागी देण्यात आली होती. ‘झीनत’नंतर सय्यद शौकत हुसैन रिझवी यांनी शशिकला यांना ‘जुगनू’ चित्रपटात अभिनेता दिलीप कुमारच्या बहिणीची भूमिका साकारण्याची संधी दिली. 1947 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. यानंतर रिझवी यांनी शशिकला यांना नायिका बनवण्याचे ठरवले आणि चित्रपटाची तयारी सुरु केली. परंतु त्याच वेळेस देशाची फाळणी झाली. नूरजहाँ आणि रिझवी पाकिस्तानला परत गेले आणि शशिकला यांची नायिका होण्याची संधी हुकली.
या दरम्यान त्यांनी ‘’डोली (1947), ‘पगडी’ (1948), ‘गर्ल्स स्कूल’ (1949) या चित्रपटांमध्ये छोट्या-मोट्या भूमिका साकारल्या. त्यांना नायिका म्हणून पहिली संधी रणजीत मूव्हीटोनने ‘नजारे’ चित्रपटाद्वारे दिली. 1949 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शशिकला यांचा नायक होता आगा. त्या काळात फिल्म स्टुडियो कलाकारांसोबत दोन-तीन चित्रपटांसाठी करार करीत असत. त्यामुळे शशिकला यांनी मागे वळून पाहिले नाही. नायिकेपेक्षा सहनायिका म्हणून त्यांनी सर्व मोठ्या कलाकारांबरोबर चित्रपट केले.
अभिनेत्री म्हणून यशस्वी झाल्यावर शशिकला यांनी ओमप्रकाश सेहगल यांच्याबरोबर लग्न केले. परंतु, लग्नानंतर पतीने त्यांना खूपच त्रास दिला. त्यामुळे त्यांनी पतीला सोडले आणि लंडनला अन्य एका व्यक्तीबरोबर राहू लागल्या होत्या. परंतु, या व्यक्तीनेही त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. शारीरिक इजाही केल्या. संसारातून मन उडालेल्या शशिकला यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. त्या खूप दुःखी झाल्या होत्या. यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला. यातून सावरण्यासाठी त्यांनी इगतपुरी विपश्यना आश्रमात प्रवेश घेतला. त्या पूर्णपणे धार्मिक झाल्या. 1988 मध्ये ‘घर घर की कहानी’ चित्रपटाच्या वेळेस त्यांच्याबाबीत अशा काही घटना घडल्या की त्यांना चित्रपटसृष्टी सोडून दूर कुठे तरी जावे असे तीव्रतेने वाटू लागले. आणि त्यांनी खरोखरच चित्रपटसृष्टी सोडली आणि त्या धार्मिक पर्यटनाला बाहेर पडल्या. त्यांनी चारधाम यात्रा केली. ऋषिकेशच्या आश्रमात राहिल्या. परंतु खरी शांती द्वारकापुरी आणि गणेशपुरी आश्रमात मिळाल्याचं त्यांनीच एकदा सांगितलं होतं.
शशिकला यांची छोटी मुलगी शैलजा तेव्हा कलकत्त्यात राहात होती. मुलीच्या एका मित्राच्या मदतीने शशिकला मदर टेरेसा यांच्या आश्रमात पोहोचल्या. परंतु एक तर त्या अभिनेत्री आणि त्यातही खलनायिकेची इमेज. त्यामुळे त्यांच्याकडे त्या चांगल्या आहेत या नजरेने बघायला कोणीच तयार नव्हते. त्यांच्या अनेक मुलाखती घेण्यात आल्या. शिशु भवन आणि पुण्याच्या आश्रमात त्यांना मानसिक रोगी, वृद्ध आणि कुष्ठरोग्यांची सेवा करण्यास सांगितले. येथे प्रातर्विधीपासून सर्व कामे शशिकला यांनी केली. या कामाने त्यांच्या मनाला शांती मिळाली आणि त्या परिक्षेतही पास झाल्या. त्यानंतर तीन महिन्यांनी मदर टेरेसाबरोबर त्यांची भेट झाली. तेव्हा त्या मदर टेरेसा यांना बिलगून खूप वेळ रडत होत्या. मदर टेरेसा यांच्या संस्थेसाठी काम करण्यास सुरुवात केली. गोरगरीबांची सेवा करणे हाच आपला धर्म असे त्यांनी मानले होते. जवळ-जवळ नऊ वर्षे त्यांनी अशा प्रकारे समाजसेवा केली.
1993 ला त्या परत आल्या तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलीला कँसर झाल्याचे समजले. दोन वर्षातच मुलीचे निधन झाले. मुलीच्या लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी शशिकला यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. याच दरम्यान त्यांनी मालिकांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी जे काही भोगले आहे ते त्यांच्या चेह-यावर कधीही दिसू दिले नाही आणि हाच त्यांचा खरा अभिनय म्हणता येईल.
100 पेक्षा अधिक चित्रपटात शशिकला यांनी काम केले. 2005 पर्यंत त्या चित्रपटांत कामे करीत होत्या. 2007 मध्ये भारत सरकारने शशिकला यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरवले होते आणि 2009 ला राज्य सरकारचा व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.