'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील नांदर गावात संवाद साधल्यानंतर शेतकऱ्यांशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी विचारणा केली.

Uddhav Thackeray In Maharashtra: अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात असं नुकसान झालं आहे ते नुकसान कधी भरून निघणार नाही. शासनाने कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना आतापर्यंत एक पैशाची देखील मदत केली नाही, अशा शब्दात महापुरात सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उद्धव ठाकरे आजपासून (5 नोव्हेंबर) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज पहिल्या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत कर्जमाफी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा शब्द दिला. उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील नांदर गावात संवाद साधल्यानंतर शेतकऱ्यांशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी विचारणा केली.
कोणीच पंचनामे सुद्धा करायला तयार नाही (Marathwada Farmer on loan waiver)
यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले की, घटमाळेपासून पैसे टाकू म्हटले, अजून पैसे शेतकऱ्याला पोहोचले नाहीत. मे पासून पाऊस चालू आहे, आमच्या मंडळात जास्त पाऊस असताना अजून एक रुपयाचं सुद्धा अनुदान आलेलं नाही. इथं लोकांच्या कोंबड्या वाहून गेल्या, बकऱ्या वाहून गेल्या. कोणीच पंचनामे सुद्धा करायला तयार नाही. शेतकऱ्यांनी सांगितले की, उद्धव साहेबांनी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली, तीच कर्जमाफी या सरकारकडून शेतकऱ्याला अपेक्षित आहे. लवकरात लवकर शेतकऱ्याला नुकसान भरपाईची मदत जाहीर करावी, अशी विनंती असल्याचे शेतकरी म्हणाले.
त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती (Marathwada Farmer on Mahayuti Government)
शेतकरी म्हणाले की, शासन ज्यावेळी सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती. आज 14-15 महिने झाले तरी त्याची पूर्तता नाही. या सरकारनं आम्हाला निश्चित आश्वासन दिली, आतापर्यंत काही मदत करण्याची त्यांची काही भावना नाही. उलट अजित पवार सांगत आहे, बँकेच लोन भरा महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक आहे. उद्धव साहेबांनी दौरा काढून शेतकऱ्यांना एक दिलासा दिला आहे. आम्ही उद्धव साहेबांच्या भाषणाबद्दल समाधानी आहोत. साहेबांनी तुमच्या मागण्या मी तुमच्या पदरात पाडूनच देईल तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांनी गावकऱ्यांना वचन दिलंय. साहेबांनी जे शब्द दिले ते समाधान वाटले आम्हाला. शेतकऱ्यांचा आणि युवकांचा त्यांच्यावर 100 टक्के विश्वास आहे. तसेच, शेतकरी त्यांच्या मागं आम्ही खंबीरने उभा आहे. त्यांनी जर प्रयत्न केले तर मिळेल असं वाटतंय, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या

























