BLOG : निर्बंधांपलीकडचा शिमगा!
शिमगा! कोकणी माणसाचा हक्काचा असा सण. खरं सांगायचं झालं तर प्रत्येकाचा स्वत:चा असा सण. याच सणाची आम्ही कोकणी माणसं वर्षभर एखाद्या 'चकोरा'प्रमाणं वाट पाहत असतो. वर्षातून एकदा देव घरी येणार ही कल्पनाच आम्हाला वर्षभर जगण्यासाठी बळ देते. नवी उमेद देते. त्याचं कारण असं आहे कि आम्ही कोकणी माणसं कामानिमित्त जगाच्या पाठीवर असतो. जगात तुम्ही कुठंही जा तुम्हाला एक तरी कोकणी माणूस नक्की दिसणार. वर्षभरात असलेले कामाचे व्याप, ताण, क्षीण या गोष्टी सर्वांना ठावूक आहेत. पण, आमच्या ग्रामदेवतेची पालखी आमच्या घरी आल्यावर मात्र आम्ही हे सारं काही विसरतो. आम्हाला हुरूप येतो. नवी उमेद मिळते. याच सोहळ्यासाठी आम्ही दरवर्षी न चुकता सर्व काही बाजुला सारून आमच्या कोकणातील मुळगावी येतो. देवाची सेवा करतो. शिवाय, एक गोष्ट देखील आहे, याचकाळात आमचे सर्व नातेवाईक, आप्त आम्हाला याच काळात भेटतात. त्यामुळे या क्षणांचं मोल काय असेल याचा किमान अंदाज नक्कीच येऊ शकतो.
पालखी, ढोल - ताशांचा गजर, गुलालाची उधळण, अरं होळीय होळीय! अशी घोषणाबाजी करत आम्ही कोकणी माणूस शिमगोत्सव साजरा करतो. यावेळी मिळणारं मानसिक समाधान म्हणजे जणू स्वर्गीय सुखच! तुमका एक गोष्ट सांगू या काळात सुट्टी मिळावी म्हणून आम्ही चाकरमानी अगदी वर्षभर आमच्या ऑफिसमध्ये पद्धतशीरपणे फिल्डींग लावतो. त्याचं काय हाय ना गणपती आणि शिमग्यास आम्ही गेलाव नाय तर आमच्या कोकणी म्हणून जन्माचं सार्थक कसं होईल. शिमग्याकरता सुट्टी मिळावी म्हणून हरएक प्रयत्न कोकणी माणूस करतो. प्रसंगी काही जण तर नोकरी सोडून देखील गावी दाखल होतात. आता ही बाब ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल हे जरा जास्तच आहे! पण, काय करणार ग्रामदेवतेच्या भेटीची ओढ आम्हाला काय स्वस्त बसू देत नाही. शिवाय आता ऑफिसला पण सवय झाली हा, कोकणी म्हटल्यावर याला शिमग्याकरता सुट्टी लागणार हे त्यांनी गृहित धरलं आहे. किमान यावरून तुम्हाला शिमगोत्सव आमच्यासाठी किती महत्त्वाचा आणि त्याची ख्याती काय आहे? याचा एव्हाना अंदाज देखील आला असेल.
तुम्हाला माहितेय देवाच्या भेटीसाठी आपण मंदिरात जातो. पण, देव भक्ताच्या भेटीसाठी केव्हा त्याच्या घरी आल्याचं तुम्ही ऐकलंय किंवा अनुभवलं आहे? नाही ना? पण, हीच किमया तुम्हाला आमच्या कोकणच्या शिमगोत्सवात अनुभवता येते. देवाची पालखी आमच्या घरी येते. त्यावरून या शिमगोत्सवाचं महत्त्व तुम्हाला कळलं देखील असेल! शिवाय, आमच्या अनेक पिढ्या चालत आलेल्या परंपरा आणि रूढी आम्ही आजही तशाच जपल्या आहेत. काही ठराविक अंतरानंतर त्या बदलतात हे देखील त्याचं वैशिष्ट्ये! पण, यंदा कोरोनामुळे निर्बंध लागले आणि सारं काही थांबलं. त्यामुळं मुळात शिमगा साधेपणानं ही बाब मनाला अजिबात पटत नाही नव्हे, असा शिममा आम्ही केव्हा अनुभवला आणि पाहिलाच नाही. अहो, आम्हा तरूणांचं सोडा, पण आमच्या कित्येक पिढ्यांनी असं वातावरण पाहिलंच नाही. हे सारं पहिल्यांदा घडतंय!
