महाराष्ट्रात यावेळी गणेशोत्सव साजरा होत असला, तरी तो दरवर्षीपेक्षा वेगळा आहे. संपूर्ण देश कोरोना सारख्या या महाभंयकर संसर्गजन्य आजाराच्या विरोधात मोठ्या ताकतीने लढतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळेच आनंदाचे सण सर्वच जाती-धर्माचे नागरिक अत्यंत साधेपणाने साजरा करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे राज्यात यंदा गणेशोत्सवही त्याच धर्तीवर साजरा होत आहे. या कोरोनाने गर्दी करण्यावर निर्बंध आणल्याने सगळा उत्सव सुरक्षिततेच्या गोष्टी ध्यानात ठेवून साजरा केला जात आहे, काही मंडळांनी तर गणेशोत्सव रद्द करून थेट आरोग्य व्यवस्थेला मदत करणारा आरोग्योत्सव साजरा करत आहे त्याचा थेट फायदा गरजू रुग्णांना होताना दिसत आहेत. अशातच आणखी एक महत्वाची घटना घडली आहे ती म्हणजे शहरात यंदा 'ध्वनी प्रदूषण' नसल्यातच असल्यासारखे आहे. कोरोनाप्रमाणे ध्वनी प्रदूषणाने सुद्धा आरोग्यावर परिणाम होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरवर्षी आगमन, विसर्जन काळात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या बातम्या नेहमीच्याच, मात्र यंदाचं वर्ष या गोष्टींला अपवाद ठरले आहे. त्यामुळे यापुढे उत्सव साजरा करताना त्याचा आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी प्रत्यकानेच घेतली तर सगळेच उत्सव हे आरोग्य उत्सव ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.


आवाज फाउंडेशन, ही ध्वनी प्रदूषण विरोधात काम करणारी बिगर सरकारी संस्था ही या अशा ठिकाणी निर्माण होणाऱ्या 'ध्वनी पातळीचे मोजमाप करण्याचे काम करत असते. दरवर्षी ही संस्था मुंबई शहरात साजरे होणारे विविध सण-उत्सव, धार्मिक स्थळं, राजकीय सभा, बांधकामाची ठिकाणं, रहदारी, रेल्वे मार्ग, एअरपोर्ट आणि खासगी कार्यक्रम ज्या ठिकाणी ढोल ताशे, लाऊड स्पीकर आणि फटाक्याचा वापर होतो अशा ठिकाणी जाऊन ध्वनी पातळीचे मोजमाप करून ध्वनी प्रदूषण किती आहे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहे. गेली 17 वर्षे ही संस्था याचा विषयवार काम करत आहे. या संस्थेनं अनेकवेळा हे सामाजिक काम करताना संघर्ष केला आहे. हे ध्वनी पातळीचे काम मोजून झाले की, त्याद्वारे गोळा केलेली माहिती अनेक माध्यमकर्मी ह्या संस्थेकडून घेत असतात . दरवर्षी ठरलेली बातमी म्हणजे सर्वच उत्सव सणात ध्वनी पातळी ही मर्यादेपेक्षा ओलांडलेली असते. ही संस्था दरवर्षी संकलित केलेली ही ध्वनी पातळीची माहिती मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना देत असतात. यंदाही या संस्थेनी ही माहिती दीड दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील विविध 14 ठिकाणी जाऊन संध्याकाळी 5 तर रात्री 9 या वेळेत घेतली तर त्यांना यामध्ये आमूलाग्र बदल जाणून आला आहे. एखाद-दुसरं ठिकाण सोडलं तर सर्वच ठिकाणच्या ध्वनी पातळी ही सरासरी 53 ते 75 डेसिबलच्या आत होती. मानवी जीवनात ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम 70 ते 80 डेसिबलनंतर सुरू होतात. गेली काही वर्षे गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणाची ही तीव्रता 120-130 डेसिबलपर्यंत पोहचली होती.


याप्रकरणी या संस्थेच्या प्रमुख सुमैरा अब्दुल अली, यांनी एबीपी माझा ऑनलाईनशी बोलताना सांगितले की," या वर्षी मी खरोखरच आनंदी आहे. मी आशावादीआहे. यापुढे ज्या पद्धतीने कोरोनाचे संकट ओळखून सर्वच नागरिकांनी आणि मंडळांनी ध्वनी प्रदूषण टाळून हा सण साजरा केला त्याचप्रमाणे यापुढेही सण साजरा करतील. कारण ध्वनी प्रदूषणामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात. यावर्षी सर्वच नागरिकांनी आणि सार्वजनिक मंडळांनी सामाजिक भान जपत हा सण अतिशय पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेत साजरा केला याबाद्दल खरंच आनंद होत आहे. सर्व नागरिकांनी सर्वच सण साजरे केले पाहिजे मात्र त्याचा आरोग्यवर काही परिणाम होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. या वर्षीचा दीड दिवसाचा विसर्जन सोहळ्यानिमित्त आम्ही शहराच्या विविध भागांना भेटी दिल्या. त्याची ध्वनी पातळी मोजली मात्र बहुतांश ठिकाणी ही पातळी आटोक्यात होती. फक्त वरळी डेअरी जवळील ठिकाणी ड्रम आणि मिरवणुकीचा आवाज रात्री 100 डेसीबल इतका वाढला होता. अन्यथा सर्वच ठिकाणी ध्वनी पातळी बऱ्यापैकी कमी होती. गेल्यावर्षापर्यंत ही पातळी 120 डेसिबलपर्यंत जात होती. या सर्व ठिकाणच्या ध्वनी पातळीची माहिती ई-मेलद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाठविण्यात आली आहे."


यावर्षी राज्यातील बहुतांश मंडळांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात गणेशोत्सवासाठी जे सुरक्षिततेचे नियम आखून दिले होते त्याचे पालन बहुतांश मंडळांनी केलेलं आपण सगळ्यांनीच पहिले आहे. कोणत्याही मोठ्या मंडळीनी आगमन मिरवणूक काढलेली नाही, तसेच मूर्तीचा आणि मंडपाचा आकार छोटा ठेवण्यावर भर दिला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची काळजी सर्वच मंडळांनी यावेळी घेतलेली दिसत आहे. काही मंडळांनी तर चक्क उत्सव रद्द करून आरोग्य उत्सवाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाची सुरुवात प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली आहे. या मंडळाने उत्सवाच्या काळात मूर्तीची स्थापना न करता 10 दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे प्लाझमादान करण्यासाठी येथे बहुतांश लोकांनी गर्दी केलेली आढळून येत आहे. त्याचप्रमाणे समाजोपयोगी उपक्रम या मंडळातर्फे राबविले जात आहे. या कोरोना काळात अशा उपक्रमामुळे समाजाला मोठ्या प्रमाणात फायदाच होत आहे. अशा पद्धतीने राज्यातील प्रमुख शहरात अशा पद्धतीने मंडळ सामाजिक उपक्रम राबवून शासनाला एक प्रकारे साहाय्य करत आहेत.


सर जे जे समूह रुग्णालयातील, नाक कान आणि घसा विभागाचे प्रमुख, डॉ. श्रीनिवास चव्हाण सांगतात की, " हे खरे आहे, ध्वनी प्रदूषणाचा माणसाच्या आरोग्यवर विपरीत परिणाम होतो. 8 तासात 80 डेसिबल पर्यंत आवाज मोकळ्या परिसरात माणूस व्यस्थित ऐकू शकतो. मात्र त्यापुढे गेल्यास त्याचे आरोग्यवर विपरीत परिणाम होतात. 100 - 120 डेसिबलच्या वरील आवाजामुळे बहिरेपणा, चिडचिडेपणा, उच्च रक्तदाबाच्या व्याधी, मधुमेहसारखे आजार जडू शकतात. काही लोकांना डीजेचा मोठा आवाज सहन होत नाही. बंद खोलीतील मोठ्या आवाजामुळे काही लोकांना कायमचा बहिरेपणा येतो आणि त्यांना मग श्रवण यंत्राचा वापर करावा लागतो. गरदोर महिलांनाही मोठ्या आवाजाचा त्रास अधिक होतो. कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो. त्यामुळे जितके ध्वनी प्रदूषण टाळता येईल त्यास प्राधान्य दिले पाहिजे."


अशाच स्वरूपाचे ध्वनी पातळी मोजण्याचे काम आपल्या राज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही शासनाची संस्थाही करत असते. त्यासाठी ते सातत्याने जनजागृतीही करत असतात. यावर्षीचा अपवाद वगळता, गेल्यावर्षी पर्यंत काही मंडळे नियमाचे पालन करतात तर काही मंडळे नियम धाब्यावर बसवतात. पोलिसांकडून अशा मंडळावर कारवाई केली जाते. आपल्याकडे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. आवाजावर नियंत्रण आणण्यासाठी ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 च्या अंतर्गत पोलिस नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करू शकतात. तसेच काही वर्षांपासून मुंबई शहरात उत्सव मिरवणुकीत डीजे वापरण्यावर बंदी आणण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी ढोल ताशांचा आवाज एवढा असतो की, त्यामुळे मोठे ध्वनी प्रदूषण शहरात होत असते. ध्वनी प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम हळू हळू आता लोकांना समजू लागले आहेत.


बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे, अध्यक्ष, नरेश दहिबावकर सांगतात की, "सध्याची परिस्थिती पाहता, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना जे आवाहन केले त्याचे बहुतांश सर्वच मंडळांनी स्वागत केले आहे. कारण कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे गर्दी टाळणे पाहणे फार गरजेचे आहे. त्यामुळे बहुतेक मंडळांनी यंदा गणपतीची मूर्ती छोटी ठेवण्याचा निर्णय मान्य केला आहे. विशेष म्हणजे या काळात आगमन आणि विसर्जन मिरवणूक होणार नाही. याच सर्व श्रेय हे मंडळांना जाते, त्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. खरोखरच ध्वनी प्रदूषण होणार याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. कारण आपल्याकडे सध्या डीजेवर बंदी आहे. तरीही गेल्या वर्षी काही मंडळांनी तो वाजविला त्यावर पोलीस कारवाई करत आहेत. मात्र यावर्षी सगळ्यांनी शासनाचे नियमाचे पालन केलेले आपणास दिसत आहे."


या वेळेस कोरोनाचा संसर्ग आहे म्हणून मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला आहे ते खरंच स्वागतार्ह आहे. मात्र या कारणांमुळे बऱ्यापैकी सकारात्मक बदल यंदा बहुतांश सार्वजनिक मंडळामंध्ये दिसून आले आहेत. या बदलाची प्रशंसा सर्वच स्तरावरून होत आहे. काही वर्षांपासून मंडळामध्ये या उत्सवादरम्यान स्पर्धा निर्माण झाली होती, त्यातून कोण मोठा हे दाखविण्यावरून मूळ श्रद्धेच्या उत्सवाला बगल दिली जात होती. हे सर्व ओंगळवाणे प्रकार थांबणे काळाची गरज आहे. उत्सव हे मोठ्या स्वरूपात साजरे झाले पाहिजे यामध्ये कुणाचेच दुमत नाही मात्र त्या उत्सवातून होणार ध्वनी प्रदूषण टाळणे हे ठरविले तर सर्वानाच शक्य आहे. जर अशाच पद्धतीने उत्सव वर्षभर सुरु राहिले तर आवाज कुणाचा ? म्हणण्याची वेळ कुणावरच येणार नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग