(Source: Poll of Polls)
Blog : 10 dulkar’s 10... अर्थात सचिनच्या दहा यादगार खेळी
BLOG Sachin Tendulkar : 'द सचिन तेंडुलकर' आज 50 वा वाढदिवस साजरा करतोय. तमाम क्रिकेटरसिकांना 24 वर्षं मनमुराद आनंद देणाऱ्या, आपल्याला वेदना,दु:ख, निराशा विसरायला लावणारा खेळ त्याने केला. त्याच्या फलंदाजीने मनाला कायम सुखावलं. सचिन निवृत्त होऊन आज दशक उलटलंय. तरीही त्याच्या असंख्य खेळी आजही पुन्हा पुन्हा यू ट्यूबवर पाहाव्याशा वाटतात. अनेक इनिंग तर फ्रेम बाय फ्रेम लक्षात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 शतकं आणि 164 अर्धशतकं अशी अचाट कामगिरी त्याने केलीय. काही छोट्या पण, लक्षात राहणाऱ्या इनिंगही त्याने केल्यात. सचिनच्या मला आवडलेल्या अशाच 10 इनिंग्जच्या मैदानात जरा फेरफटका मारुया.
1) शारजात सचिन नावाचं वादळ
22 एप्रिल 1998, शारजा - 131 चेंडूंत 143 धावा - 9 चौकार, 5 षटकार
टीम इंडिया शारजातील तिरंगी मालिकेत फायनल गाठण्यासाठी धडपडत होती. सेमी फायनल मॅचसारखं महत्त्व या सामन्याला होतं.
समोर होती स्टीव्ह वॉच्या खडूस कांगारुंची टीम. भारतासमोर 285 चं आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात आलं. त्याच वेळी मैदानात वाळूचं वादळ आलं. काही मिनिटे खेळ थांबला. लोकांचे डोळे चुरचुरले. लोक डोळे चोळू लागले. हे वादळ थांबलं आणि नंतर आलं सचिन नावाचं वादळ. डोळे दिपवणारं. खेळाचा सुमारे 25 मिनिटांचा वेळ वाया गेल्याने विजयासाठीचं लक्ष्य आलं 46 षटकांत 276 किंवा फायनल गाठण्याकरता 46 षटकांत 237 रन्स. धावांचा पाठलाग करताना भारत एका वेळी चार बाद 138 अशा अडचणीत होता. तेव्हा सचिनच्या साथीला होता युवा फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण. त्याच्या या आक्रमक खेळीत 9 चौकार 5 षटकारांची आतषबाजी झाली आणि टीम इंडियाने फायनल गाठली. वाळूच्या वादळाने त्रास दिला, तर सचिन नावाच्या वादळाने दिला मनाला सुखद गारवा.
2) बर्थ डे गिफ्टचा शतकी नजराणा
24 एप्रिल 1998, शारजा - 131 चेंडूंत 134 धावा - 12 चौकार, 3 षटकार
तीन दिवसात दुसऱ्यांदा सबकुछ सचिन तेंडुलकर असा सामना झाला. पुन्हा एकदा ऑसींविरुद्ध धावांचा पाठलाग सुरु होता. तिरंगी मालिकेतली फायनल. 237 चं लक्ष्य समोर. वाढदिवसाला सचिनने चाहत्यांना शतकी गिफ्ट दिलं. अझरच्या साथीने सचिनने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. सचिन कॅस्प्रोविच, मूडी आणि कंपनीला छतावर भिरकवत होता. ‘लिट्ल मॅन हॅज हिट अ बिग फेलो फॉर सिक्स’, अशी टोनी ग्रेग यांची एनर्जिटिक कॉमेंट्री. त्यांच्या आवाजाने आपल्याला घरातच स्टेडियममध्ये मॅच बघितल्याचा भास व्हायचा. या खेळीसाठी सचिनला सुनील गावसकरांनीही कौतुकाची थाप दिली. ते म्हणाले, ही खेळी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळाली, हे आपलं भाग्यच. 22 आणि 24 एप्रिल या दोन्ही इनिंग पुन्हा पाहून मन आजही शहारुन येतं. खास करुन अराऊंड द विकेट गोलंदाजी करणाऱ्या शेन वॉर्नला त्याने एका सामन्यात ठोकलेल्या एका षटकारानंतरचा शेन वॉर्नचा अचंबित चेहरा आजही लख्ख आठवतोय.
