पांडुरंग रायकर वय वर्षे 43, उमदं वय आयुष्यात काही तरी करून दाखवायचं वय, परिस्थितीशी दोन हात करायचं बळ असतं या वयात. व्यवसायाने पत्रकार. मराठीतील वृत्तवाहिनीत ते काम करायचे . व्यवस्थेविरुद्ध आवाज उचलायचे . अन्याविरूद्ध बातमीच्या माध्यमातून लढा पुकारायाचे . तसेच तो दोन मुलाचा बाप होता, नवरा होता तर मुलगाही होता. आज त्याचे पुणे येथे निधन झाले. कारण होतं गेली अनेक दिवस आहे तेच 'कोरोनाचं'. त्याचं दुर्दैव एवढ्यावर थांबलं असतं तर ते कदाचित वाचले असते . या आजारामुळे होणारे दुष्परिणाम त्यांच्यावरही झाले, शरीर ऑक्सिजनची मागणी करू लागले वैद्यकीयदृष्ट्या त्यांना व्हेंटीलेटरची गरज होती, त्या व्हेंटीलेटरपर्यंत पोहचण्याकरिता कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज होती. परंतु सगळे प्रयत्न करूनही नाही मिळू शकले त्यांना हे आणि त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग पेशाने पत्रकार असल्यामुळे त्याचे इतर सहकारी-मित्र अनेक जण या घडलेल्या प्रकाराबद्दल समाजमाध्यमातून, वृत्तवाहिनीवरून व्यक्त होत आहे, घडल्या प्रकाराची चर्चा घडवून आणत आहे, 'व्यवस्थेचा बळी' म्हणून बातम्या केल्या जात आहे. मात्र पांडुरंग हे एक उदाहरण आहे, असे अनेक पांडुरंग या व्यस्थेचे बळी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, मृतांचा आकडा वाढत आहे. तरी अनेकांना कोरोनाचं गांभीर्य आलेले नाही. शिथिलता कशी द्यायची यावरच नुसती चर्चा. कोरोनाचे संकट आणखी वाढत चाललंय विशेष करून ग्रामीण भागात, पुण्यात तर हाहाकर माजविलाय कोरोनाने. कोरोनाने काही होत नाही म्हणणारे कोणाकडून हे सर्व ज्ञान प्राप्त करून घेतात हा संशोधनाचा विषय आहे. पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. का ? ही वेळ त्यांच्यावर आली. पुण्यासारख्या शहरात जर अशी विदारक परिस्थिती असेल तर ग्रामीण भागातील परिस्थितीचा यावरून अंदाज लावता येईल. अपुऱ्या आरोग्यच्या सुविधा जर मृत्यूचे कारण होत असतील तर या गोष्टीचा आणखी गांभीर्याने विचार करायला हवा आहे. आतापर्यंत जितक्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत त्या अपुऱ्या पडत असून आणखी वाढविण्याची गरज आहे. सरकारने काहीच केलं नाही असे म्हणणे चुकीचे असले तरी आणखी भरपूर काही करावे लागणार असल्याची शक्यता अधिक आहे. कोरोनाची संख्या आटोक्यात काही आणायची कशी यासाठी आपल्याकडे वैद्यकीय तज्ञ मंडळी आहे ते याचा विचार करत आहेतच, काही अंशी त्यांना यशही येत आहे. मात्र कोरोनाचं भविष्यातील वर्तमान कसं असेल हे सांगणे त्यांनाही मुश्किल होऊन बसले आहे.


पांडुरंग रायकर मृत्यूप्रकणी चौकशी होईल, त्याचा काय अहवाल यायचा तो येईल. मात्र पांडुरंगाच्या निमित्ताने प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत त्याची त्यांना उत्तरे द्यावी लागतील किंवा त्याची उत्तरे शोधावी लागतील. अशा अनेक पांडुरंगाचे बळी भविष्यात जाऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करणे काळाची गरज आहे. कोरोनामुळे पुण्याची आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. त्याला उत्तर म्हणून जंबो हॉस्पिटलचे निर्माण करण्यात आले आहे आणखी त्याच स्वरूपाची व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या जर गेल्या आठवड्यात बघितली असतील तर दिवसाला 17 हजारापेक्षा जास्त रोज नवीन रुग्ण या राज्यात सापडत आहे. परिस्थितीत बिकट होत चालली आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. विनाकारण गरज नसताना बाहेर पडू नका. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. शिथिलीकारणांचा गैर फायदा घेऊ नका. सणासुदीचे दिवस असले तरी ते सण साध्यापद्धतीने घरच्या घरीच साजरे करा. गर्दीची ठिकाणे टाळणे आणि सोशल डीस्टन्सिंगचा करणे गरजेचे आहे. मास्क न लावता हिंडू नये असे अनेक वेळा अनेक वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. आजकाल मास्क न लावणे म्हणजे आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे, परंतु यामुळे अनके धोके संभवतात.


