BLOG : "वामनदादांची गाणी....वंचितांची कहाणी"
BLOG : तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा , पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे
एक दिलाने पेटवलेले चरीतेसाठी पाठवलेले
काळ्या राणी अखंड तेथे फिरती आमुचे थवे .
असे म्हणत ज्यांच्या साहित्याने महाराष्ट्रातील दलित चळवळ बुलंद केली त्या नाशिक नगरीचे भूषण कविश्रेष्ठ वामनदादा कर्डक यांची सध्या जन्म शताब्दी सुरू आहे. वामनदादांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 साली झाला. भारताच्या स्वातंत्र्य दिनी झालेला त्यांचा जन्म तर विलक्षण आहेच, पण त्याहून जास्त विलक्षण आहे तो वामनदादांचा लोकजागृतीचा प्रवास!
आपली संपूर्ण हयात लोकगीतांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जागे करण्यासाठी पणास लावली आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते संपूर्ण महाराष्ट्रभर भटकंती करत राहिले.
नाशिक जिल्ह्यातील ता. सिन्नर मधील देशवंडी या छोट्याशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव तर धाकटी बहीण सावित्री असा वामनदादांचा परिवार होता. त्यांच्या घरी 18 एकर शेती होती. धान्य घरात यायचे तरीही हंगाम संपला की त्यांची आई डोंगरात जाऊन लाकडे गोळा करत व मोळी बांधून ते जळतण सिन्नर बाजारात विकत असे. तर वडील टेंभुर्णीच्या पानाच्या बिड्या करून विकायचे. सर्वांनी कष्ट केल्यावरही आषाढ श्रावणात आबाळ व्हायची ती वेगळीच. कधी तरवट्याची भाजी, माठाची भाजी, तर कधी नुसती भाकरीच खावी लागायची.असे हे अडचणीचे दिवस चालू असताना वयाच्या 19-20 व्या वर्षी वामनचे लग्न अनुसया नावाच्या मुलीशी झाले. पुढे त्यांच्या कुटुंबात मीरा नावाच्या मुलीने जन्म घेतला.
वामनदादांचे जीवन फार काही सुखात गेले नाही. बायको त्यांना सोडून गेली आणि पुढे आजारपणात मीराचेही निधन झाले. हा त्यांचा जीवनाला फार मोठा धक्का होता, ते मीराचे दुःख कधीही विसरू शकले नाहीत. मुलगी मीराच्या निधनानंतर पुढे आईसोबत पोटाची खळगी भरण्याकरिता वामनदादा मुंबईत आले. त्यांनी प्रारंभी गिरणी कामगार म्हणून काम केले. कोळशाच्या वखारीत कोळसा उचलला. चिक्की विक्रीचा, आईस फ्रूट विक्रीचा धंदा केला. मिळेल ते काम केले. नंतर त्यांना टाटा कंपनीत नोकरी मिळाली.
आपल्याला आश्चर्य वाटेल हे ऐकून की वामनदादा कधीही शाळेत शिकले नाहीत, संघर्षमय आयुष्याने दिलेले अनुभव हीच त्यांची शिकवणी होती. वामनदादांना अक्षरांचा परिचय नव्हता. मुंबईत आल्यावर दादा समता सैनिक दलात सामील झाले. तेथेच दादा लेझीम शिकले आणि इतरांना लेझीम शिकवू लागले, म्हणून दलातील लोक दादांना मास्तर म्हणून हाक मारायचे. एकदा लेझीम चालू असताना एक अशिक्षित माणूस दादांकडे एक पत्र घेऊन आला आणि म्हणाला, "दादा एवढं पत्र वाचून दाखवा" त्या पत्राकडे बघून दादांना रडू अनावर झाले. आपण केवळ नावाचे मास्तर आहोत आपल्याला धड लिहिता वाचताही येत नाही याचे त्यांना अपार दुःख झाले. त्यावेळी कामगार कल्याण केंद्राचे प्रमुख देहलवी यांना दादांच्या रडण्याचे खरे कारण समजले तेव्हा त्यांनी दादांना धीर दिला आणि त्यांना लिहायला, वाचायला शिकवले. दादांनी प्रथम बाराखडी, मुळाक्षरे शिकली. जोडाक्षरे ते दुकानाच्या पाट्या, बोर्ड वाचून शिकले. हळू-हळू त्यांचे लेखन वाचन वाढू लागले. त्यांचा वाचण्यापासूनचा प्रवास अनेक लोकगीतांच्या भटकंतीत झाला त्यातूनच त्यांचे "वाटचाल" आणि "मोहोळ" हे दोन काव्य संग्रह प्रसिद्धीस आले. वामनदादांची कविता विद्रोही आणि व्यवस्थेला जाब विचारणारी होती. म्हणूनच त्यांनी
सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो,
सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो.
अशा अनेक गीतांतून व्यवस्थेला जाब विचारल्याचे दिसून येते.
असे निडर होऊन थेट व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारत शेतकरी,मजूर आणि गोरगरीब वर्गाचे दुःख त्यांनी आपल्या कवितेतुन मांडले. याशिवाय त्यांच्या लेखणीत "ह्यो ह्यो पाव्हना, सखूचा मेव्हणा.." यासारख्या गीतांतून गंमतीदार तसेच प्रीतीची भावना व्यक्त करणारेही अनेक संदर्भ आलेले दिसतात.
दादांच्या या गाण्याने त्यावेळी आकाशवाणी वर धमाल केली होती. त्याचबरोबर उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारा त्यावेळचा चित्रपट म्हणजे "सांगते ऐका" या चित्रपटातील सर्व गाणी गदिमांची होती. पण त्यातील "सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला" हे गीत मात्र वामनदादांचे होते. तेही चित्रपट बारीवर तितकेच गाजले होते.
या गाण्यांच्या प्रसिद्धी नंतर अनेक चित्रपट गितलेखनाची कामे त्यांच्याकडे आयती चालून आली होती पण दादांना चित्रपटापेक्षा समाजसेवा तसेच जनजागृती करण्याचा ध्यास लागला होता त्या कारणाने दादांनी या सुवर्णसंधी नाकारल्या.
त्यावेळी आंबेडकरी चळवळ सर्वत्र वेगाने जोर धरू लागली होती. आंबेडकरांचे अनुयायी समतेच्या लढ्यात उतरले होते. वामनदादाही बाबासाहेबांच्या सभेला जात असत. समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देत. समस्त उपेक्षितांच्या जीवनाची प्रेरणा वामनदादांनी आपल्या कवितेतून अनेकदा व्यक्त केली. ’भीमवाणी’, ’ललकारी’, ’गडी तुम्ही भीमराणाचे’, ’भीमा तुझ्या मताचे’ आदी विविधांगी कवितांमधून वामनदादांनी भीमविचारांची प्रेरणा समाजामध्ये चेतवली होती. भीमनामक सूर्याने कालच्या काळ्याकुट्ट भूतकाळावर प्रकाशझोत टाकण्याचे महान कार्य केले, हे पटवून देताना अतिशय प्रभावी आणि आशयसंपन्न भूमिकेतून वामनदादा म्हणतात,
उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!
जखडबंद पायातील साखळदंड,
तटातट तुटले तू ठोकताच दंड...
झाले गुलामही मोकळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे...
नायगाव येथे 1943 साली वामन कर्डक यांनी बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिले होते. एकदा नरेपार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा होती. सभेपुर्वी वामनदादांच्या गितगायनाचा कार्यक्रम सुरू असतांना डॉ. आंबेडकरांचे आगमन झाले होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी वामनदादांना त्यांचे गीत आटोपते घेण्याचा सल्ला दिला. मात्र त्यावेळी बाबासाहेब स्वतः पुढाकार घेऊन म्हणाले, "माझे पाच भाषण असतात तसेच वामनदादांचे एक गीत असते. त्यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम झाल्याशिवाय मला भाषण देता येणार नाही, त्यांना गाऊ द्या!" असा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वरदहस्त लाभलेला हा महाकवी होता.
वामनदादांची गाणी ही गाणी नसून ती सर्व समाजाच्या सुख दुःखाची, हृदयाला हात घालणारी, मन पिळवटून टाकणारी समाजाचीच पीडा होती. यामध्ये नवरा-बायकोचे, सासू-सुनांचे , भावा-भावांचे, आई-मुलांचे भांडण आणि प्रेमही होते.
असे हे महाकवी वामनदादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे अतिशय सुंदर आणि यथार्थ वर्णन करताना म्हणतात,
शीलवान छत्रपती
शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण...!
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान ...!!
काळ्यारात्री तळपत होतं जिच्या रूपाचं उन,
अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून...!
त्या तरूणीला आई म्हणाला राजा तो शीलवान,
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान...!!
बांधीत होता मस्जिद ईथे अन् तेथे मंदिर,
त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शीर...!
अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान,
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान...!!
वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन,
मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन...!
असाच माझा शिवबा होता माणुसकीची खाण,
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान...!!