3) हेन्री ओलोंगाचा वचपा काढला
13 नोव्हेंबर 1998, शारजा - 92 चेंडूंत 124 - 12 चौकार, 6 षटकार
या सामन्याची पार्श्वभूमी अशी की, हेन्री ओलोंगा नावाच्या झिम्बाब्वेच्या वेगवान गोलंदाजाने सचिनला एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर आधीच्या मॅचला आऊट केलेलं. ज्याची खूप चर्चा झाली. ती मॅच भारत पराभूत झाला होता. तेव्हा ओलोंगाने बाद केलेलं सेलिब्रेशन सचिनने बहुदा लक्षात ठेवलं असावं. सचिन पुढच्या मॅचमध्ये नेहमी बोलायचा अगदी तसाच बॅटनेच बोलला. भारतासमोर 197 चं आव्हान तुटपुंजं होतं. तरी सचिन 92 चेंडूंत 124 धावांची अफलातून खेळी खेळून गेला. ज्यामध्ये 12 चौकार आणि सहा षटकारांची मेजवानी होती. यात ओलोंगाच्या 6 ओव्हर्समध्ये त्याने 50 धावा बुकलून काढल्या होत्या. स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात ओलोंगाचा चेंडू भ्रमंती करुन आला होता. सचिनने बदला पूर्ण केला.
4) सचिन पहिल्यांदा सलामीला, वनडेचा इतिहासच बदलला
27 मार्च 1994, ऑकलंड – न्यूझीलंडविरुद्ध 49 चेंडूंत 82 धावा - 15 चौकार, 2 षटकार
ऑकलंडच्या त्या सामन्यात नियमित सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू अनफिट ठरला आणि सचिनने जडेजाच्या साथीने इनिंग ओपन केली. Rest is a history असं म्हणता येईल. ती इनिंग सचिनच्या कारकीर्दीलाच कलाटणी देणारी ठरली. त्याने 49 चेंडूंत 82 धावांची वेगवान खेळी केली. ज्यात 15 चौकार आणि 2 षटकारही ठोकले. मॉरिसन, प्रिंगल, लार्सन, हॅरिस असे नावाजलेले गोलंदाज किवी टीममध्ये होते. सचिनने कुणालाही दाद लागू दिली नाही आणि इथून पुढे ‘सलामीवीर’ सचिनने करिअरचा गियर टाकला. सचिनचं करिअर आणि भारतीय क्रिकेटचं भविष्य इथून पुढे बदललं.
5) अख्तरच्या गोलंदाजीवर काळजाचा ठोका चुकवणारा ‘तो’ षटकार
1 मार्च 2002, सेंच्युरियन - 75 चेंडूंत 98 - 12 चौकार, 1 षटकार
मी पाहिलेल्या सर्वात थरारक सामन्यांपैकी एक. वर्ल्डकप 2003 मधील भारत-पाक मॅच. सईद अन्वरच्या शतकी खेळीच्या बळावर पाकने 273 चा पल्ला गाठला. आता टीम इंडियासमोर 274 चं आव्हानात्मक लक्ष्य होतं. सचिन-सेहवाग मैदानात उतरले. समोर होतं पाकचं आणि कदाचित त्यावेळचं सर्वोत्तम वेगवान आक्रमण. अक्रम, अख्तर आणि वकार. या वेगवान त्रिकूटावर सुरुवातीपासूनच प्रतिहल्ला चढवण्यात आला. सचिनने वीरुसह 5.4 ओव्हर्समध्ये 53 धावांची तुफानी सलामी दिली. या खेळीदरम्यान शोएब अख्तरला थर्डमॅनच्या दिशेने सचिनने प्रेक्षकांमध्ये ठोकलेला षटकार आठवून आजही अंगावर शहारे येतात. ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ त्याने थेट यार्डातच पाठवली जणू. तेव्हा सचिनने मारलेला तो चेंडू थर्डमॅनच्या दिशेने हवेत गेल्यावर मी गॅलरीत येरझाऱ्या घातलेल्या मला चांगल्या आठवतात. जेव्हा बाहेर एकच गलका झाला, तेव्हाच मी घरात येऊन पाहिलं. तर तो षटकार होता. सचिनने कैफसोबत शतकी भागीदारी करत विजयाचा पाया रचला. युवी-द्रविडने त्यावर कळस चढवला. सचिनच्या अविस्मरणीय इनिंगने भारताने तितकाच संस्मरणीय विजय साकारला.
6) साकलेनला क्रीझबाहेर येत धुतला
14 जानेवारी 1998, ढाका, पहिली फायनल - 78 चेंडूंत 95 - 6 चौकार, 5 षटकार
इंडिपेंडस कपची ती अख्खी स्पर्धा सचिन जणू ठरवून साकलेनला क्रीझबाहेर येऊन अटॅक करत होता. साकलेन अत्यंत चतुर गोलंदाज. त्याच्या नियमित ऑफ स्पिनव्यतिरिक्त साकलेन चेंडूंमध्ये ‘अवे गोईंग’ चेंडूचं बेमालूम मिश्रण करत असे. त्या डावपेचांना सचिन पुरून उरला. क्रीझबाहेर येऊनच भिरकावू लागला. तर, लेग स्पिनर मुश्ताक अहमदला त्याने क्रीझमधूनच प्रेक्षकांमध्ये फेकला होता. सचिनच्या 78 चेंडूंमधील 95 धावांच्या खेळीत 6 चौकार, 5 षटकारांची पार्टी आपण साऱ्यांनीच अनुभवलेली.
7) सामना हरला, पण मनं जिंकली
28 ते 31 जानेवारी 1999, चेन्नई - 405 मिनिटांमध्ये 273 चेंडूंत 136 - 18 चौकार
भारत-पाकिस्तान कसोटी सामना... या मॅचचा निकाल दुर्दैवाने आपल्या विरोधात गेला. पण, सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये आव्हानात्मक खेळपट्टीवर सर्वोत्तम आक्रमणासमोर कशी फलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक सादर केलं. या इनिंगची कॅसेट काढून पाहिली तर उदयोन्मुख फलंदाजांना परीक्षा घेणाऱ्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची याचं ट्रेनिंग नक्की मिळेल. एका वेळी पाच बाद 82 अशा नाजूक स्थितीत असलेल्या टीम इंडियाला नयन मोंगियाच्या साथीने सचिनने 218 पर्यंत नेलं. 405 मिनिटांत 273 चेंडूंमध्ये 136 धावांची मनामध्ये कोरुन ठेवावी अशी इनिंग सचिन खेळून गेला. अक्रम, वकार, साकलेनच्या माऱ्यासमोर त्याने जी बॅटिंग केली त्याला तोड नाही. पाठीच्या दुखापतीमुळे सचिनला धावताना, फटके खेळताना प्रचंड त्रास होत होता. तरीही सचिन लढत होता. खेळत होता. दुर्दैवाने आधी मोंगियाची आणि नंतर त्याचीही विकेट गेली. भारत पराभूत झाला. पण, सचिन लाईफटाईम इनिंगपैकी एक अशी खेळी खेळून गेला.
8) शेन वॉर्नची मनसोक्त धुलाई
6 ते 10 मार्च, 1998, चेन्नई - 191 चेंडूंत नाबाद 155 धावा, 286 मिनिटांची खेळी - 14 चौकार, 4 षटकार
पहिल्या डावात पिछाडी घेऊन खेळणाऱ्या भारताला दुसऱ्या डावात चारशेचा टप्पा पार करता आला, तो सचिनच्या दीडशतकामुळे. त्याने 191 चेंडूंत 155 धावा चोपून काढल्या. 14 चौकार, 4 षटकारांचा साज त्याला होता. या खेळीचं खास वैशिष्ट्य म्हणजे वॉर्नला त्याने जागेवरुन स्टॅंडमध्ये मारलेलं. वॉर्नशी दोन हात करण्यासाठी त्याने नेट प्रॅक्टिसमध्ये खास तयारी केली होती. वॉर्नच्या प्रत्येक प्रश्नावर सचिनकडे उत्तर होतं. लेग स्पिनरला मिडविकेटवरुन षटकार ठोकणं हे सचिन लीलया करत होता. लेग स्टम्पच्या बाहेर रफ तयार करुन सचिनने सराव केला आणि वॉर्नला निष्प्रभ ठरवलं, तशीच ऑस्ट्रेलियानेही शरणागती पत्करली.
9) शतक ठोकून बाबांना आदरांजली
23 मे 1999, ब्रिस्टल - 101 चेंडूंत 140, 16 चौकार, 3 षटकार
1999 चा वर्ल्डकप सचिनसाठी अत्यंत खडतर क्षण घेऊन आला. या स्पर्धेरदम्यान त्याच्या वडिलांचं निधन झालं.
सचिन काही दिवसांचा ब्रेक घेऊन पुन्हा स्पर्धेत रूजू झाला आणि आल्या आल्या त्याने केनियाविरुद्धच्या सामन्यात थेट शतक ठोकलं तेव्हा शतक पूर्ण झाल्यावर बॅट उंचावून तो आकाशाकडे पाहतो तेव्हा आपलंही मन गलबलून येतं. आजही.. संजय मांजरेकर यांनी कॉमेंट्रीवेळी उल्लेखही केला की सचिनने हे शतक त्याच्या वडिलांनाच समर्पित केलं असणार. या शतकाचं मोल सचिनसाठी आणि आपल्यासाठीही खूप वेगळं आहे.
10) पाकच्या भूमीवर ‘नाक’ उंचावलं
9 ते 14 डिसेंबर, 1989, सियालकोट - 134 चेंडूंत 57, 193 मिनिटे, 6 चौकार
वयाची अवघी 16 वर्षे पूर्ण करणारा सचिन पाक दौऱ्यासाठी सिलेक्ट झालेला. मिसरुडही न फुटलेल्या कोवळ्या वयातल्या सचिनसमोर इम्रान, अक्रम आणि वकारसारखा तोफखाना होता. तरीही सचिन डगमगला नाही. या कसोटीत दुसऱ्या डावात चार बाद 38 अशा अडचणीत संघ होता. वकार आणि कंपनी आग ओकत होती. असं असताना सचिन-सिद्धू जोडीने भारताला त्या वणव्यातून बाहेर काढलं. सचिनने या खेळीदरम्यान वकारचा एक घातक बाऊन्सर नाकावर झेलला. नाकातून घळाघळा रक्ताचे पाट वाहिले. साऱ्यांनाच चिंता वाटली. आता काय होणार?. पण, त्या वाहिलेल्या रक्तातूनच जिद्दीची वात पेटली आणि सचिन धीरोदात्त खेळी खेळला. 193 मिनिटं खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहिला. 134 चेंडूंत 57 धावांची ही खेळी शतकापेक्षाही मोलाची होती. मॅच ड्रॉ झाली आणि इथेच एका जिनियस क्रिकेटरचा जन्म झाला. सचिन नावाच्या जिद्दीच्या वातीची मशाल झालेली पुढची 24 वर्ष भारतीय क्रिकेटने पाहिली. या मशालीने भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटही उजळून निघालं.