BLOG : माझी माय माझी प्रेरणा : "पाय कायम जमिनीवर, नजर ध्येयावर"; स्वाती साठेंना आईनं दिलेला कानमंत्र
कोणाच्याही आयुष्यात आईचं स्थान अनन्यसाधारण आहे, तसंच ते माझ्याही आयुष्यात आहे. मला आईबद्दल बोलताना जुन्या दर्द का रिश्ता या सिनेमामधील गीत आठवतं. बाप की जगह माँ ले सकती है. माँ की जगह कोई ले नही सकता, असा त्या गीताचा आशय होता. अगदी तसंच माझ्या आयुष्यातलं आईचं स्थान आहे. राज्य पोलिस दलातील पश्चिम विभाग, पुणेच्या (Pune) कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आपल्या आईबद्दल मृणालिनी साठेंबद्दल भरभरुन व्यक्त होत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, आज ती या जगात नाहीये. तिला जाऊन अनेक वर्षे झाली. तरीही तिने जे संस्कार मनावर बिंबवलेत, तिची जी आदरयुक्त भीती आहे ती कायम आहे आणि राहणार आहे. किंबहुना तिची ही शिकवण माल सरळमार्गी राहायला फार मोलाची ठरलीय.
पराभूत होऊन आलीस तरी चालेल. आमची मुलगी अप्रामाणिक, भ्रष्टाचारी आहे, हे मात्र आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असं तिने मला निक्षून सांगितलेलं. आजही ते विचार, ती आदरयुक्त भीती मनात कायम आहे.
वयाने, पदाने, पैशाने तुम्ही कितीही मोठे झालात तरी आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही. कुटुंब चांगलं घडलं तर समाज चांगला घडतो आणि पर्यायाने देशही. हे सारं एक आई उत्तम घडवू शकते. ती कुटुंबाचा पाया असते.
माझ्या आईला शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व होतं. ती त्या काळातील पोस्ट ग्रॅज्युएट होती, यासोबतच तिला सर्व कला ज्ञात होत्या. गायन कला, वादन कला, विणकाम, भरतकाम, शिवणकाम अशा सर्व कला तिला अवगत होत्या. तिने केलेलं विणकाम, भरतकाम इतकं सुबक आणि देखणं असायचं की, आम्ही जेव्हा तिने केलेला एखादा ड्रेस घालून बाहेर जायचो, तेव्हा लोकांना ते एखाद्या कसलेल्या व्यावसायिकाने साकारलेलं वाटायचं.
माझ्या करिअरमधील तिचा सपोर्ट अनमोल आहे. मी क्रिमिनॉलॉजीसारखी अत्यंत वेगळी वाट निवडली, तेव्हाही आईवडिलांनी मला खंबीरपणे पाठिंबा दिला. जे काही करशील, ते सर्वस्व पणाला लावून कर, हे त्यांनी कायम माझ्या मनावर ठसवलं.
मला एक प्रसंग आठवतो. माझं ट्रेनिंग सुरु होतं, तेव्हा माझी मुलगी दीड वर्षांची होती. खडतर प्रशिक्षणामुळे मी तिला वेळ देऊ शकत नव्हते. जेव्हा तिचं वय खूपच लहान होतं, तेव्हा माझ्या मुलीचीही ती आई झाली. तिलाही आईने उत्तम सांभाळलं. म्हणून मी माझ्या क्षेत्रात मोठी मजल मारु शकले.
आपण काहीतरी वेगळं करतोय, असा भाव मनात अजिबात न आणता आपल्या क्षेत्रात मेहनतीने, जोमाने, प्रामाणिकपणेच पुढे जायचं हे तिने नेहमीच आवर्जून सांगितलं.
आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे. एकदा माझ्याकडे एका जिल्ह्याचा चार्ज होता. हाताखालचा एक अधिकारी येणार होता, तेव्हा ज्याच्या वागण्याबोलण्याविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी खूप उलटसुलट चर्चा ऐकलेल्या. मी आईला त्या अधिकाऱ्याबद्दल बोलले, तेव्हा ती म्हणाली, कोणताही किंतु,परंतु मनात न ठेवता कोऱ्या पाटीने तू या परिस्थितीला सामोरी जा. कदाचित लोकांचा अनुभव वेगळा असेल, तुझा आणखी वेगळा असेल. तुम्ही मंडळी, कैद्यांचं मनपरिवर्तन करता, मग पोलीस अधिकाऱ्यांचं का नाही करु शकत. हा तिचा सल्ला माझा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.
आपला अध्यात्मिक पाया हवा. मुळांशी कायम जोडलेलं हवं. हेही ती सतत सांगत असे.
माझे वडील शास्त्रज्ञ होते. हॉटेलमध्ये जाऊन खाणं त्यांना मान्य नव्हतं. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांची सतत बदली व्हायची. याच परिस्थितीमुळे आई सर्व प्रांतातले अनेक पदार्थ शिकली.
आईच्या हातचे दाक्षिणात्य पदार्थ मला फार आवडत. तिने केलेली इडली तसंच मेदूवड्याची चव आजही माझ्या जिभेवर कायम आहे. तर, माझ्या हातचे उकडीचे मोदक ती आवडीने खात असे.
आईला कोकणात फिरायला आवडायचं.
राजस्थानात जयपूरमध्ये आम्ही 10 वर्षे राहिलो. आमेर पॅलेस हा तिच्या सगळ्यात जास्त आवडीचा होता. अनेक धार्मिक ठिकाणं तिला आवडायची. धार्मिक भाव घेऊनच तिथे जावं असं तिला नेहमी वाटत असे. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे आणि कायम राहणार आहे, असंही स्वाती साठे यांनी संवादाची सांगता करताना आवर्जून सांगितलं.