(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | लक्ष्य : मृत्यू संख्या कमी करणे
आजारपणाची काही लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळचे डॉक्टर किंवा रुग्णालयाशी संपर्क केला तर मृत्यू संख्या आटोक्यात येऊ शकत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहे.
गेल्या काही दिवसात कोरोनबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे ही आनंदाची बाब असतानाच दुसरीकडे रुग्णसंख्या आणि या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता रुग्णसंख्या कमी करण्याबरोबरच मृत्यू संख्या कशी कमी करता येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी अनेक लॉकडाउनच्या शिथिलतेमुळे अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. विस्कटलेली आर्थिक घडी व्यस्थतीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र या सर्व प्रकारात आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काळजी घेताना दिसतोय का ? ते शासनाने आखून दिलेले सुरक्षिततेचे नियम पाळत आहोत का ? आजही काही रुग्ण विशेषकरून वयस्कर रुग्ण आजार घरीच राहून अंगावर काढत असल्याचे बोलले जात आहे. या अशा प्रकारामुळे रुग्णसंख्या वाढत आहे आणि परिणामी मृत्यूची संख्याही वाढतच आहे. आरोग्य यंत्रणा दारावर येण्याची वाट बघण्यापेक्षा वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे नाही तर ते जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. अनेकवेळा रुग्ण अतिगंभीर झाल्यावर रुग्णलयात येत असल्यामुळे त्यांना अनेक शर्थीचे प्रयत्न करून वाचविणे अवघडून होऊन बसले आहे. त्यामुळे आजारपणाची काही लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळचे डॉक्टर किंवा रुग्णालयाशी संपर्क केला तर मृत्यू संख्या आटोक्यात येऊ शकत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहे.
गेल्या 24 तासात देशभरातील सर्वच वर्गवारीत कोरोनाशी निगडित संख्या विक्रमी वेगाने वाढल्या आहेत. राज्यात काही फारसे बदल नसून त्याचपद्धतीचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागले 13 जाहीर केलेल्या आकडेवारीसनुसार राज्यात 9115 रुग्ण बरे होऊन घरी बरे गेले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 3,90, 958 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत . यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 % एवढे झाले आहे. तर 11,813 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 413 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे . सध्या राज्यातील मृत्यूदर 3.4 % एवढा आहे.
मुंबई महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी संचालक आणि मुंबई कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे, सांगतात की, "मृत्यू संख्या वाढणे ही खरंच चिंतेची बाब आहे. ती संख्या कमी करण्याकरिता जास्त कष्ट घेण्याची गरज आहे. यामध्ये येणाऱ्या रुग्णांचा 'पॅटर्न' सारखाच आहे. मृत्यू संख्येत तरुणाची संख्या कमी आहे. आजही जे मृत्यू होत आहेत त्यामध्ये वयस्कर आणि ज्यांना आधी पासून जुन्या व्याधी आहेत त्यांचाच समावेश जास्त आहे. त्यामुळे अशा लोकांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. वयस्कर माणसांनी कोणतेही लक्षण आढळल्यावर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आणि अशा वयस्कर लोकांना घरी अलगीकरण करून ठेवण्यापेक्षा रुग्णालयात दाखल करून घेणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींवर लक्ष जास्त केंद्रित करण्याची गरज आहे."
ऑगस्ट 7, ला 'उचांक ते नीचांक' या शीर्षकाखाली, या लेखात रुग्णसंख्याचे उचांक येतील, अजूनही येतील मात्र आपण सगळ्यांनीच मिळवून या रुग्णसंख्येचा नीचांक कसा आणता येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहे, यावर विस्तृत लिखाण केले गेले आहे. सुरवातीच्या काळात संपूर्ण देशात मुंबईची रुग्णसंख्या अधिक होती, मात्र मुंबई महानगर पालिकेने मोठ्या प्रमाणात, खासगी रुग्णालयाच्या मदतीने काम करून ही संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. मात्र त्या तुलनेने पुणे आणि नाशिक शहरातील रुग्ण संख्या वाढली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट सातत्याने बदलत आहे. शहरातील कोरोना आता ग्रामीण भागात पोहचला आहे. त्याशिवाय आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने काही प्रमाणात काही होईना लोकं एका शहरातून दुसऱ्या शहरात जातील किंवा स्थानिक पातळीवर एकत्र होऊन छोटेखानी स्वरूपात सणांचा कार्यक्रम साजरा करतील. शासनाने या संदर्भातील स्पष्ट सूचना लोकांना दिल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे अन्यथा ही रुग्णसंख्या वाढेल आणि मृत्यू संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजही आपल्याकडे अनेक जण शहरात आणि ग्रामीण भागात अनेक नागरिक आजार अंगावर काढत आहेत, आणि गंभीर झाले की रुग्णालयात येत आहेत. यामुळे जो महत्वाचा काळ देणायचा तो निघून गेलेला असतो. आजही कोरोना होणे ही गोष्ट आपल्याकडे काही लोकांना लाजिरवाणी गोष्ट वाटत आहे, त्या दृष्टीनेच ते या आजाराकडे बघत असतात. तयामुलेअनेक जण हा आजार आपल्याला होऊ नये किंवा आजारी पडली तरी चाचणीसाठी पडत नाही. यामधून अनेक धोके निर्माण होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करणे आणि वेळीच उपचार करणे हा एकमेव मार्ग आहे. त्याचप्रमाणे आर टी- पी सी आर ह्या प्रचलित कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याची खूप गरज आहे. तरच आपण ही मृत्यूची संख्या कमी करू शकतो. " असे डॉ शशांक जोशी सांगतात, डॉ. जोशी राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य आहेत.
कोरोनाचे संकट टळलेल नाही हे यापूर्वीच शासनाने जाहीर केलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही फाजील आत्मविश्वास न बाळगता सुरक्षिततेच्या नियमांना धाब्यावर बसवू नये. जर सुरक्षिततेचे नियम पाळले तर रुग्णसंख्येला आळा बसेल परिणामी आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होईल. अजूनही कोरोनावर असे ठोस औषध प्राप्त झालेले नाही. तरीही बऱ्यापैकी रुग्णांना उपलब्ध आहेत ती औषधे वापरून बरे करण्यात डॉक्टरांना यश मिळत आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी कोरोनाविरोधात लस काढण्याचे दावे केले आहेत त्यापैकी रशियाने लस काढल्याचे जाहीर केले. मात्र वैद्यकीय वर्तुळात त्याच्या उपयुक्ततेवरून अनेक मतमतांतरे करण्यात आली. त्यामुळे ती लस आपल्या भारतात लवकर येईल अशी अपेक्षा नाही. त्यामुळे अजूनही काही काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेत राहणे हा एकमेव पर्याय आहे.
परळ येथील ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार रोग तज्ञ, डॉ समीर गर्दे सांगतात की, " संपूर्ण राज्यात अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी तज्ज्ञाकडून एक सारखीच मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्याची गरज असून त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अति दक्षता विभागात तज्ञांनी काळजी घेणे गरजेच असून त्याचप्रमाणे रुग्ण अति दक्षता विभागातून बाहेर आल्यावर त्याच पद्धतीची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. याकरिता वेळ पडल्यास डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यकांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रुग्णांची व्यवस्थितपणे काळजी घेणे गरजेचे असून विविध आजाराच्या तज्ञांनी एकत्र येऊन इलाज केला पाहिजे."
सध्या राज्यात ज्या पद्धतीने वातावरण निर्माण करण्यात येत आहे की कोरोना आता संपला आहे मात्र नेमकी येथेच आपली फसगत होऊ शकते. एका बाजूला मृत्यूची संख्या वाढत असताना सावधानतेने पावले उचलण्याची गरज आहे. उद्योगधंदे चालू करण्यासाठी शिथिलता महत्वाची आहे, मात्र त्याचा वापर योग्य पद्धतीने केला गेला पाहिजे. मृत्यू संख्या वाढणे हे समाजासाठी चांगले लक्षण नव्हे. यावर आळा आणून योग्य ते उपाय करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे आणि त्यातच पावसाळी आजाराची सुद्धा वाढ झाली तर आरोग्याच्या अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. जरी कोरोना काळात आता सर्वांनीच साधारण आयुष्य जगायचं असे अनेक जण म्हणत आहे पण त्यात आपल्याला या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे.