BLOG | मुळ्ये काका - पांढरं वादळ @76
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्याबद्दल लिहिताना मलाही 'पांढरं वादळ' हेच शीर्षक सुचलं. कारण, मुळ्येकाका म्हणजे एक वादळच आहेत, चालतंबोलतं. त्या वादळात अडकायला, त्याचे फटकारे झेलायला त्यांना ओळखणारे लोक नेहमीच तयार असतात. कारण, हे पांढरं वादळ नुकसान करणारं नाहीये, तुम्हा आम्हाला काहीतरी देऊन जाणारं आहे. होरपळलेल्या मनांना फुंकर घालणारं आहे, जीवघेण्या स्पर्धेत थकलेल्यांचं रंजन करणारं आणि त्याच वेळी सामाजिक बांधिलकीची वीण घट्ट करणारं आहे.
पांढरा शर्ट, पांढरी पँट, काखेत घडी केलेली पिशवी. त्यामध्ये डायरी आणि एखादं पुस्तक. ही ओळख आहे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंची. अर्थात मुळ्येकाका म्हणून अवघ्या कलाविश्वाला परिचित असलेल्या अवलियाची. गेल्या वर्षीच त्यांनी वयाची पंचाहात्तरी पार केली, तर यावर्षी (आज 20 ऑक्टोबरला) ते 76 पूर्ण करुन 77 व्या वर्षात पदार्पण करतायत. माझा मुळ्येकाकांशी आधी परिचय होता, पण तो अधिक वाढला ते आधी 'कट्टर गिरगावकर' आणि नंतर 'गिरगाव सारेगमप' या संगीत स्पर्धेच्या निमित्ताने. मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख झाली ती याच दोन कार्यक्रमांमुळे.
नाट्य विश्वात, अगदी मराठी चित्रपट, मालिका विश्वातही अशोक मुळ्ये या नावाला प्रचंड रिस्पेक्ट आहे. तितकीच या नावाची प्रेमळ दहशतदेखील आहे. अगदी प्रशांत दामलेंपासून ते आताच्या तेजश्री प्रधान, ऋतुजा बागवेपर्यंत साऱ्या कलाकारांशी त्यांचा असलेला स्नेह, प्रेम हे त्यांच्यासोबत अनेकदा वावरल्याने मी प्रत्यक्ष पाहिलंय, अनुभवलंय. मुळ्येकाका म्हणजे हटके कार्यक्रमांची संकल्पना हे समीकरणच जणू. ज्याला सामाजिक आशय हा असतोच. किंबहुना ते पुस्तकांसोबत ते माणूसही आतून-बाहेरुन वाचतात. साहजिकच त्यांच्या भावभावनांशी, सुखदु:खांशी मुळ्येकाका कनेक्ट होतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांना हा सामाजिक टच येतो.
मग बेड रिडन मुलांच्या आईवडिलांसाठीचं संमेलन असो, विस्मृतीत गेलेल्या पण एक काळ गाजवलेल्या कलाकारांचं संमेलन असो, नाहीतर दिवाळी अंकात लिहिणाऱ्या लेखकांचं संमेलन. त्यांचा मराठी भाषा दिनही अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. ज्यामध्ये इंग्रजी माध्यमांची किंवा अमराठी घरातली मुलं आपली कला सादर करतात. कधी ते दुर्दैवी अपघातात हात गमावणाऱ्या मोनिका मोरेच्या भेटीला पोहोचतात तेही सुपरस्टार भरत जाधवला घेऊन. तेव्हा मोनिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद काय होता, हे सांगताना मुळ्येकाकांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे त्याहीपेक्षा असीम असतं. तर कधी कॅन्सरग्रस्त सृष्टी कुलकर्णीची पॉझिटिव्हिटी सांगत असतानाच ते हळवे होतात तर कधी तिच्या सकारात्मकतेला सलाम करतात. जीवनगाणीचे प्रसाद महाडकर यांच्यासह अनेकांच्या कार्यक्रमांसाठी तहानभूक विसरुन बॅक स्टेजला चोख व्यवस्था सांभाळणारे मुळ्येकाका मी अनेक कार्यक्रमांच्या वेळी पाहिलेत. कलाकारांना कधी खारी तर कधी आणखी काही खादाडी घेऊन जाणारे मुळ्येकाका म्हणजे या कलाकारांचा हक्काचा फॅमिली मेंबर. प्रेमाने खाऊ घालणारा, हक्काने कान उपटणारा, प्रेमळ अपमान करणारा. तरीही हवाहवासा वाटणारा.
'माझा पुरस्कार' नावाने ते स्वत: पुरस्कार देत असतात. त्याही कार्यक्रमात सबकुछ मुळ्येकाका असंच असतं. म्हणजे कार्यक्रमाची आखणी, खर्चाचं नियोजन, पुरस्कार विजेते कोण हे ठरवणं तसंच या कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या कलाकारांचा मेळ जुळवून त्यांना कार्यक्रमाला बोलावणं इथपासून ते पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित आखून झाल्यानंतर त्या कार्यक्रमाचे विनामूल्य पासेस वितरणाला स्वत: बसणारा हा माझ्या पाहण्यातला एकमेव आयोजक आहे. एखादा कार्यक्रम मनात घेतला की, ते झपाटल्यागत वावरत असतात. म्हणजे कार्यक्रम प्लॅन केल्यापासून तो प्रत्यक्षात होईपर्यंत त्यांना नीट जेवणही जात नाही. ते सतत त्या कार्यक्रमाचा ध्यास घेतल्यागत वावरत असतात. त्या कार्यक्रमाच्या पासवरचा मजकूर, कलाकारांची नावं, त्याचं डिझाईन याकडे अत्यंत बारकाईने ते लक्ष देऊन असतात. याशिवाय आपण जो मजकूर देऊ मग तो पासवरचा असो वा बॅनरवरचा. त्यावरची भाषा ही शुद्धच हवी, असा त्यांचा कटाक्ष असतो आणि आग्रहदेखील. त्यांना स्टेजवरील नेपथ्याचाही अफलातून सेन्स आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार, त्याचं नेपथ्य आहे की नाही, याचीही दक्षता ते घेत असतात. अर्थात त्यांच्यावर प्रेम करणारे डेकोरेटर्स, केटरर्सही त्यांच्या या कार्यक्रमाला कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता आपल्या परीने सहाय्य करत असतात. या कार्यक्रमांसाठी लागणारी आर्थिक तरतूद ही साहजिकच मुळ्येकाकांच्या प्रेमापोटी आपोआप होत असते. म्हणजे अनेक नामवंत मंडळी त्यांच्या हातात, खिशात पैसे किंवा चेक कोंबून जाताना मी स्वत: पाहिलंय. ज्यांच्या खिशात भरपूर पैसे आहेत, असे लोक माझ्या खिशात आहेत, या मुळ्येकाकांच्या वाक्याची यामुळे प्रचिती येते.
अगदी कॉर्पोरेट्सचे मोठे अधिकारी, काही बडी राजकीय नेतेमंडळीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे फॅन आहेत. तर काही पोलिस मंडळीही त्यांच्या या नि:स्वार्थी अन् सडेतोड वृत्तीमुळे त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणजे त्यांचं तुफान वाचन. त्यांच्या हातात असलेल्या पिशवीत तुम्हाला नेहमीच एखादं पुस्तक नक्की सापडतं. साहजिकच त्यामुळे त्यांची भाषेवर जबरदस्त पकड आहे. त्यांना उत्स्फूर्ततेचंही वरदान आहे. म्हणजे अनेक नाटकांच्या, कार्यक्रमांच्या जाहिरातींच्या कॅचलाईन्स या मुळ्येकाकांच्या असतात. ऋतुजा बागवेच्या अलिकडेच आलेल्या 'अनन्या' या गाजलेल्या नाटकासाठीही काकांनी अशाच कॅचलाईन्स जाहिरातीत दिल्या होत्या.
त्यांच्या एका जाहिरातीबद्दल त्यांनी सांगितलेला किस्सा मला चांगलाच लक्षात आहे. मागे एकदा क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होता, त्यावेळी भरत जाधव यांचं 'सही रे सही' नाटक जोशात होतं. सामन्याच्या दिवशी प्रयोग लावण्यात आला होता, तेव्हा मुळ्येकाकांनी जाहिरातीत दिलेली कॅचलाईन होती, 'आज कोण जिंकणार भरत की भारत?'
प्रयोग हाऊसफुल झाला आणि भारत तो सामनाही जिंकला. काकांनी दुसऱ्या दिवशी कॅचलाईन दिली, 'भरतही जिंकला आणि भारतही.'
काकांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा. खरंतर तीच त्यांची खरी ओळख आहे. म्हणजे एखादी गोष्ट पटत नसेल किंवा खटकत असेल तर ती तोंडावर सांगण्याचा स्पष्टवक्तेपणा, खरेपणा ते नेहमी दाखवतात. अशी रोखठोक तोंडावर बोलणारी माणसं नेहमीच आढळत नाहीत. तोच मुळ्येकाकांचा वेगळेपणा आहे. अगदी 'माझा पुरस्कार' कार्यक्रमातही जेव्हा ते बोलायला उभं राहतात, तेव्हाही शाब्दिक कोट्या, मध्येच वात्रटपणा, कुणाला चिमटे काढ, कुठे राजकीय कोपरखळी मार, कुठे प्रेक्षकांना शालजोडीतला देऊन पुढे जा. अशी त्यांची बॅटिंग सुरु असते. याबाबतीत ते सचिन, सेहवाग, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कॉम्बिनेशन असतात. तुफान हास्यविनोद. समोर कोणतंही स्क्रिप्ट नाही. तरीही भाषणात एक ऱ्हिदम असतो. त्यांचे पंचेस एखाद्या कसलेल्या कलाकाराच्या नाटकातील संवादाप्रमाणे लाफ्टर आणि टाळ्या घेतात.
त्यांची दिनचर्या शिस्तबद्ध आहे. म्हणजे सकाळी लवकर उठणं. दैनंदिन कामं आटोपून वृत्तपत्र वाचन करणं. हे झाल्यावर मग गिरगावातील मॅजस्टिक बुक डेपोत त्यांची स्वारी येते. तिथून पुढे बाकीची कामं. सध्या कोरोना काळामुळे बंधनं आहेत म्हणून, नाहीतर शिवाजी मंदिरपासून दीनानाथ नाट्यगृहापर्यंत अगदी गडकरी रंगायतनलाही त्यांचा संचार ठरलेला. अनेक जुने-नवे कलाकार काकांना हक्काने आपल्या कार्यक्रमांना, नाटकांना आवर्जून बोलावतात. त्यांना प्रतिक्रिया विचारतात आणि काकांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत गांभीर्याने घेतात. कारण ती खरी असते, आतून आलेली असते. त्याला कुठेही पॉलिटिकली करेक्ट वागण्याचं कोंदण वगैरे नसतं. ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर एका लेखात काकांबद्दल म्हणाले होते, त्यांच्या जिभेच्या पट्ट्यावर वीजनिर्मिती केली तर अख्ख्या शहराला प्रकाश मिळेल. मी पुढे जाऊन त्यात म्हणेन की, हा प्रकाश अनेकांची आयुष्य उजळून टाकेल. तो स्वच्छ, निखळ असेल काकांच्या पांढऱ्याशुभ्र कपड्यांसारखा.
त्यांच्याबद्दल लिहिताना मलाही 'पांढरं वादळ' हेच शीर्षक सुचलं. कारण, मुळ्येकाका म्हणजे एक वादळच आहेत, चालतंबोलतं. त्या वादळात अडकायला, त्याचे फटकारे झेलायला त्यांना ओळखणारे लोक नेहमीच तयार असतात. कारण, हे पांढरं वादळ नुकसान करणारं नाहीये, तुम्हा आम्हाला काहीतरी देऊन जाणारं आहे. होरपळलेल्या मनांना फुंकर घालणारं आहे, जीवघेण्या स्पर्धेत थकलेल्यांचं रंजन करणारं आणि त्याच वेळी सामाजिक बांधिलकीची वीण घट्ट करणारं आहे.
काकांना 76व्या वाढदिवसाच्या तसंच उत्तम आरोग्यासाठी मनापासून शुभेच्छा. कोरोना काळ लवकर संपावा आणि काकांच्या हटके संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आणि अन्य कलाकारांप्रमाणेच त्यांच्याकडून अपमानपत्र मिळण्याचा योग लवकर यावा, हीच इच्छा.
अश्विन बापट यांचे यापूर्वीचे ब्लॉग