BLOG : 'पिंजरा'तील 'लागली कुणाची उचकी' गाताना कस लागला - उषा मंगेशकर
BLOG : 'पिंजरा' सिनेमासाठी अण्णांनी अर्थात व्ही शांताराम यांनी मला गायला बोलावणं हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माझ्या कारकीर्दीत 'पिंजरा' सिनेमातील गीतांचं स्थान फार मोलाचं आहे. या सिनेमातील 'लागली कुणाची उचकी' हे गीत गाण्यासाठी अधिक आव्हानात्मक आहे, ते गाताना माझा कस लागला, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर 'पिंजरा'च्या आठवणी निघताच भरभरुन बोलू लागल्या.
व्ही शांताराम यांचा पिंजरा सिनेमा 31 मार्च 1972 ला प्रदर्शित झाला, याला आता 50 वर्ष उलटूनही सिनेमातली गीतं मनाला भुरळ घालतात. तुमच्या आमच्या मनाच्या कप्प्यात ती आजही घर करुन आहेत.
चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने उषाताईंशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी दीदीच्या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने अण्णांकडे जात असे. त्यांनी माझी 'काय गं सखू, माळ्याच्या मळ्यामंदी' यासारखी गीतं ऐकलेली होती. त्याच अण्णांनी एक दिवस मला 'पिंजरा'साठी गायला बोलावलं. माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण होता. त्याआधी त्यांच्याकडे दीदी आणि आशाताई गायली होती. आता त्यांनी मला बोलावल्यानं आनंदही झाला, त्याच वेळी दडपणही आलं.
मी त्यावेळी त्यांना म्हटलंदेखील की मी लावणी गात नाही हो...त्यावर त्यांनी माझाच आवाज या गीतांना हवा असा आग्रह धरला. मग आमचं रेकॉर्डिंग सुरू झालं. चित्रपटासाठी गीतकार होते जगदीश खेबूडकर आणि संगीतकार राम कदम. राम कदमांकडे मी आधी गायले होते. त्यांच्या चाली अप्रतिम होत्या. त्यांनी मला गावरान ढंग गाण्यात कसा आणायचा ते शिकवलं. त्यांची शिकवण्याची पद्धतही खूप छान होती. बैठकीची लावणी, बोर्डावरची लावणी असे लावणीचे प्रकार त्यांनी मला उलगडून सांगितले. त्या प्रत्येकाची वैशिष्ट्ये, त्यांची मर्मस्थानं त्यांनी अधोरेखित केली.
जगदीश खेबूडकरांचे शब्दही तितकेच परिणामकारक. लावणी अंगाने जाणारी गीतं, त्याच वेळी ही गीतं कुठेही अश्लील होणार नाहीत, द्वयर्थी होणार नाहीत हा तोल त्यांच्या शब्दांनी नेहमीच सांभाळला. मी तर म्हणते, लावणी लिहावी तर खेबूडकरांनीच.
अण्णा अर्थात व्ही.शांताराम यांनाही संगीताचा उत्तम कान होता. म्युझिकचा जबरदस्त सेन्स असलेले ते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक होते. त्यामुळे त्यांचंही गीतांकडे कटाक्षाने लक्ष असायचं. तसंच गायकांना गाणं गायला सोपं जावं, त्या शब्दांशी-चालींशी तो गायक किंवा ती गायिका कम्फर्टेबल हवी याकरता ते नेहमी आग्रही असत. याकरता ते मलाही अनेकदा विचारणा करत. उषा, तुला हे गाणं गायला कसं वाटतंय? त्यातले शब्द आवडले का, सूर आवडला का, असं ते विचारत. माझा सूर जर नकाराचा असेल, तर ते गाणं बदलून घेत. इतके ते गायकाचं मन जपायचे. यातल्या चालीही उत्तम, त्यातले तितकेच छान. साहजिकच माझी जबाबदारी वाढलेली. म्हणजे चांगलं तयार झालेलं गाणं ते गायकाकडूनही तितक्याच चांगल्या पद्धतीने सादर व्हायला हवं.
आम्ही प्रत्येक गाण्यासाठी तीन-चार रिहर्सल केल्या. माझ्यासाठी यातलं सर्वात आव्हानात्मक गाणं होतं ते लागली कुणाची उचकी. गाता मला उचकी घ्यायची होती, मी अण्णांना म्हटलंही, अहो कोरसमधील कुठलीही गायिका ही उचकी घेऊ शकते. मला नका सांगू गाता गाता उचकी घ्यायला.
अण्णा म्हणाले, तू नायिकेला आवाज देतेस. तर उचकीही तुझ्याच आवाजात आली पाहिजे. मग अखेर मीच ते गीत गायले. लावणी गाणं किती कठीण आहे, याचा प्रत्यय मला या सिनेमाच्या निमित्ताने आला. त्याच वेळी या गाण्यांसाठी माझं अण्णांनी कौतुक करणं, माझ्यासाठी खूप मोठा क्षण होता. शिवाय दीदीची मला मिळालेली दाद अविस्मरणीय आहे. ती म्हणाली, तू जसं गायलीस, तसं मला नाही जमणार.
तिला 'लागली कुणाची उचकी..' हे माझं गाणं खूप आवडायचं. शिवाय 'छबीदार छबी' गाण्यातील आरं बत्ताशा...हे तिला खूप आवडलेलं. ती म्हणाली, तू या गाण्यातला गावरान ठसका आणि फोर्स अगदी अचूक पकडलास.
मी पिंजरा सिनेमानंतरही अनेक लावण्या गायल्यात. पण, 'पिंजरा'तील गीतांच्या लोकप्रियतेची उंची ती गाणी गाठू शकली नाहीत. 'पिंजरा'तली गाणी ही सिनेमाच्या कथेला पुढे नेणारी होती. यातलं डॉ. लागू तसंच निळू फुलेंचं काम मला खूप आवडलेलं.
राजकमल स्टुडिओत या गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे दिवस मला आठवतात. रेकॉर्डिस्ट होते मंगेश देसाई. त्यावेळच्या रेकॉर्डिंगबद्दलही मला भावलेली गोष्ट म्हणजे गाणं सलग आणि पूर्ण गायला लागायचं. आतासारखं तुकड्या तुकड्यात तेव्हा रेकॉर्डिंग होत नसे. त्यामुळे गाणं अनेकदा गाऊन ते मनात पक्क व्हायचं. त्यातल्या जागा, हरकती गाताना त्या परिपूर्ण होत असत. आपण पूर्ण गाणं गाताना त्यात काही प्रयोगही करता येतात. एखादी ओळ दोन वेळा घ्यायची असेल किंवा एखादी तान बदलायची असेल तर तसं करता येतं. आता म्युझिक बनवून ठेवलेलं असतं त्याला फॉलो करत आपण गायचं. गाण्याची ही पद्धत मला अजिबात रुचत नाही. त्यामुळे आपण नवी गाणी फार ऐकत नाही, असं सांगत असतानाच आजही मला माझ्या कार्यक्रमांमध्ये 'दिसला गं बाई दिसला'ची आवर्जून फर्माईश येते, तेव्हा मी केलेल्या कामाचं वेगळंच समाधान मिळतं, वेगळा आनंद मिळतो, असं उषाताईंनी गप्पांची सांगता करताना आवर्जून नमूद केलं.