BLOG : हा हातोडा नेमका कुणावर?
आता राजकारण्यांना शिव्या हे तसं आपणाला नवीन नाही. पण, यावेळी त्याला महत्त्व आहे. मुख्य गोष्ट म्हणजे कोकणी माणसाकडून अशी काही अपेक्षा ठेवणं म्हणजे चुकीचं. कारण, मुळातच आम्ही वेळ पडल्यास पिटी भात खाऊन स्वाभिमानानं आणि ताठ कण्यानं राहणारी माणसं. 'झुकेगा नहीं' हा शब्द मूळ आमचाच. कारण, निसर्गानं भरलेल्या आणि आव्हानांनी वेढलेल्या अशा पृथ्वीवरील स्वर्गात अर्थात कोकणात आम्ही राहतो. कोण आम्हाला नारळाची तर कोण फसणाची उपमा देतं. मुख्य गोष्ट म्हणजे आम्हा कोकणी माणसाला जगाच्या पाठिवर कुठंही जा सहज ओळखता येतं. त्यासाठी कारणीभूत आहेत आमच्या अंगी असलेले चांगले किंवा अगदी वाईट गुण देखील. आम्ही राजकारणात खूप काही रस घेत नाहीत. केवळ निवडणुकीपुरतं आम्ही व्यक्त होतो आणि मतदान करून काहीही अपेक्षा न ठेवता पुढं जात राहतो.
मुळात आधी आम्ही कुणाच्या वाट्याला देखील जात नाही. पण, यावेळी आम्हा कोकणी बांधवांचा संयमाचा बांध सुटलेला दिसला. अर्थात त्याला कारणीभूत ठरला तो किरिट सोमय्यांचा दापोली दौरा आणि त्यावरून सुरू असलेलं, सुरू झालेलं राजकारण. मुळात या साऱ्या गोष्टींकडे राजकारणाच्या नजरेनं पाहिल्यास त्याच्या भल्या मोठ्या परिघाची आपणाला कल्पना येते. प्रत्येक राजकारणी कोकणातील पर्यटन कसं बहरेल आणि त्याचा फायदा इथल्या भूमिपुत्रांना कसा फायदा होईल याबद्दल बोलत असतो. पण, त्याचवेळी शासन, प्रशासन, सर्वपक्षीय नेते, सत्ताधारी यांच्याकडून मागील 25 वर्षात नेमके काय प्रयत्न झाले? याचं उत्तर अगदी प्रसिद्ध ठिकाणांवर गेल्यानंतर देखील मिळेल. कारण, मुळात सुरूवात होते ती रस्त्यापासून.
असो. सध्या विषयांतर होत आहे. तर, मुळात किरीट सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यात घडलेल्या ऑन रेकॉर्ड गोष्टी तुम्ही बघितल्या. पण, काही ऑफ द रेकॉर्ड गोष्टींचा देखील यामध्ये समावेश आहे. त्या समोर येणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण, एका नाण्याचा दोन बाजू असतात. तशा त्या या दापोली दौऱ्याला देखील आहेत.त्यामुळे दुसरी बाजू देखील समजून घेणं किंवा ती कळणं ही बाब गरजेची आहे. कारण, कोकणाच जन्म झालेल्या आणि लहानाचा मोठा झालेल्या माझ्यासारख्याला ती अधिक वेदनादायी होती. त्याला हतबलता म्हणा किंवा उद्विग्नता म्हणा. पण, काय होती हे कळणं देखील अवघड होतं. आम्ही प्रसारमाध्यमांनी मुंबईपासून दापोलीपासून हे सारं कव्हर केलं. मांडलं. सांगितलं. पण, यातून निघालेलं फलित काय? सर्वसामान्य कोकणी माणूस ज्याचा छोटासा धंदा ही मुरूडसारख्या किनाऱ्यावर आहे त्याला काय वाटतं? हे कळणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण, आम्हा पत्रकारांवर अनेक चिलखतं असतात. त्यामुळे संरक्षण असतं. त्याचा कधी फायदा तर कधी तोटा देखील होतो. पण, ही सारी चिलखतं आणि टिव्हीमध्ये काम करत असताना सांगायचं झाल्यास बूम बाजूला ठेवल्यानंतर येणारा अनुभव हा वेगळाच आहे.
मुळात मी काही व्यवसायिकांच्या प्रतिक्रियांच्या शोधात होतो. कुणीतरी कॅमेरासमोर बोलेल आणि माझं काही झाल्यानंतर मी निघून जाईन. पण, हातात बूम अर्थात माईक पाहिल्यानंतर सर्वसामान्य लगेच सावध होत होती. बराच वेळ गेला माझं अपेक्षित असं काम न झाल्यानं आम्ही दापोलीकडे रवाना झालो. सकाळच्या सत्रातील हा घटनाक्रम. त्यानंतर मी पुन्हा मुरूडला आलो रस्त्यावरील काही नागरिकांशी, पर्यटकांशी, व्यवसायिकांशी किंवा अगदी दापोली बाजारपेठेत हातातील टिव्हीचा माईक बाजूला सारत मी सर्वांशी एखादा ग्राहक, पर्यटक किंवा दापोली शहरात, कोकणात नवीन आलेल्या माणसाप्रमाणे चौकशी करत फिरत होतो. त्याचवेळी माझं लक्ष किरीट सोमय्यांचा ताफा दापोली पोलिस स्थानकाकडे तर आला नाही ना? याकडे होतं. मी सहकाऱ्याशी याबाबत माहिती देखील घेत होतो. यावेळच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. त्या सर्व प्रतिक्रिया केवळ साध्या भाषेत ऐकाच. आता शिव्या वगळतो बरं का? "अहो साहेब, हे सर्व राजकारण सुरू आहे. कुणाला काहीही पडली नाही. यांना मतं वाढवायची आहे आणि यांना ती कायम ठेवत तिकिट मिळवायची आहे. आमचं कुणाला काय पडलंय? यांच्या मनासारखं झालं म्हणजे बस! आता तुम्ही सांगा, तुम्ही म्हणालात मी कोकणात नवीन आहे. अहो एक काम करा आमच्या किनाऱ्यांवर जाऊन बघा आम्ही कुठं कुठं स्टॉल टाकले आहेत. कोकणात समुद्राच्या ठिकाणी कुठंही जा, असंच दिसणार. आमचं पोट हातावर. इकडं काय फॉरेनर येत नाहीत. शनिवार - रविवार आल्यावर मोठी गर्दी. पण, ती तरी किती जणांच्या वाटणीला येणार? पहिली 10 दुकानं होती आता 100 झाली. त्याच्यामुळे करायचं काय आणि कसं? हेच कळत नाही. अहो आम्ही काय मोठी माणसं आहोत का? हातावरचं पोट.
मोठ्या माणसांच्या गोष्टीच वेगळ्या ओ. आता तुम्ही सांगा हे हातोडा घेऊन येतायत म्हणतात लोक पण, करणार काय? त्यांचं हॉटेल तोडा. पण, आमचं काय? आमच्यासारखे 250 - 300 लोकांना पण फुकटची नोटीसा आल्या ना? त्यांच्याकडे पैसा आला त्यांनी घेतलानी. यांना राजकारण करायचंय यांनी केलानी. पण, आमचं काय? उद्या आमच्या काठ्या उचलून फेकून दिल्यावर आम्ही काय करायचं? काय आम्ही लखपती आहोत काय? हे बघा कुणीही कुठल्याही पक्षाचा असून दे, आम्हाला त्याच्याशी काय पडलेली नाही. आमच्या धंद्यावर परिणाम होऊ दे नको म्हणजे झालं. आधीच दोन वर्षे झाली. कोरोनानं वाट लावली आणि कुठं आम्ही सावरतोय. आता एक सांगा आम्ही काय कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नायत का? सगळ्या पक्षांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांचे हॉटेल्स, छोटे धंदे आहेत. त्याचं काय? अहो उद्या त्यांचं तोडायच्या आधी आमच्यावर येतील. त्यात आम्हाला वाली कोण हाय? ही मोठी माणसं खेळ पण तसेच आमच्याकडे कोण नाय बघणार.
आता शनिवार रविवार धंद्याचा दिवस. त्यातला आजचा दिवस फुकट गेला ना? आणखी दोन पैसे मिळवले असते त्यात हा राडा. काय करायचं काय? आता आठवडाभर किती जण येतील. अजून सुट्या पण सुरू झाल्या नाहीत. आता सांगा यांना सांगायचं. सोडा ओ काय बोलून उपयोग नाय. ऐकणार कोण? तुम्ही पावण्यासारख्या येऊन जाल. उद्या सकाळी उठून आम्हालाच इथं राहायचं आहे. कुठं काय बोललं तरी याच्यामुळे झालं म्हणून आमच्याकडे बोट दाखवायला तयार. त्याच्यामुळे मरू दे चालतंय तसं चालवायचं. पुढचं पुढं बघू." आता यामध्ये शिव्या देखील होतील बरं का? लक्षणीय बाब म्हणजे राजकारणाच्या पलिकडे हे सारं होतं. पण, राजकीय स्थिती अशी होती कि, कुणी उघडपणे बोलत नव्हतं. टिव्ही समोर दिसल्यावर काय झाल्यास त्याला मला जबाबदार धरतील हि भीती. शेवटी प्रत्येक माणूस हा राजकारणाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संबंधित असतो. तो कुठल्या पक्षाला, विचारधारेला मानत असतो. पण, असं असलं तरी पोट हि मात्र सर्वांचं सारखं. अर्थात वरिल प्रतिक्रिया या दहा ते पंधरा जणांशी बोलल्यानंतरचा सारांश. आता यामध्ये केवळ एका व्यक्तिला किंवा एका पक्षाला, नेत्याला शिव्या नाही तर सर्वांबद्दलचे विचार हे सारखे होते. ही लोकं एकाच तराजूत सर्वांना मोजत होती. त्यावरून भावना काय होत्या. याचा विचार प्रत्येकानं करायला हवा.
कोकणात लहानाचा मोठा झाल्यामुळे इथली परिस्थिती माहित आहे. तुमच्याकडे आंबा, काजू, पर्यटन आहे याला उल्लेख प्रत्येक जण करतो. त्याचा आम्हाला अभिमान आहे. कोण आम्हाला गोव्याप्रमाणे का नाही करत? म्हणून सवाल देखील करतो. पण, अभाव असलेल्या राजकीय इच्छ शक्तीचं काय? शिवाय, आम्हा तंगड्यात तंगड्या घालायला तयार आहोतच कि. अर्थात या साऱ्या गोष्टींना काही काळ आपण बाजुला ठेवू. कोणतीही गोष्ट करताना सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांची हि जबाबदारी आहे. त्याचनुसार सारं कामकाज सुरू असतं. पण, एखादी चूक ही पूर्वीच्या शंभर चांगल्या गोष्टी पुसून टाकण्यासाठी देखील पुरेशी आहे असं मला जाणते सांगतात. असो. बाकी आप तो समजदार हो!