BLOG : पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो!
BLOG : ग्रामीण असो वा शहरी, मराठवाड्यात पाणी या दोन अक्षरी शब्दाभोवती जीवन फिरते. सध्या नळाला पाणी आणि गावात टँकर येण्याच्या आनंदाएवढी दुसरी कोणतीही चांगली गोष्ट नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि शहरात पाण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली जातेय. आतापर्यंत आपण पाण्यासाठी दिवसा सुरू असलेली धडपड पाहिली असेल, पण लोक सगळी रात्र पाण्यासाठी जागून काढतात.
दुष्काळाच्या अनेक बातम्या केल्या. अंबळनेरला टँकरची लाईन लागलेली होती त्यावेळी मोफत पाणी देणाऱ्या मुंदडा म्हणाले की, इथून 24 तास टँकर पाणी भरतात. मग मनात एक प्रश्न आला रात्री पाणी भरून सकाळी पाणी गावात घेऊन जात असतील, म्हणून सहज टँकर ड्रायव्हरला प्रश्न विचारला की गावात पाणी सकाळी देता का रात्री. तो म्हणाला, रात्री कधी बारा वाजता, एक वाजता, दोन वाजता, कधी पहाटे चार वाजताही पाणी द्यावं लागतं. त्यावेळी त्याला म्हणाला आम्हाला सोबत घेऊन जाशील का? त्याच तो म्हणाला की चला तुम्हाला ग्रामीण भागातल्या पाणी मिळवण्यासाठीची धडपड पाहायला मिळेल.
वेळ रात्री 10 वाजताची, गंगापूरच्या अंबळनेरच्या विहिरीवर टँकर भरत होता . त्याच्या मागे चार टँकर उभा होती. त्यांचा नंबर लागेपर्यंत कदाचित रात्रीचे बारा वाजतील. 10 वाजून 18 मिनिटांनी टँकर भरलेले होता. ड्रायव्हरने स्टार्टर मारला आणि आमचा टँकर सोबतचा प्रवास सुरू झाला. तोवर ड्रायव्हरला गावकऱ्यांचा फोन सुरू झाला होता. कुठवर आलाय, किती वेळ लागेल ही सगळी चौकशी गावकरी करत होते.
रात्रीचे 11 वाजले, अजून दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास करायचा होता. गाव खेड्याचा रस्ता असल्यामुळे रात्री उशिरा ट्राफिक नसल्याने आम्ही ड्रायव्हर नागेश शिरसाट सोबत आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की कधी अकरा वाजता, कधी बारा वाजता, कधी पहाटे तीन वाजता तर कधी सकाळी सहा वाजता आम्ही टँकरने गावात पाणी देतो. गावाचे लोक त्याही वेळेस वाट पाहत असतात. हॉर्ण दिले की लोक जागे होतात आणि पाणी भरण्यासाठी गर्दी करतात.
अंबळनेरपासून 25 30 किलोमीटरचा प्रवास करून गंगापूर तालुक्यातील 9 हजार लोक वस्ती असलेल्या वाहेगावमध्ये आम्ही पोहोचलो. त्यावेळी काही लोक टँकरची वाट पाहत वेशीवर बसले होते. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी कुठल्या आळीला टँकर घेऊन जायचं आहे या संदर्भात ड्रायव्हरला सूचना केल्या. गावात टँकर पोचले की मोठ्या टाक्या घेऊन महिला,पुरुष टँकरकडे धाव घेत होते . हंडे, बकेट घेऊन पाण्यासाठी धडपड सुरू होते.
म्हातारे कोतारे झोपलेले तर महिला आणि तरुण डोक्यावर पाण्याच्या टाक्या घेऊन टँकरच्या दिशेने धावत होती. त्यात एक महिला ओरडत होते की प्रत्येक वेळी तुम्ही त्याच गल्लीत टँकर घेऊन जाता. मी तासाभरापासून दारात उभी आहे. माझ्या दारातल्या दहा-बारा टाक्या रिकाम्या आहेत. आठ दिवसांपासून तुम्ही मला पाणी दिलं नाही. टँकरचा ड्रायव्हर हे सगळे ऐकत होता. थांबा ताई, मी तुमच्याकडे येतो हे सांगत होता. तासा-दीड तासामध्ये 24 हजार लिटर पाण्याचा टँकर खाली झाला.
टँकरच्या बाजूला एक साधं पत्र्याचे घर, त्याच्या घरासमोर 25 हांडे, चार-पाच कळशा, छोटे-मोठे पाच-सात घमेले, हजार लिटरची पाण्याची टाकी, 200 लिटरची पाण्याची टाकी आणि दीडशे लिटरच्या आणखीन एक पाण्याची टाकी पूर्ण भरलेली होती. त्यासाठी घरातले सगळे अर्धा तास मेहनत करत होते. हंड्यानं जमेल तेवढं पाणी भरत होते. घरातलं छोट भांड देखील त्यांनी भरून घेतलं होतं. त्याचं कारण होतं पुन्हा टँकर दोन दिवसांनी येईल का नाही माहीत नाही. ग्रामीण भागातल्या पाण्यासाठीची ही रात्रीची धडपड निश्चित जीवाला घोर लावणारी होती.
एवढं करून सकाळी लवकर उठायचं आवरायचं आणि शेतीच्या कामाला जायचं. दुष्काळाशी सामना करणाऱ्या ग्रामीण भागातलं हे चित्र केवळ दहेगावच नाही तर मराठवाड्यातल्या प्रत्येक गावच.
बरं खेडेगाव तर सोडा, शहरातलीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक भागात मध्यरात्री 12 ते पहाटे पाच वाजेपर्यंत पाणी दिलं जातं. त्यामुळे शहरातली लोकही रात्रभर जागी असतात.
वेळ रात्रीचे पावणेदोन वाजताची. दहेगावपासून चाळीस-पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आम्ही शहरात पोहोचलो. शहरातील हनुमान टेकडी भागात पाणी आलं होतं. लोक जागी होती. रातकिड्यांचा आवाज नाही तर आवाज येत होता तो नळाला पाणी जास्त मिळावं म्हणून लावलेला मोटारीचा. निरंजन कॉलनीतले पुरुष मंडळी जागी होती. पाणी आल्यापासून ते पाणी जाईपर्यंत त्यांची पाणी भरण्याची धडपड सुरू होती.
इथलीच निकुंजनगर कॉलनी. आख्खी कॉलनी जागी होती. कारण आठ दिवसातून एकदा पाणी आलं होतं तेही एक तास येणार असल्याने पुरुष मंडळाची पाणी भरण्याची लगबग सुरू होती. छत्रपती संभाजीनगर शहरात रात्रभर पाणी येतं कुठे पहाटे तीन वाजता कुठे चार वाजताही.
पाणी सोडणारा महानगरपालिकेचा लाईनमन पाण्याच्या नियोजनाबाबत सांगू लागला. शहरातल्या पाण्याची कथा सांगताना त्याला पुढे पाणी सोडायचं होतं, पुढच्या कॉलनीतील लोक त्याला फोन करत होती. तो सांगत होता आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून? जशी टाकी भरते तसं पाणी सोडतो. कधी दोन-तीन दिवस उशीरही होतो.
वेळ पहाटेच्या साडेचारची. ठिकाण संभाजीनगर पैठण रोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वॉलमधून पाणी भरणं सुरू होतं. आता यांची सकाळ झाली होती. पाण्यासाठी दिवसाची रात्र सुरू झाली होती. याचवेळी आठवलं 'पाणी रे पाणी तेरा रंग कैसा'. त्या रंगाचे वर्णन करताना मी एवढं म्हणेल तो रात्रीच्या कुट्ट अंधारा एवढा गडद ही आहे. तो दिवसा सूर्यप्रकाशाएवढा लख्ख आहे. तो रंग आमच्यासारखा तेव्हाच होतो जेव्हा दोन-चार हंडे पाणी मिळतं आणि रात्रभर दुष्काळाशी सामना करणारे लोक जेव्हा पाहण्यासाठी अखिल रात्र जागून काढतात त्यावेळी पाण्याला जीवन का म्हणतात हे स्पष्ट होतं.
आपल्याकडे शेतामध्ये सुद्धा पाटाने पाणी देण्याची पद्धत होती. काही वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या शेतात ठिबक सिंचनाने पाणी देऊ असे सांगितले असते तर आपण कदाचित त्यावरती विश्वास ठेवला नसता. मात्र आज ठिबक सिंचचाने पाणी देण्यासाठी सुद्धा शेतात पाणी उपलब्ध नाही. पाण्याच्या एका थेंबासाठी दिवस रात्र जागरण करून पाणी जमा करावे लागते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी केलेला हा संघर्ष जेव्हा पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा मात्र सोयीस्करपणे विसरला जातो. आपले नियोजन हे पुढील वर्षीच्या जूनपर्यंत चेक केलेले असते. मात्र जर एखाद्या जूनमध्ये पाऊस झाला नाही तर काय? यासाठी पाण्याचे दोन ते तीन वर्षाचे नियोजन करून, जेव्हा पाणी उपलब्ध असते तेव्हा सुद्धा पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा जपून वापर करणे गरजेचे असते.