जुलै 28, ला पुणे करूया 'उणे' या शीर्षकाखाली पुण्यातील रुग्णसंख्या कमी करण्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलावी लागतील या अनुषंगाने सविस्तर लिखाण केले होते. त्यामध्ये, राज्यात कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून मुंबई शहर हा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. सगळ्या देशाचे लक्ष मुंबईच्या 'तब्येतीकडे' होते. काही दिवसापासून थोड्या फार प्रमाणात का होईना मुंबईच्या प्रकृतीत सकारात्मक बदल दिसायला सुरुवात झाली आहे. मात्र या हॉटस्पॉटची जागा आता बदलली असून मुंबई नजीकच्या पुणे जिल्ह्यात कोरोनाने तांडव करण्यास सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसापासून पुण्यातील रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. पुणे शहरआणि जिल्हा ज्या पद्धतीने बदलत गेला, त्या पद्धतीने तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मात्र जैसे थे आहे. काही खासगी रुग्णालये सोडली तर शासनाने किंवा महापालिकेने फार क्रांतिकारक बदल आरोग्य व्यस्थेत केलेले दिसत नाहीत. खरं तर पुण्याला साथीचे आजार नवीन नव्हे, मात्र तरीही यावेळच्या संसर्गजन्य आजाराने या जिल्ह्याला अधिकच छळले आहे.अनेक साथीच्या आजाराचे केंद्र सुरवातीपासून पुणेच राहिले आहे. इतिहास कालीन प्लेग, स्वाईन फ्लू आणि आता कोरोना या आजाराची सुरवात पुण्यातूनच झाली आहे. विशेष म्हणजे सध्या संपूर्ण देशात जो साथरोग नियंत्रण कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. त्याची निर्मितीच मुळात 1896-97 च्या पुण्यातील महाभयंकर प्लेगच्या साथी नंतर करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला कोरोनाने प्रशासन व्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे केले.


पुणे शहरातील साथीच्या आजाराच्या रुग्ण संख्येचा आकडा पाहता महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलवर कायमच अन्याय होतोय असेच कायम वाटत राहते. हे रुग्णालय तसं म्हणायला गेलं तर दुर्लक्षित राहिलं आहे. गेल्या शतकापेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या या रुग्णालयावर साथीच्या आजारात मोठा ताण येत आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. सध्या रुग्णसंख्येचा मोठा भार हा शासनाच्या ससून रुग्णालय घेत आहे. गेल्या काही दिवसापासून रुग्णांना बेड्सची चणचण भासत होती. मात्र साथीच्या आजारचा दांडगा अनुभव असलेल्याला पुण्यात आरोग्य व्यस्थेशी निगडित मोठे बदल अपेक्षित असताना फार काही झालेलं दिसत नाही. पुणे शहराची संख्या झपाटयाने वाढत आहे. आय टी क्षेत्रातील वाढलेल्या कंपन्या त्यांचे कामगार आणि देशभरातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी येतच आहे. पुण्याचे भौगौलिक आकारमान वाढले आहे, त्या तुलनेने येथील सुविधा वाढायला हव्यात. सध्या आहे त्या व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. पुणे शहराबरोबर पिंपरी - चिंचवड भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. खासगी रुग्णालये आहे ती सुद्धा कोरोना काळात काम करत आहे मात्र त्यांच्याकडेही सुविधा अपुऱ्या पडत आहे, शिवाय या रुग्णालयातील उपचारांचा खर्च सगळ्यांचं परवडेल असे नाही.


राज्यात सर्वात जास्त पुणे येथे 1 लाख 78 हजार 598 रुग्ण संख्या असून, त्यापैकी 1 लाख 19 हजार 620 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर अजून 54 हजार 857 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. 4 हजार 121 नागरिकांचा या आजाराने बळी घेतला आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा गेली अनेक महिने या कोरोनाच्या संकटाबरोबर लढत आहे. त्यांना काही ठिकाणी यश मिळत आहे तर काही ठिकाणी अजूनही रुग्णसंख्या म्हणावी तशी आटोक्यात आलेली नाही. सध्याच्या आरोग्यव्यस्थेत कुशल मनुष्यबळाची गरज आहे त्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मेडिकल कॉलेजमधील, महापालिकेच्या रुग्णालयातील, नगरपालिकेच्या रुग्णालयातील,आरोग्य विभातील अनेक रुग्णालयांतील डॉक्टरांची,परिचारिकांची, सहाय्यकांची, वॉर्डबॉयची पदे रिक्त आहेत. ती भरणार याचे आश्वासन शासनाने दिलेलं आहे, परंतु ती पदे भरून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट कधी करणार याचे उत्तर शासन आणि प्रशासनाला शोधावेच लागणार आहे. पांडुरंग यांच्यासारखे आणखी 'व्यवस्थेचे बळी' जाऊ द्याचे नसतील तर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून कोरोनाच्या अनुषंगाने आरोग्यच्या अधिक व्यवस्था विशेष करून पुण्यात उभ्या केल्या पाहिजेत.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग