(Source: Matrize)
BLOG | कलेची श्रीमंती आज ओक्साबोक्सी रडली...
शनिवारचा 'माझा कट्टा' हा काही ही झालं तरी पाहायचं म्हणून निश्चित केलं होतं आणि त्याचा अलार्म देखील लावून ठेवला होता. कारण कट्ट्यावर होते प्रसिद्ध तमाशास्टार रघुवीर खेडकर आणि मंगलाताई बनसोडे.
असा एकही जुन्नरकर सापडणार नाही ज्यांना ही दोन नाव माहिती नाहीत. लहानपणी शेतातली काम आवरून संध्याकाळी धावत पळत घर गाठायचं आणि कशी तरी भाजी भाकरी पोटात कोंबून जिकडं ढोलकीचा आवाज येतोय त्या गावाची सायकलनं किंवा अगदी पायी पायी वाट धरायची. साधारणतः मार्च ते जून या कालावधीमध्ये तालुक्यातील कोणत्या ना कोणत्या गावात जत्रा असायची आणि जत्रा म्हणजे तमाशा हे अतूट नातं होत.
ज्या जत्रेला रघुवीर खेडकर, मंगलाताई बनसोडे, काळू बाळू, सुरेखा पुणेकर यांच्यापैकी जर कोणताही तमाशा असेल ते गाव खऱ्या अर्थानं श्रीमंत असा तर आमचा तेव्हा समज होता. तेव्हा दूरदर्शन वगळता एक ही चॅनल नव्हतं, मोबाईल अगदी नवखा होता. त्यामुळे गावातली वर्षातली तीन दिवस होणारी जत्रा आणि त्यातले तमाशे हा आख्या तालुक्याचा विरंगुळेचा विषय असे. त्यामुळे कोणत्या गावात कोणाचा तमाशा याची अगदी हँडबील खिशात घेऊन गावकरी फिरत असत.
आपल्या गावात एखाद्या वर्षी तरी रघुवीर खेडकर यांचा तमाशा आणायचाच ही गावातल्या तरुणांची जिद्द असायची, यासाठी चढाओढी लागायच्या. नारायणगाव स्टॅण्डच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मग त्या अनेक सजलेल्या तमाशाच्या राहुट्यांमध्ये जाऊन तमाशाची बुकिंग व्हायची आणि कोणत्या तमाशाची बुकिंग ग्रामस्थांनी केलेली असावी याची गावाला हुरहरी लागलेली असायची. काही झाले तरी नारायणगावच्या यात्रेत मात्र दहा दिवस तमाशाची रेलचेल असल्यानं तिथं एकसोएक तमाशा पाहण्याची पर्वणी असे म्हणून तिथे तोबा गर्दी ही असे. नाही निदान छोट्या गावात दोन ते तीन हजार इतका प्रेक्षक हा होताच. त्यात मोठे तमाशे असले तर तो डबल असे.
गण-गवळणने तमाशाला सुरुवात होत, लावणी, सिनेमा ची गाणी, बतावणी आणि अखेर वग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील तमाशाचा काही भाग पुन्हा दाखविला जायचा आणि मग फड तिथून हलायचा आणि पुढच्या गावाला जायचा. तमाशा ही मर्यादा समभाळत होता, त्यात खालच्या दर्जाचे फार से विनोद नव्हते, सामजिक संदेश देणारे वग म्हणजे नाटक होते. नंतर तमाशाने ही बदल स्वीकारले आणि तमाशातील प्रेक्षकांची गोडी जणू हळू हळू कमी होऊ लागली. त्यात शासनाने रात्रभर तमाशा चालण्यावर बंदी आणली आणि तमाशाचा वेळ कमी झाला. नंतर विविध वृत्तवाहिन्या आल्या, इंटरनेट आला, मोबाईल आला आणि तमाशा अगदी प्रेक्षकापासून लांब लांब जात राहिला.
