एक्स्प्लोर
टीव्हीमालिका पाहणे एक राष्ट्रकार्य
टीव्ही मालिकांनी देश समोर आ वासून उभ्या असलेल्या ' तरूण मुला-मुलींनी आपलं सळसळतं तारूण्य कुठं खर्ची घालावं? ' या जटील प्रश्नाला वाचा फोडली आहे. त्यांचं सळसळतं तारूण्य, घरातील खुर्चीशी अथवा सोफ्याशी खिळवून ठेवण्यात वाहिन्या यशस्वी झाल्या आहेत.

आजघडीला घरा-घराच्या दिवाणखान्यात टीव्ही नामक अद्ययावत रुपातील यंत्राची प्राणप्रतिष्ठापणा झालेली दिसून येते. ज्यांच्या घरच्या टीव्हीची साईज मोठी त्या घरातील माणसांची कॉलर ताठ असे एकंदर चित्र आहे. इंद्राची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या भोवताली जशा रंभा-उर्वशी नृत्यगान करतात अगदी तशाच या टीव्ही नामक यंत्रावर शेकडो वाहिन्या सर्व वयोगटांमधील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास दत्त म्हणून उभ्या आहेत. मालिका , चित्रपट , चित्रपट गीतं, बातम्या, fashion shows, प्राणीजगत, क्राईम रापोर्ट, धार्मिक-अध्यात्मिक सत्संग, योगा यांपैकी प्रेक्षकांना जे जे हवं ते ते दाखवणं टिव्हीचं आद्य परमकर्तव्य आहे.
मागणी तसा पुरवठा या तत्वाचं तंतोतंत पालन हे वैविध्यपूर्ण कार्यक्रम प्रसारीत करणाऱ्या वाहिन्या करत असतात. एखाद्या व्यक्तीचा एखादा कार्यक्रम चुकला तरी पॅनिक होण्याची काहीच गरज नसते कारण त्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्याचं उदात्त कामंही त्या त्या वाहिन्या नित्यनेमानं आणि मनोभावे पार पाडत असतात. या वाहिन्या प्रेक्षकांच्या आवडी-निवडी, वय, व्यवसाय यांचा अत्यंत खोलात जाऊन अभ्यास करून त्यांच्यासमोर वेगवेगळ्या मेलोड्रामिक कार्यक्रमाची चटकदार डिश पेश करण्याचं महान राष्ट्रकार्य पार पाडत आहेत. या राष्ट्रकार्याच्या हेतूविषयी शंका घेण्याचं तुमचं-आमचं काहीच काम नाही कारण या राष्ट्रकार्यात फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण टीव्ही वाहिन्यांच्या कार्यक्रमरूपी चटकदार डिशचे खवय्ये अर्थात हक्काचे प्रेक्षक म्हणून हातभार लावत आहोत.
टीव्हीवर जास्तीतजास्त टिआरपी जर कशाला मिळत असेल तर तो म्हणजे मराठी /हिंदी वाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या मालिका नामक अर्ध्यातासाभराच्या ( पंधरा मिनीटे फक्त जाहिराती खचाखच भरलेल्या ) समाजपरिवर्तनात्मक कार्यक्रमांना. लहाणगी मूलं असोत, महिला असोत अथवा जेष्ठ नागरिक असोत प्रत्येकाला टिव्हीवर बघायची असते आपापली आवडती मालिका. आपल्यासारख्या मालिकाप्रेम्यांची एखादा दिवस अंघोळ करायची विसरेल पण मालिका बघायचं चुकूनही विसरणार नाही इतके आपण टीव्ही वाहिन्यांप्रती तनमनसे समर्पित आहोत.
घराघरात शेकडो वाहिन्या असल्या तरी टीव्ही शक्यतो एकच असतो. आणि रिमोटही एकच. टीव्हीवरील मालिंकामध्ये होणारी भांडणं, हेवेदावे, विवाहबाह्य संबंधांबाबतचे तेलचटणीमीठ लावलेले सीन बघायला आपल्या प्रत्येकाच्या घरात सकाळ-दुपार-संध्याकाळ रिमोटसाठी वाक्युद्धे घडतात. कधीकधी हमरीतुमरी आणि हाणामारी करायलाही आपण मागेपुढे पाहत नाही. कित्येकदा या वादात रिमोटही तुटतो, फुटतो , खिळखिळा होतो. फुटो बापडा. टीव्ही सलामत तो रिमोट पचास. आवडती मालिका / कार्यक्रम आणि त्यातील कौटुंबिक मेलोट्रामा बघितल्याशिवाय आपल्यातल्या कित्येकांच्या घशाखाली नीट घास उतरत नाही की रात्री शांत झोप लागत नाही इतकं उच्च पातळीवरचं प्रेम आपलं टीव्ही मालिकांप्रती आहे.
तमाम महिला वर्गही या राष्ट्रकार्यात आपल्या मौल्यवान वेळेची आहुती देण्यास रात्रंदिवस सज्ज असतो. स्वयंपाकादी कामे करताना टीव्ही सहजी नजरेच्या टप्प्यात असेल अशाच ठिकाणी टीव्हीची कायमची स्थाननिश्चिती झालेली असते. क्षणभरही टीव्हीच्या पडद्यावरून नजर हटून या महान राष्ट्रकार्यांत बारीकसाही अडथळा येवू नये हा शुद्ध हेतू त्यापाठीमागे आहे. येणाऱ्या पाहुण्यांची उठबसही टीव्हीसमोरच होत असल्याने तास दोनतासासाठी पधारलेल्या पाहुण्यांकडूनही चार समीधा या राष्ट्रकार्याच्या यज्ञात पडतात घराघरातील आणखी पुण्याचं काम. रोजमर्रा जिंदगीमध्ये सासू-सून-दीर-जाऊ-नणंद-भावजय या व्यक्तींशी कसा व्यवहार करावा याचे धडे या टीव्ही मालिका संपूर्ण महिला वर्गाकडून गिरवून घेत असतात.
घरातील लहाण मुलांना त्यांच्या आया टीव्हीसमोर अभ्यासाला बसण्याची आज्ञा देतात कारण मुलाचे लक्ष पुस्तकात न राहता टीव्हीच्या पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या ' देशाचे कर्तव्यदक्ष भावी नागरिक कसे व्हावे? ' या प्रश्नांची सोप्या व मनोरंजनात्मक पद्धतीने उत्तरं देणाऱ्या टीव्ही मालिकांवर खिळावे असा हितकारक उद्देश या कृतीमागे असतो. मालिकेचा टेलिकास्ट, रिपीट टेलिकास्ट बुडून राष्ट्रकार्यात व्यत्यय आल्याने या महिलांची अवस्था 'पायाखालची जमीन दुभंगून भूमातेनं आपल्याला उदरात घ्यावं.' अशी होवू नये म्हणून तंत्रज्ञानाच्या कृपेने प्रत्येक महिलेच्या हातात स्मार्टफोन आला आहे. ती महिला चुकलेला एपिसोड मोबाईलवर डाऊनलोड करून घेवू शकते. कानाला हेडफोन लावून त्याचा विनाव्यत्यय आनंद घेऊ शकते.
घरातली पुरूषमंडळीही कामावरून आल्याआल्या टिव्हीच्या पडद्यावर पहिला कटाक्ष टाकून या राष्ट्रकार्य विषयक पुण्यकार्यास आरंभ करतात. टीव्हीच्या पडद्यावर चालू असलेल्या लक्ष खिळवून ठेवणाऱ्या मालिकांमुळे ते आपलं तनमनधन विसरून इतके तल्लीन होतात की कामावरून आल्या-आल्या चहापाणी आदी फर्माईशी सोडण्याचं त्यांची गावी किंवा शहरीही राहत नाही. त्यामुळेच कौटुंबिक वादावादीचं प्रमाणही कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
मालिकेतले नायक हे तमाम पुरूषमंडळींच्या मनात कुठल्यातरी कोपऱ्यात पडलेल्या धूळ खात पडलेल्या सुप्त इच्छांना नवसंजीवनी देत असल्याने ते या नायकांशी अगदी हृदयापासून जोडले गेलेले आहेत. आपल्या मित्र मंडळींना, सहकाऱ्यांना तत्सम मालिकांसंबंधी माहिती देऊन, मालिका पाहण्यासाठी उद्युक्त करून त्यांना या ऐतिहासिक राष्ट्रकार्यात खेचून आणण्याचं काम करत आहेत याची नोंद होणं गरजेचं आहे.
टीव्ही मालिकांनी देश समोर आ वासून उभ्या असलेल्या ' तरूण मुला-मुलींनी आपलं सळसळतं तारूण्य कुठं खर्ची घालावं? ' या जटील प्रश्नाला वाचा फोडली आहे. त्यांचं सळसळतं तारूण्य, घरातील खुर्चीशी अथवा सोफ्याशी खिळवून ठेवण्यात वाहिन्या यशस्वी झाल्या आहेत. तरूण मुलं-मुली मालिकांमधील नायक-नायिकांचे फोटो वॉट्सअप-फेसबुक डीपीला लावून, वेळ मिळेल तसं प्रसिद्ध मालिकेविषयी स्टेटसरूपी चारओळी लिहून राष्ट्रकार्यातील आपला वाटा विनातक्रार उचलत आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. कॉलेजमधल्या ऑफ पिरेडचा अमूल्य वेळ टीव्हीवरचे चुकलेले एपिसोड सामूहिकरित्या मोबाईलवर पाहून ते सत्कारणी लावत आहेत.
वयोवृद्ध लोकांचं ' आमच्या वेळी असं होतं अन् आमच्या वेळी तसं होतं ' हे वारंवार गळे काढून ह्याला त्याला आणि दिसेल त्याला सांगत बसणं या टिव्ही मालिकांमुळेच संपूर्ण कमी झालं आहे हे नजरअंदाज करण्यासारखं नाही. त्यांची नातवंडंही टीव्ही मालिका बघण्यात गर्ग झाल्यानं त्यांना त्याचत्या राजा-राणीच्या, पंचतंत्राच्या घिस्यापीट्या गोष्टी सांगण्यातून त्यांची कायमची सुटका झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक वेळ देव धर्मविषयक टीव्ही मालिका बघण्याचं राष्ट्रकार्य हे वयोवृद्ध लोक नव्या जोमानं, नव्या चष्म्यानं पुढे नेत आहेत.
दिवस आणि रात्रभरातला अधिकाधिक वेळ टिव्ही मालिका पाहण्याच्या राष्ट्रकार्यात उडी न घेणाऱ्यांनी केवळ आम्हांसच खूप कळते या अविर्भावात " छछोर, थिल्लर आणि बटबटीत टीव्ही मालिकांमुळे अवघा समाज सर्वार्थाने बिघडत चालला आहे." असे बिनबुडाचे आरोप टीव्ही वाहिन्यांवर करण्यास सुरूवात केली आहे. या पुरावेशून्य आरोपांना कुठलेच कोर्ट भीक घालणार नाही हे दिवसेंदिवस दर्जेदार मालिका निर्मिती व प्रसारणाच्या राष्ट्रकार्याची धूरा खांद्यावर वाहून नेणाऱ्या टीव्ही वाहिन्यांना आणि त्या मालिका पाहण्याच्या राष्ट्रकार्यात स्वतःचं आयुष्य झोकून देणाऱ्या प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक आहे.
प्रेक्षकांच्या अभिरूचीचा दर्जा वरचेवर उंचावत नेणाऱ्या टीव्ही वाहिन्यांप्रती आणि न चुकता त्या बघून आपली जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या प्रेक्षकांप्रती आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. या महान राष्ट्रकार्यासाठी दोघांनाही दिल से शुभेच्छा. जय टीव्ही मालिका !! जय प्रेक्षक !!
- कविता ननवरे
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग

























