BLOG | दिवाळीत कोरोनाला आमंत्रण?
दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांच्या आनंदाला भरते आले आहे , मात्र या भावनेच्या भरातील केलेल्या चुका भविष्यात त्रासदायक ठरू नये असे वाटत असेल तर सगळ्याच ठिकाणी सुरक्षित वावर ठेवला पाहिजे.
गेली काही दिवस वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरे जात आहेत अशा बातम्या येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील जनतेला विविध स्तरातून आवाहन करण्यात येत आहे की यंदाची दिवाळी साधेपणाने साजरी करा. नागरिकांना या दोन्ही परस्पर विरोधी बातम्या वाटणे साहजिकच आहे. मात्र त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की हे सरकार जर अशा पद्धतीचे आवाहन करत असतील तर तसेच गंभीर कारणही आहे. सध्या कोरोनाच्या अनुशंगाने राज्याची परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूचा नायनाट झाला आता सगळं आलबेल झालं आहे असे मानने धोकादायक आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते कोरोनाचा विषाणु असा सहजपणे इतक्यात नष्ट होत नाही. तो आणखी काही काळ वातावरणात असणार आहे तो काळ किती असेल हे सांगणे मुश्किल आहे. कारण दिवाळी सणाच्या निम्मिताने ज्या पद्धतीने नागरिक रस्त्यांवर उतरून खरेदीसाठी झुंबड करत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेचे नियम पाळून ही दिवाळी साजरी करणे निश्चिततच आरोग्यदायी ठरणार आहे. त्यामुळे या दिवाळीत आपण कोरोनाच्या विषाणूला आमंत्रण तर देत नाही ना ? हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवे.
खरं तर कुणी कशापद्धतीने सण साजरा करावा असे सांगणे कुणालाच आवडणार नाही मात्र यंदाची दिवाळी कोरोनाच्या सावटाखाली आलेली आहे. या संसर्गजन्य आजार असणाऱ्या कोरोना पसरण्याची पद्धत आपण सगळ्यांनीच बघितलेली आहे. त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे खूप मोठा समूह एकाच वेळी या आजाराचा शिकार होऊ शकतो. या आजाराचा बचाव कशा पद्धतीने करता येऊ शकतो याची सोपी पद्धत आपल्याकडील डॉक्टरांनी सगळयांनाच सांगितली आहे. मात्र तरीही आपण काळजी घेत नाहीत. सार्वजनिक परिसरात फिरताना मास्क लावावा असा नियम केला असताना काही जण हा नियम धाब्यावर बसविताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच महापालिकांनी कोट्यवधींचा दंड हा नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे. यावरून नागरिकांना स्वतःच्या आरोग्यबाबत किती काळजी हे दिसून येते. आज परिस्थिती चांगली आहे म्हणून याचा कुणी गैरफायदा घेऊ नये. कोरोनाचे या पूर्वीचे वर्तन पहिले तर तो कधी स्वतःचे रंग बदलवत असतो याचे अनुमान कुणीही काढू शकलेले नाही. त्यामुळे धोका अजून टळलेला नाही असे म्हणूनच नागरिकांनी आपला सुरक्षित वावर ठेवला पाहिजे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शुभेच्या देताना आवाहन केले आहे की, दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा. मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहे हे विसरू नका. हा सण मोठा असला तरी आपल्या परिसरात, आपल्या जवळचे, मित्रमंडळी- नातेवाईक यांच्या घरात कोरोनामुळे दु:खद घटना घडलेली असेल. त्यांना या दिवाळीचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे उत्साह दाखवतांना त्यांचाही विचार मनात राहू द्या असेही मुख्यमंत्री म्हणतात. आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु करायचे आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता या हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आई वडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा. फटाके वाजविणे आणि बाहेरच्या भेटीगाठी यापेक्षा घरातच कुटुंब एकत्रितरीत्या हा सण साजरा करू शकते. हा दीपोत्सव असल्याने दिव्यांची आरास, रांगोळ्या,ज्यांना शक्य आहे त्यांना अंगणात किल्ले करणे, या काळात सुट्या असल्याने वाचन करणे, संगीत तसेच इतर आवड पूर्ण करा. तुमच्या घराचे दरवाजे मंगलमय शांती, समृद्धी, लक्ष्मी यांच्यासाठी उघडा, कोरोनासारख्या रोगासाठी नव्हे असे देखील मुख्यमंत्री म्हणतात.
राज्यात सध्याच्या घडीला राज्यात 88 हजार 070 कोरोनाबाधित रुग्ण विविध भागात उपचाहर घेत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे, मृत्यूच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून आलेली आहे. एकंदरच परिस्थिती सुधारण्यास अजूनही मोठा वाव आहे. राज्यात दोन महिन्यापूर्वी कोरोनाबाधितांच्या उपचारांकरिता 700-800 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होत होता. अन्न आणि औषध प्रशासनाच्या दैनंदिन अहवालानुसार ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. बुधवारच्या अहवालानुसार राज्यात 423.709 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर रुग्णांकरिता करण्यात येत आहे. बेड्सच्या टंचाईच्या तक्रारी दूर झाल्या आहेत. मात्र अशीच चांगली परिस्थिती कायम ठेवायची असेल तर नागरिकांना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केलेच पाहिजे अन्यथा दिवाळी नंतर मोठ्या दुष्परिणामांना जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांच्या आनंदाला भरते आले आहे , मात्र या भावनेच्या भरातील केलेल्या चुका भविष्यात त्रासदायक ठरू नये असे वाटत असेल तर सगळ्याच ठिकाणी सुरक्षित वावर ठेवला पाहिजे. दिवाळीच्या निमित्ताने अनेक जणांच्या गाठी भेटी होतील मात्र त्या सर्व करताना कोरोनाची साथ आजही आहे हे मात्र विसरून चालणार नाही.
दिवाळी सण, हिवाळा यापार्श्वभूमीवर राज्य शासन घेत असलेल्या खबरदारीविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यातील ॲक्टीव्ह केसेस कमी झाल्या आहेत. सध्या 92 हजार रुग्ण उपचाराखाली असून रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. संख्या वाढलीच तर त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. खाटांचे नियोजन, औषधांचा साठा पुरेसा असून चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जिल्हा टास्क फोर्स करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णालयास्तरावर इन्स्टिट्युशनल डेथ ऑडीट कमिटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शिवाय लवकर निदान लवकर उपचारावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या या गेल्या 7-8 महिन्याच्या अनुभवावरून नागरिकांनी आरोग्य साक्षर होणे काळाची गरज आहे. आपल्याकडे यापूर्वी साथीचे आजार येऊन गेलेत , सध्या आहेत आणि भविष्यात अशाच पद्धतीचे साथीचे आजार येत राहणारच आहे. त्यामुळे काही आरोग्यच्या दृष्टीने चांगल्या सवयी नागरिकांनी लावून घेतल्या पाहिजे. या आजाराचे वर्तन कसे असले पाहिजे याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. कारण अशा काळात एका व्यक्तीला हा आजार झाला तर त्याचा दुसऱ्याना त्रास होऊ शकतो. त्यामुळे स्वतःचे आरोग्य सांभाळणे आणि दुसऱ्यांना आपल्यामुळे कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत राहणे हेच नागरिकांच्या हातात आहे. यंदाची दिवाळी साजरी करताना ह्या सगळ्यांचे भान बाळगल्यास येणार काळ हा कोरोनामुक्त होण्याच्या दृष्टीने उचलेले एक आशादायी पाऊल असणार आहे.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | आला थंडीचा महिना, मला लागलाय खोकला!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!