BLOG | योद्ध्याचं घायाळ होणं परवडणार नाही!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि मेडिकल स्टाफची नितांत गरज असून, त्यांना लागणारं सुरक्षा किट पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पीपीई तात्काळ दिले पाहिजे ही मागणी सर्व स्तरातून होत आहे.
कोरोनाचा (कोविड-19) प्रवेश भारतात होऊन चार आठवड्यापेक्षा अधिक काळ लोटलाय, तरीसुद्धा आरोग्य क्षेत्रात 'बेसिक' गोष्टीवर चर्चा काय तर अजून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुरक्षा किट मिळाले नाही. त्यातच भर म्हणजे सुरक्षा किट आता विकत कोण घेणार आणि पुरवणार कोण, यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या या लढाईत डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी यांची गणना 'योद्धे' म्हणून केली आहे. मात्र, मागच्या काही काळात या योद्ध्यांना आपलं कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली आहे. एका बाजूला कोरोनाच थैमान ऐन जोरात असताना अशा पद्धतीने योद्धे घायाळ होणे सध्याच्या परिस्थितीला परवडणारं नाही.
फक्त भारतातच नव्हे तर, चीन, स्पेन आणि इटलीमध्ये हजारोंच्या संख्यने आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीमध्ये तर 50 पेक्षा जास्त डॉक्टर या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडले आहेत. देशातील काही राज्यातील रुगालयांमध्ये त्यात तामिळनाडू आणि दिल्लीतील काही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.*
सध्या देशाला या योध्यांची नितांत गरज असून, त्यांना लागणारं सुरक्षा किट पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात पीपीई तात्काळ दिले गेले पाहिजे ही मागणी सर्व स्तरातून होत आहे. महाराष्ट्रात रुग्णानाची संख्या हजरांपेक्षा जास्त झाली आहे. या आणि अजून येणाऱ्या सर्व रुग्णाच्या उपचाकरीता आरोग्य कर्मचारी हे देवापेक्षा कमी नाही. त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे.
मुंबईच्या, जसलोक हॉस्पिटलच्या 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल काही काळापर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे, मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात एका आठवड्यातच 26 नर्स तीन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मुंबई महापालिकेने हे हॉस्पिटल सील केलं. ताडदेव येथील भाटिया रुग्णालयातील काही कर्मचारी यांना याची लागण झाली आहे, तर दादर मधील शुश्रूषा रुग्णालयातील दोन नर्सेसना याची बाधा झाली आहे.
तर काही दिवसापूर्वी, महापालिकेच्या 52 वर्षीय सफाई कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी असून धारावीत त्याला तैनात करण्यात आले आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्याने अधिकार्यांनी त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते. सुरक्षा किट सोबत या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून काही रुग्णालयांनी या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही औषध घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक रुग्णालयाचे व्यवस्थापन सर्व कर्मचाऱ्यांना याचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांचं समुपदेश करत आहे.
याप्रकरणी, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र अध्यक्ष, डॉ अविनाश भोंडवे सांगतात की, "युद्ध करत असताना सैनिकांना चिलखत द्यावे लागते, अन्यथा ते घायाळ होणार हे निश्चित आहे. याकरिता शासनाने लवकरात लवकर जे आरोग्य कर्मचारी काम करतात त्यांना सुरक्षा किट पुरवणे गरजेचे आहे. मात्र या सुरक्षा किटचा तुटवडा जगभर असून आपलं शासन याकरिता पाठपुरावा करतंय ही चांगली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे रुग्णालयांनी या प्रसंगात 'इन्फेकशन प्रोटोकॉल' ठरवला पाहिजे. त्यामुळे रुग्णालयात या आजारच प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे."
कोरोनाच्या या महामारीत आरोग्य सेवेतील प्रत्येक जण प्राणाची बाजी लावून काम करत आहे. आपला जीव धोक्यात घालून रुग्णांना उपचार देत आहे. महत्वाचं विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड योद्धा उपक्रम सुरु केला असून लष्करी दलातील निवृत्त मेडिकल कोरमध्ये काम केलेले त्याचप्रमाणे परिचारिका म्हणून सेवा निवृत्त झालेले यांना या परिस्थितीत काम करण्याची इच्छा असल्यास अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, हजारोच्या संख्येने लोकांनी अर्ज दाखल केले आहे. आपल्या ह्या योद्ध्यांना लवकर त्यांना लागणारी सर्व सुरक्षेची सर्व साहित्य मिळो, त्यामुळे सर्व जनेतला त्यांना उपचार देण्यास कोणतीही अडचण भासणार नाही.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!