मधल्या काळात मी मुंबईला आलो. तमाशापासून खूप लांब, गावाला जत्रेला जात होतो, कधी काळी तेव्हा ही रघुवीर खेडकर आणि मंगलाताई यांचे नाव कानावर पडत होते. कलेतील हीच खरी श्रीमंत माणसं तेव्हा वाटत होती. कारण त्यांचे तमाशे, कलाकार, मंडप आणि लवाजमा इतका की डोळे दिपवून टाकीत होता. पण हळू हळू जत्रेतील गर्दी ही ओसरू लागली, गाव, गावातली माणसं शहरांशी तंत्रज्ञानाने जोडली, जवळ आणली आणि जत्रेतील गर्दी मात्र ओसरू लागली. मग तमाशाच्या जागी ही ऑर्केस्ट्राचा पर्याय गावकऱ्यांनी आणला.तमाशा हळू हळू स्मृतीतूनच जाऊ लागले.
नारायणगावच्या एसटी स्टॅण्डवर कधी गेलो की चौकात असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांचा पुतळा फक्त कधी तरी तमाशाची आठवण करून देत होता.अशात आजच्या कट्ट्यावर तेव्हा पाहिलेली कलेतील दोन श्रीमंत माणसं आली होती. मात्र कट्टा पुढे पुढे जात होता आणि कलेचे श्रीमंत मात्र गेल्या काही वर्षात आर्थिक दृष्टीने फकीर होत गेल्याचे दिसले. हे असह्य होत होते, कधी काळी हजारो प्रेक्षकाच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य आणणारे आज गळ्यात गळे घालून ओकसाबोक्सी रडत होते. मदतीसाठी आर्जव करीत होते. फक्त स्वतःसाठी नाही एकूणच सर्व लोक कलावंत आणि तमाशा मधील कलाकारांसाठी मदतीचा पदर पसरत होते.
निगरगट्ट व्यवस्थेला धडका देऊन, नेत्यांचे उंबरे झिजवून ही हाती काहीच न लागल्याने आज एबीपी माझाच्या माध्यमातून जनतेसमोर आपले गाहाणे मांडत होते. रघुवीर खेडकर यांनी घर चालविण्यासाठी घरातला बंब विकल्याच सांगणे हे तर काळीज चिरून टाकणारं होतं. आधीच डबघाईला आलेला तमाशा कोरोनाने गळा आवळून श्वास कोंडेपर्यंत दाबुन धरलेला वाटला. सरकारने जर आता ही मदत नाही केली तर तो अखेरचा श्वास घेईल आणि निपचित पडेल. कदाचित आजच्या जगात तो परत उभा राहीलही, परंतु अजून किती काळ चालेल हे माहिती नाही. मात्र किमान आठ ते दहा हजार कलाकार या सृष्टीशी जोडलेले आहेत ते आज रडले असतील. आता तरी मायबाप सरकारला जाग येईल का? प्रेक्षक त्यांना आता तरी सन्मानाने जगण्याची संधी देणार की नाही? त्यांच्या कलेचा आस्वाद घेताना त्यांना इतर कलाकारांप्रमाणे दर्जा द्यावा हीच माफक अपेक्षा ते व्यक्त करीत आहेत आणि एवढं दानही इतक्या वर्ष कलेची सेवा करणाऱ्यांच्या पदरी पडू नये या पेक्षा मोठं दुर्दैव ते अजून काय असू शकते?
तेव्हा पाहिलेली श्रीमंत काहीच वर्षात एवढी भग्न झालेली पाहिल्याने मन अजून ही ते स्वीकार करीत नाहीये. पण रघुवीर दादा, मंगलाताई हे ही दिवस जातील...आणि नक्कीच सुगीचे दिवस पुन्हा येतील, ढोलकी वर थाप पडेल, गण गवळण सुरू होईल आणि टाळ्या आणि शिट्ट्यांच्या तालावर तुमची आणि तुमच्या सारख्या प्रत्येक तमाशा कलाकारांची थाटात फडावर एन्ट्री होईल हीच आशा व्यक्त करतो. फक्त आता रडू नका, लढा...लढत रहा...कारण तुम्ही रडलात म्हणजे कलेची श्रीमंती ऑक्साबोक्सी रडते आहे आणि ते आमच्या सारख्या महाराष्ट्रातील कला रसिकाला बघणं असह्य आहे.