एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG: माझी आई साक्षात अन्नपूर्णा; आपुलकीनं वाढवला हॉटेल व्यवसाय
माझी आई निर्मला गाळवणकर साक्षात अन्नपूर्णा होती. आम्ही पाच भावंडं. चार बहिणी एक भाऊ. त्यातही माझ्यासोबत राहणं, वावरणं तिला अधिक आवडत असे, हॉटेल व्यावसायिक मंगल गाळवणकर सांगत होत्या.त्या पुढे म्हणाल्या, आम्हा सर्वच मुलांशी तिची भावनिक गुंतवणूक खूप होती. माझ्या आईची आई अर्थात माझी आजी आई एक वर्षांची असताना गेली. त्यामुळे माझ्या आईला तिच्या आईचा सहवासच मिळाला नाही. आपल्या आयुष्यात आलेलं रितेपण आपल्या मुलांना येऊ नये, म्हणून तिने जिवाचं रान केलं.
माझी आई भास्कर गाळवणकरांच्या म्हणजे माझ्या बाबांच्या घरात लग्न होऊन आली आणि बाबांच्या घराची भरभराट झाली. गिरगावात आम्ही सत्कार हॉटेल सुरु केलं. ज्याला आता ६४ वर्षे झालीत. बाबांना या प्रवासात तिने खंबीर साथ दिली.माणसं जपणं हा तिचा गुण थक्क करणारा आहे. आपल्या हॉटेलमधील कामगारांकडून हसतमुखाने, त्यांचं मन जपत काम करुन घेणं हे तिचं कसब होतं.जेवणाचे पदार्थ तयार करणं आणि ते आपुलकीने वाढणं या दोन्ही गोष्टी हॉटेल व्यवसायात किती महत्त्वाच्या आहेत, हे तिने माझ्या मनावर ठसवलंय.
आमच्या घरीही पाहुण्यांचा अखंड राबता असायचा. त्यांनाही अगदी हसतमुखाने, न थकता ती जेवू घालायची. प्रेमाने जेवणखाण केलं की कुटुंब बांधलेलं राहतं, यावर तिचा विश्वास होता. आमच्या हॉटेलमध्ये एडमिन पार्ट मी पाहत असे आणि किचनची जबाबदारी ती घेत असे. बाबांचं निधन झाल्यानंतरही आई ठामपणे माझ्यासोबत होती. अगदी कॅश काऊंटरवर ती बसत असे. माझ्यातही तिने धाडसी वृत्ती निर्माण केली, तू आमची मुलगी नाही तर मुलगाच आहेस, असं ती नेहमी म्हणायची.
एक क्षण मला नेहमी आठवतो. त्यावेळी म्हणजे १९९८ मध्ये हॉटेलचं नूतनीकरण आम्ही करायला गेलो असता तांत्रिक, कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी हॉटेल जवळपास १५-१६ महिने बंद ठेवावं लागलेलं. या काळात आपल्या कर्मचारी वर्गासाठी ती स्वत: जेवण तयार करत असे. कर्मचारी वर्गाचाही तिच्यावर खूप जीव होता. त्यामुळे तेही तिला मदत करत असत.घरात गरीबातला गरीब किंवा श्रीमंतातला श्रीमंत येऊ दे, तिचं वागणं सर्वांशी समान असे. गरीबाचाही ती सन्मान करत असे.
तिचा कामाचा उरक, झपाटाही भन्नाट होता. कोणताही पदार्थ ती थक्क करणाऱ्या वेगाने करायची. मग ते रवा लाडू असो वा आणखी काही. तिच्या हातचा कोलंबी-बटाटा, शिरवाळे हा पदार्थ मला आवडत असे. तर, माझ्या हातचा चहा आणि केक तिला खूप आवडत असे. परमेश्वराचा तिला आशीर्वाद होता, वरदहस्त होता.
टापटीपपणा, स्वच्छताही तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू. तिला साड्यांची खूप आवड. तिचं मॅचिंग खूप छान असायचं. दागिने, ड्रेसिंगचाही तिला भन्नाट सेन्स होता. तिला लिखाणाची आवड होती. तिने त्या काळीही पाककृती लिहून खूप जपून ठेवल्यात. मीही तिचं ते कलेक्शन जपून ठेवलंय. तिच्या या पाककृतींच्या संग्रहाचं पुस्तक यावं अशी माझी इच्छा आहे. तसंच तिच्या नावे दत्त मंदिर आणि एक हॉस्पिटलही साकारावं, असा माझा मानस आहे.
अश्विन बापट यांचे हे ब्लॉगही नक्की वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement