(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | कोरोनामय दिवाळी!
राजस्थान सरकाने कोरोनाच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या दिवाळी मध्ये फटाके वाजविण्यावर बंदी आणली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन मधील बहुतांश अटी शिथिल करून बऱ्यापैकी प्रमाणात मोकळीक नागरिकांना दिली आहे. नागरिकही त्याचा मनोसोक्त आनंद घेताना दिसत आहेत. काही दिवसात मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतात साजरा होणार दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला आहे. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट असणार आहे. सध्याच्या घडीला आजही नवीन कोरोनाबाधितांचे रुग्ण सापडत आहेत तर काही प्रमाणात रुग्णांचा मृत्यू दिवसागणिक होतच आहे. राज्य सरकारने मागील काही दिवसात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंतचे सर्व सण साधेपणानेच साजरे केले आहे. त्याच पद्धतीने दिवाळी सण सुद्धा साजरा करणे अपेक्षित आहे कारण परिस्थिती जरी सुधारत असली तरी ती कायमच तशीच राहील असा दावा कुणीही केलेला नाही. उलट दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या थंडीच्या काळात कोरोनाचा विषाणू कशा पद्धतीने आपले रंग दाखवेल याबाबत स्वतः वैद्यकीय तज्ञांमध्ये विविध मतमतांतरे आहेत. त्यामुळे या दिवाळीच्या काळात सुरक्षितपणे दिवाळी साजरी करणे हेच नागरिकांच्या हातात आहे. युरोप खंडातील परिस्थिती पाहता तेथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून दिवसागणिक नव्याने लाखो रुग्ण सापडत आहे. ती परिस्थिती पाहता सर्व नागरिकांना यंदाचा दिवाळी सण आटोपशीर पद्धतीने केल्यास त्याचा भविष्यात फायदाच होऊ शकतो.
सध्याच्या घडीला राज्यात आजही 1 लाख 25 हजार 109 रुग्ण राज्याच्या विविध भागात उपचार घेत आहेत. तर रविवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेली दैनंदिन अहवालालनुसार 5 हजार 369 नवीन रुग्णाचे निदान झाले आहे. तर 113 कोरोनाबाधितांचा या आजाराने मृत्यू झाला असून 3 हजार 726 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यतील मृत्युदर आधीच्या तुलनेने चांगला असून तो 2.61 % एवढा आहे. संपूर्ण राज्यात नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मुंबई शहरात अधिक आहे. आज जर राज्यातील अनेक बाजारपेठा पहिल्या तर त्या गर्दीने ओसंडून वाहत असतानाचे चित्र आहे. मात्र नागरिकांच्या अशा वागण्याने कोरोनाचा फैलाव होणायचा धोका अधिक संभवतो. अनेक जण आता काय बस आणि ट्रेन मध्ये गर्दी असते, काहीही होत नाही अशा अविर्भावात वादविवाद करत सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसविण्यास उत्सुक असतात. अनेक जण आजही मास्क लावत नाही याचा प्रत्यय रोज प्रशासनाला येत आहे. या मास्क ना घालणाऱ्या लोकांकडून दिवसागणिक लाखो रुपयांचा दंड वसूल केला जात आहे, हे संकेत चांगले नव्हे.
खरे तर कोरोनाच्या या आजरात विषाणूचा घशावाटे फुफ्फुसांवर प्रहार होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकाराना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधिले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील ऑक्सिजन घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासते. एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे कि नाही ते ठरवतात. काही कोविडबाधित रुग्णांना फुफ्फुसाचे आजार होत असल्यामुळे या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लागण्याची शक्यता जास्त असते. कोरोनाच्या या आजरात फुफ्फुसाचे आरोग्य पाहण्यासाठी वैद्यकीय तज्ञांनी विशेष अशी गुणांकन पद्धती निश्चित केली आहे. राज्यात एकूण 16 लाख 83 हजार 775 रुग्ण असून त्यापैकी 15 लाख 14 हजार 079 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत 44 हजार 024 रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. यामध्ये काही रुग्णांचा कोरोना आजार बरा झाला असला तरी त्यांना अन्य व्याधींचा त्रास होत आहे काही रुग्णांना श्वसन विकार तर काहीना हृदय विकाराचा स्नायूंदुखीचा त्रास होत आहे.
राजस्थान सरकाने कोरोनाच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या दिवाळी मध्ये फटाके वाजविण्यावर बंदी आणली आहे. यासंदर्भांत राजस्थान राजचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये असे म्हणतात की, फटाके वाजविल्यामुळे मोठ्या प्रमाणात परदूषण निर्माण होते त्यामुळे याचा त्रास कोरोनाबाधितांना होऊ शकतो. सध्याच्या काळात जनतेचे आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. फटाक्यातून निर्माण होणारी धुराचा कोरोबाधितांना तसेच हृदय विकार आणि श्वसन विकार असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीत यंदा दिवाळी कुणीही फटाके वाजवू नये असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी त्या स्वरूपाच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून तात्पुरते फटाके विक्री करण्याकरिता जो परवाना देण्यात येतो त्यावर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे लग्नसमारंभातही फटाक्यांची आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्णयायचा तेथील नागरिकांना नक्कीच फायदा होईल.
"ज्या काळात आपल्याकडे दिवाळी सण साजरी केला जातो त्याकाळात मुळातच थंडी सुरु झालेली असते. हवा मोठ्या प्रमाणात कोरडी झालेली असते, त्यात धुके आणि धूर मोठ्या प्रमाणात असते या सर्व बाबींच श्वसन विकार असणाऱ्या रुग्णांना विशेष करून अस्थमा असणाऱ्या रुग्णांना त्रास होत असतोच. त्यामुळे कोरोना असो किंवा नसो फटाक्यांवर बंदी ही कायम स्वरूपात असणे गरजेची आहे. कारण फटाक्याच्या आतषबाजीतून वायुप्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होत असते. याचा फक्त रुग्णांवरच नाही तरी सर्वसामान्यच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे हा प्रकार थांबायलाच हवा, यावेळी उगाच कोरोना आहे म्हणून बंदी असायला हवी, असे बोलणे उचित ठरणार नाही." असे, परळ यथील खासगी रुग्णलयात काम करणारे श्वसन विकार तज्ञ डॉ समीर गर्दे सांगतात.
यंदाची दिवाळी कोरोनाच्या सावटाखाली असली तरी ती कशा पद्धतीने साजरी करणे हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. प्रशासन सुरक्षिततेच्या दृष्टीने नवनवीन नियम करत असते. मात्र त्या नियमांचं पालन करण्याचे काम नागरिकांचे आहे. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही हे यापूर्वी अनेक वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनविरोधातील लस येत नाही तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यावीच लागणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येऊ नये ही सर्वांचीच अपेक्षा असली तरी ती येऊन नये यासाठी सगळयांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अदयाप तरी राज्य शासनाने विशेष करून दिवाळीच्या अनुषंगाने सूचना दिल्या नसल्या तरी आतापर्यंतच्या अनुभवावरून नागरिकांनी सुरक्षित वावर ठेवणे काळाची गरज आहे.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!
- BLOG | कोरोनामुक्त म्हणजे आजारमुक्त?