(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : UPI गंडलं! भांडी घासण्याची वेळ; जय-वीरू : पडद्यामागची कहाणी भाग - 4
BLOG : मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही अहमदनगरमध्ये बाईट्स घेतले आणि पुढे रवाना झालो. शिर्डी तसं आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण साईंच्या शिर्डीला काही तासांसाठी कर्मभूमी करता आली तर आयुष्य सार्थकी लागेल हा विचार मनात आला. त्यामुळे दुपारी नगर सोडलं आणि नंतर गाडी थांबली ती थेट साई मंदिरासमोर. काही महिन्यांपूर्वी शनिशिंगणापूरला गेलो असता, रस्त्यात सहयाद्री नामक हॉटेलमध्ये जेवलो होतो, स्वस्त आणि मस्त. आता ही तसंच ठरलं होतं, पण तेवढ्यात नितीन ओझा सरांचा फोन आला, ते म्हणाले "इथेच या जेवायला..." म्हटलं ठिके! नितीन ओझा म्हणजे शिर्डीचे स्थानिक रिपोर्टर. दुपारी 1.30 वाजता साई मंदिरासमोर गाडी थांबली. नितीन सर वाट बघत होते. येताच आम्हाला थेट जेवायला घेऊन गेले. पालक खिचडी, डाळ खिचडी आणि ग्लास भर ताक...आत्मा तृप्त झाला!
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची वेळ घेतली होती. ते काहीच मिनिटांमध्ये येणार होते. नितीन सर म्हणालेच होत.."खुप साधं राहणीमान आहे खासदारांचं..वाटणारच नाही की ते खासदार आहेत.." आणि झालं ही तसंच. सदाशिव लोखंडे आले..आम्हाला भेटले...हॉटेलमध्ये बसून आम्ही चर्चा केली आणि पुन्हा बाहेर पडलो. आता वेळ होती लोखंडेंना माईक लावायची...आमचे कॅमेरापर्सन अनिल सर आले आणि माझ्या कानात विचारलं.."माईक कुणाला लावायचाय...खासदार कोण आहे?" मला नितीन सरांचे शब्द नि शब्द आठवत होतं. पण एक गोष्ट खरं आहे..3 टर्म आमदार - 2 टर्म खासदार आणि तरी देखील सदाशिव लोखंडेंचं राहणीमान एखाद्या सामान्य घरातील व्यक्ती प्रमाणे आहे. महत्वाचं म्हणजे त्यांचा स्वभाव देखील तसाच. इंटरव्हिव झाल्यावर लोखंडे म्हणाले,"चला तुम्हाला नंबर वन लिंबू पाणी पाजतो..बाकीच्यांना येऊदे गाडीतून आपण बाईकवरुनच जाऊ...". खरं सांगतो, आता पर्यंत प्यायलेलो सर्वात उत्तम लिंबाचा रस होता तो...मुंबईत लिंबाचा रस म्हणजे साखरेच्या पाण्यात जरासा लिंबू असतो पण ते या उलंट होतं. खरं तर आम्हा मुंबईकरांना मुंबईत सगळ्याबाबतीत बेस्ट वाटते पण मुंबईपलीकडेही जग आहे हे आम्हाला मान्य करायलाच हवं.
इंटरव्हिव झाला, लिंबू सरबतही झालं...पुढे काय? आमचे बाईट्स बाकी होते, लोकांशी चर्चा करणं महत्वाचं होतं. घड्याळात चार वाजले होत त्यामुळे अंधार काय एवढ्यात पडणार नव्हता. पण झालं असं की त्यादिवशी शिर्डीत होती रंगपंचमी आणि पाच वाजता साईंची रथ यात्रा होणार होती. त्यामुळे गर्दी आणि रंगांमुळे आम्हाला बाईट्स घेणं शक्य नव्हतं. म्हटलं जाऊदे..हॉटेलवर जाऊ. आता हॉटेल बूक करताना पण एक गंमत झाली. आम्ही मुंबई ऑफिसला एक साधं हॉटेल सजेस्ट केलं होतं जे त्यांना ऑनलाईन महाग दाखवत होतं. त्यांनी नंतर समोरुन एक हॉटेल बूक केलं जे त्यांना बजेटमध्ये मिळालं. हॉटेलला गेल्यावर समजलं हे तर 5 स्टार आहे आम्हीतर साधंच मागत होतो. म्हटलं..साईंची कृपा! त्या दिवशी रात्री साधंच जेवलो आणि झोपून गेलो. सकाळी शिर्डीत बाईट्स करुन नाशिक गाठायचं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर बाहेर पडलो. सर्वात आधी साई मंदिरात जाऊन साईंचं दर्शन घेतलं. मी नोव्हेंबरमध्येच येऊन गेलो होतो...ही माझी दुसरी फेरी होती. नितीन सरसोबत असल्यानं दर्शन पटकन झालं. कधी नव्हे तो माथी टिळाही लावला आमच्या. तिथू बाहेर पडताच आधी माईक हाती घेतला आणि बाईट्स घेऊ लागलो. लोकांचे बाईट्स घेताना जाम मजा आली. एका ठिकाणी उत्तरभारतातून काही नागरिक आले होते त्यांना विचारलं कुणाची सत्ता येईल...एक म्हणाला "मोदी आयेगा"...दुसरा म्हणाला "नहीं आयेगा"..या आयेगा..नहीं आयेगाचं रुपांतर पुढे भांडणात झालं. ते इतका वेळ सुरु होतं की आम्ही बाकीच्या लोकांचे बाईट्स घेऊन आलो तरी यांचं सुरुच तं..."आयेगा...नहीं आयेगा".
शिर्डीची मोहिम फत्ते होताच नितीन सरांचा निरोप घेतला, गाशा गुंडाळला आणि नाशिकला रवाना झालो. पंरंपरेनुसार, सगळे कारमध्ये बसले आणि मी विनोद सरांसह बाईकवर. महामार्गावर एका टेप्मो चालकानं आम्हाला हात दाखवला आणि गाडी थांबवायला सांगितली. आम्ही साईडला येताच म्हणाला..."पाहतो मी तुमचा कार्यक्रम...भन्नाट आहे". प्रक्षकांकडून आलेल्या प्रतिक्रिया भावनिक करुन टाकतात. टेम्पो पुढे गेला पण आम्ही तिथेच उसाचा रस प्यायला थांबलो. 5 मिनिटात आम्ची कार सुद्धा पोहोचली. सगळ्यांनीच थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे निघालो. दुपारी अडीच वाजता आम्ही नाशकात दाखल झालो. सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते...जेवायचं कुठे असा प्रश्न नाशकात विचारायचा नसतो म्हणून आम्ही थेट गाठलं 'दिवट्या बुधल्या'. संध्याकाळी 4 वाजता केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची मुलाखत ठरली होती. आम्ही वेळेत होतो पण जेवणानं उशीर केला, दिलेली ऑर्डर अर्ध्यातासानं आली. 4 एवजी आम्ही 4.25ला भारतीताईंच्या निवासस्थानी पोहोचलो. तिथे आम्हाला भेटले आमचे ब्युरो चिफ मुकूल कुलकर्णी सर आणि प्रांजल कुलकर्णी सर. दोघेही धमाल आहेत.
मी मुंबई ऑफिसला असताना अनेकदा भारती पवारांचे बाईट्स किंवा मुलाखती येतात पण ते इतकं नॉर्मल आणि साधं सरळ असतं की प्रायॉरीटीमध्ये ते कधीच नसतं. माझं मत भारती पवारांबद्दल फार काही खास नव्हत, खरच सांगायचं तर मला त्या खुप स्ट्रिक्ट आणि बोरिंग वाटायच्या. आपम कुणालातरी पटकन जज करतो आणि फसतो ना...माझंही तसंच झालं. भारती पवारांसोबत आम्ही दीड तास होतो आणि या दीड तासात त्यांच्याबद्दलचं माझं मत हे पूर्ण बदलून गेलं. आम्ही त्यांच्या घरी पोहोचताच फार वेळ वेटिंगवर न ठेवता आम्ही 10 मिनिटांत त्यांनी भेट दिली. सतत गंभीर चेहरा, धारदार नजर आणि स्ट्रिक्ट वाटणाऱ्या भारती पवार खरं तर फार विनोदी आणि जॉली आहेत. आत जाता जे दडपण होतं ते खुर्चीवर बसताक्षणी निघून गेलं. मला खरच वाटलं होतं की त्या बाईकवर बसणार नाहीत पण सर्वात जास्त एक्सायटेड त्याच होत्या. आम्ही मुलाखत सुरु करण्यापूर्वी जवळपास अर्धातास गप्पा मारल्या पण त्यात एक वाक्यही राजकारणाचं नव्हतं. आम्ही फिल्म या विषयावर जळपास 20 मिनिटं बोललो. त्यातही साऊथ इंडियन चित्रपट सृष्टी कशी बहरली आहे या विषयावरही मस्त गप्पा झाल्या. भारतीताई यांना चित्रपटांबद्दल जाण आहे हे त्या अर्ध्यातासात सहज समजून गेलं. त्यांनी आम्हाला संसदेतील त्यांचे आणि हेमा मालिनी यांचे अनेक किस्से पण सांगितले.
बाहेर लाईट कमी होत होती म्हणून आम्ही गप्पा आवरल्या अन्यथा त्या काही थांबल्या नसत्या. पुढच्या काही मिनिटांत भारतीताई आमच्यासह बाईकमध्ये बसल्या होत्या. आज पर्यंत कॅमेरासमोर सतत गंभीर असणाऱ्या भारतीताईंची विनोदी बाजू आज पहिल्यांदाच पाहिली. आमच्यापेक्षाही जास्त विनोद त्याच करत होत्या. प्रत्येक राजकीय प्रश्नाला त्यांच्याकडे फिल्मी उत्तर होतं. प्रत्येक प्रश्नाला ते शोलेती एक प्रसंग जोडून उत्तर द्यायचे. हळूहळू ही मुलाखत शेवटाकडे आली...एका फिल्मचा दि एंड करावा तसाच एंड भारतीताईंनी केला...डाव्याबाजूला गोदावरी नदी होती आणि इतक्यातच एक गाय सुध्दा बाजूने गेली. भारतीताई लगेच म्हणाल्या.."बघा..गंगा मैंया पण आहे आणि गौमाता पण गेली.."
खरं सांगायचं तर कधीच संपू नये अशी वाटणारी ही मुलाखत गोदावरीच्या काठी गौमातेचा साक्षीनं संपन्न झाली.
यानंतर सुद्धा आम्ही काही मिनिटं गोदाकाठी गप्पा मारत उभे होतो. त्यावेळी मी भारतीताईंनी माझं त्यांच्याबद्दलचं आधीचं मत आणि आता बदललेलं मत थेट सांगितलं. मला वाटलं होतं त्यांना राग वगैरे येईल पण तसं काहीच झालं नाही. मुळात त्या अजूनही 'शोले'त होत्या. मला म्हणाल्या..."तुम्हाला मतदार संघ मिळाला नाही पण बंसती तरी मिळू दे...". हे इतकं कॅज्युअल होतं की पुढे मी माझी लव्ह स्टोरीच सांगणार होतो पण विनोद सरांनी आवरलं. तिथून निघालो, पुन्हा त्यांच्या निवास्थानी गेलो...चहा वगैरे घेतला आणि थेट नाशिकचं ब्युरो गाठलं. इतकं भन्नाट ऑफिस आहे की माझी नाशिकला बदली केली तरी मी हसत हसत जाईन.
दुपारी बुधल्याला जेवलो होतो त्यामुळे रात्री दुसरीकडे जायचं होतं. प्रांजल सरांना सांगितलं.."बघा..घेऊन चला कुठे तरी...". रात्री सर हॉटेलवर आले आणि आम्हाला एका घरगुती खानावळीत घेऊन गेले. अनेक दिवसांनी घरी जेवल्याचा फील आला. रात्री आम्ही लवकर झोपलो कारण सकाळी आम्हाला भास्कर भगरेंच्या गावी पोहोचायचं होतं. सकाळी 7 वाजता हॉटेल सोडलं आणि 8.30 वाजता गोंडेगावात पोहोचलो. गावातील रस्ता फक्त 7 फुट रुंद होता पण त्यातील काही भाग हा चक्क काँक्रीटचा होता. आम्ही भास्कर भगरेंच्या घरी पोहोचलो आणि मुकूल सरांना पुन्हा विचारलं...हे खरच यांचं घर आहे? त्याचं कारण म्हणजे..इतर ते घर नेत्यांना साजेसं नव्हतं. गावातील एक साधं घर कसं असू शकत? तुमच्या डोळ्यासमोर येणारं घर म्हणजे भास्कर जाधवांचं घर. पेशानं शिक्षक असलेल्या भास्कर भगरेंची जबरदस्त शेती सुद्धा आहे. मस्त गवती चहा त्यांनी आम्हाला पाजला आणि मुलाखत सुरु झाली. गावातच फेरफटका मारला आणि भगरे आम्हाला घेऊन त्यांच्या शाळेत आले. एबीपीची बाईक गावात आली आणि या बाईकसह फोटो काढण्यासाठी त्यांनी शाळेतील मुलांना बाहेर बोलावलं. भास्कर भगरे म्हणजे साधा माणूस.
ही मुलाखत संपली आणि त्याचसह आमचा नाशिक दौरा. पुढचा जिल्हा होता जळगाव. पुन्हा नाशिक शहरात जाण्यात तसा काही अर्थ नव्हता पण नंतर लक्षात आलं की आमच्या बॅगा नाशिकच्या हॉटेलमध्येच आहेत आणि मुकूल सरांना सुद्धा ड्रॉप करायचं होतं. आम्ही ठरवलं की फक्त कार नाशिकला जाईल..बाईक उगाच 40 किमी मागे घेऊन जाण्यात अर्थ नाही.
तोंडावर ओला रुमाल, डोळ्यांवर ग्लॅर्स आणि डोक्यावर हेल्मेट घालून मी आणि विनोदसर बाईक घेऊन जळगावच्या दिशेनं निघालो. कार पुन्हा नाशिकला गेली. नाशिक ते जळगाव जवळपास 230 किमीचं अतंर होतं..आम्ही प्रवास सुरु केला. डोक्यावर तळपणारा सुर्य आणि खाली गरम होणारी बाईक...मला ओव्हनमध्ये बसल्यासारखं वाटत होतं. पण आम्ही प्रत्येक गोष्टीची मजा घेत होतो..त्यामुळे त्रास झाला नाही.
आम्ही मालेगावनंतर मागून येणाऱ्या सहकाऱ्यांना भेटायचं ठरवलं होतं पण भेट काही झालीच नाही. मालेगावात पोहोचल्यावर मी एका सहकाऱ्याला फोन केला तर ते 90 किलोमीटर मागे होते. म्हटलं थांबण्यात अर्थ नाहीए..आम्ही उसाचा रस घेतला आणि पुन्हा निघालो. मालेगावमध्ये मला फक्त आणि फक्त भीषणता जाणवली. उंचच्या उंच चिमण्या आणि त्यातून येणारा धूर. सगळं काही भकास आणि उध्वस्त वाटत होतं. मी विनोद सरांना म्हटलं, "इथून लवकर चला..".
आम्ही 1.30 वाजता धुळ्यात पोहोचलो. म्हटलं दोघे तर दोघे...जेऊन घेऊ. आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांना फोन केला. त्यांनी जेवणासाठी एक हॉटेल सजेस्ट केलं. धुळे महामार्गावरुन जळगाव बायपासवर उतरलो आणि हॉटेल शोधू लागलो. पत्ता विचारताना माझं लक्ष माझ्या हातावर गेलं. अक्षरशः काळा पडला होता हात. पत्तासोडून हात बघत बसलो आणि एवढ्यात विनोद सरांना पुढे हॉटेल दिसलं. आत गेलो तर समजलं..हा कट्टर दारुड्यांचा बार सुद्धा आहे. आम्ही डाळ-भात आणि चपात्या मागवल्या. आमची ऑर्डर येई पर्यंत आम्ही आमच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या काकांना पाहत होतो. 15 मिनिटांत काकांनी अख्की क्वॉर्टर संपवून टाकली. पुन्हा दुसरी मागवली...ती सुद्धा 10 मिनिटांत रिकामी. आम्ही मनुष्य प्रजातीचे असल्याकारणानं खुप जज केलं त्यांना..त्यांच्याकडे पाहत असतानाच आमची ऑर्डर आली. पहिली चपाती खाल्ल्यानंतर विनोद सरांनी आणखी एक चपाती सांगितली पण वेटर चार पावलं पुढे जाताच त्याला आवाज देत कॅन्सल केली. मी विचारलं..का? ते म्हणाले.."ज्या हाताने वाढलं त्याच हाताने पाठ खाजवतोय तो वेटर...परत त्याच हाताने वाढणार..". मी मनातल्यामनात म्हटलं, "माती केली आणि विचारलं...आता अन्न कसं पोटात जाणार देव जाणे."
जेवता जेवता सिद्धेशचा फोन आला..ते सुद्धा जेवायला बसले होते. त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने माझ्याकडे मागितले. मी गुगल पे वरुन ट्राय केलं तर झालंच नाही. फोन पे सुद्धा बंद. मी त्याला म्हटलं कुणाला तरी सांग द्यायला मी देतो माझं होतं नाहीये. फोन ठेवला आणि दुसरा धक्का बसला. माझ्याकडे माझं पाकीट सुद्धा नव्हत..त्यात कॅश आणि कार्डं होती त्यातून झालं असतं पेमेंट. विनोद सरांचं पण पाकीट कारमध्ये होतं आणि त्यांचा फोन बंद झाला होता. आम्ही पुरते गोंधळलो होतो. धनंजयला फोन करायचा का असा विचार आला..पण म्हटलं बघू...पेपंट करण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. आता भांडी घासावी लागणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण नशिब बलवत्तर होतं म्हणून वाचलो...शेवटचा ट्राय म्हणून हॉटेलच्या स्कॅनरवर पैसे पाठवले आणि गेले सुद्धा. निवडणूक जिंकल्यासारखा आनंद झाला होता मला.
जेवण झाल्यामुळे जितका आनंद झाला नाही तितका आनंद पैसे दिल्यामुळे झाला. हॉटेलच्या बाहेर पडलो तर शेजारच्या टेबलवर दारू 'प्राशन' बसलेले काका सुद्धाबाहेर पडले, हलत-डुलत होते. मगाशी ज्यांना आम्ही साधा मजूर समजलं त्यांनी खिशातून चावी काढली आणि Wagon R चं दार उघडलं. विनोद सर आणि मी एकमेकांकडे पाहतच राहिलो..म्हटलं, "या पुढे इतक्या लवकर कुणालाच जज नाही करणार"
पुन्हा सिद्धेशला फोन केला तर ते मालेगावात होते..म्हटलं "या तुम्ही..आम्ही जातो पुढे..".
तापमान वाढू लागलं होतं, वाऱ्यात उष्णता होती..जळगाव जवळ आलं होतं. जळगावला जाणारा महामार्ग पकडला आणि वाऱ्याच्या वेगाने निघालो. खुप धमाल रस्ता होता. कितीही नाही म्हटलं तरी उन्हाचा त्रास होत होता. आम्ही तोंडावर लावलेला रुमला सारखा ओला करायचो त्यामुळे पाणी सुद्धा संपलं होतं. अखेर सहन झालं नाही आणि पुन्हा उसाचा रस प्यायला थांबलो आणि पाणी सुद्धा घेतलं. तिथून निघालो आणि अर्ध्यातासात जळगावात पोहोचलो. नावाप्रमाणे जळगाव..जळत होतं.
हॉटेलवर पोहोचलो तरी विनोद सरांना फोन काही चालू होईना. चेकीन करायच्या आधी पुन्हा बाहेर पडलो आणि गोलानी मार्केटमध्ये पोहोचलो. मोबाईल दिला आणि माघारी हॉटेलवर आलो. अंघोळ केली आणि थेट निवांत बेडवर पसरलो...
पुढची कहाणी... भाग पाच मध्ये
याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा :
- काळाकुट्ट अंधार आणि टायर पंक्चर! जय-वीरू : पडद्यामागची कहाणी भाग - 2
- BLOG : शूटचा गोंधळ ते पोटात गडबड, जय वीरू - पडद्या मागची कहाणी! (भाग 1)