सकाळी लवकर मांडावर जाणे, देवाच्या पालखीचे भोई होणे यात एक वेगळं समाधान! परंपरेनुसार चालत आलेले खेळ खेळण्यात मिळणारा आनंद तर काय वर्णावा! गोमू, संकाकूर, खेळे आणि त्यानंतर होणारं जेवण या साऱ्यात एक वेगळीच गोडी आणि चव. पालखी घरी असताना म्हटली जाणारी गाणी, त्याला जत असं म्हणतात. यांच्या तालावर नाचण्याची मजा काय सांगावी! यावेळी अनेक खेळ देखील रंगतात. देवाच्या पालखीसोबत फिरण्याची मजा काही औरच. यावेळी हा हा म्हणता दिवस सरतो. रात्री अनेक ठिकाणी पालखी नाचवत असताना रंगणाऱ्या ढोल - ताशांच्या कसरती आणि पालखी नाचवण्याच्या पद्धती हा सारा सोहळा याची डोळा पाहण्याचा आनंद वेगळाच. पण, यंदा अशा अनेक प्रथांना आणि अनेक गोष्टींना आम्ही मुकणार, ही बाब मानाला पटत नाही. अशारितीनं साजरा होणारा आमचा हा पहिलाच शिमगा. तुम्हाला खरं सांगू आमचं आमच्या ग्रामदेवतेशी एक घट्ट नातं आहे. पिढ्यान - पिढ्या ते आम्ही जपलंय. आम्ही देवासमोर व्यक्त होतो. त्याच्याकडेच आमचं मन मोकळं करतो. त्यामुळे यात एक वेगळं समाधान आम्हाला मिळतं. त्याच्या चरणी लीन होण्यास आम्हाला कायम धन्यता वाटते. या साऱ्यामध्ये केव्हा खंड पडला नाही आणि तो पडल्याचं ऐकिवात नाही.
शिमग्याची चाहुल लागल्यापासून ते शिमगोत्सव संपेपर्यंत आम्ही कोकणी माणूस प्रत्येक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. उगवणाऱ्या प्रत्येक नवीन दिवशी एक खेळ किंवा प्रथा, रूढी घेत आम्ही वावरतो. सणानिमित्त होणारी धमाल अनुभवण्यात एक वेगळीच मजा असते. नातेवाई, पय - पावणे यांच्या भेटीगाठी होतात. देवांच्या भेटीनिमित्त आसपासच्या गावांमध्ये जाताना येणारा अनुभव तुम्हाला अधिक समृद्ध करतो. जगण्याकरता एक नवी ऊर्जा देतो. सारा क्षीण टाकत आम्ही प्रत्येक कोकणी माणूस आम्ही शिमगोत्सव साजरा करतो. ग्रामदेवता आणि तिच्या या सोहळ्यात केव्हाच विघ्न आलं नाही. पण, यंदाचा शिमगोत्सव न पाहिलेला असाच आहे. देवाची पालखी घरी येणार म्हटल्यावर केली जाणारी जय्यत तयारी ही 'शाही' असते. याच निमित्तानं अनेकांचे पाय घराला लागतात. सुख - दु:खाची चौकशी होते. हे सारं हा शिमगोत्सव संपर्यंत सारं काही सुरू असतं. पॉस किंवा पोस्तं ( पैसे रूपी भेट ) देण्याची पद्धत तुम्हाला इथंच दिसून येते. देवाच्या या सोहळ्यात प्रत्येक जण सारखाच. हे पोस्तं घेण्याची आणि देण्याची मजा देखील वेगळीच. इतका असा समृद्ध सोहळा साधेपणानं साजरा होणं किंवा करणं हे मनाला जड जातं. मुळात ते आमच्या पचनी पडत नाही. अहो यावेळी आपल्या मुळगावापासून लांब असलेला प्रत्येक कोकणी माणूस सर्व अडथळे पार करतो आणि गावी येतो. आपल्या सुना - नातवंड यांची भेट, ओळख सर्वांना करून देतो. धावपळीच्या काळात मागे सरलेली अनेकी नाती इथं नव्यानं सुरू होतात. अनेक नाती इथं जुळतात. दुरावलेल्या मनामध्ये आपलेपणा निर्माण होतो. मनात असलेली अडी याच देवाच्या साक्षीनं टाकून दिली जाते. आलेली मरगळ याच ग्रामदेवतेला साक्षी ठेवत झटकून दिली जाते. सखे, सोबती, सवंगडी यांच्यात रंगणारा गप्पांचा फड हा ऐकण्या सारखा असतो. अनेक वर्षे दुरावलेली नाती, त्यांचं मुळ या शिमगोत्सवात गवसतं किंवा ते शोधलं जातं. देव भेटीची ओढ हे शिगमोत्सवाचं कारण मुख्य. पण, त्याचवेळी सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक आणि आर्थिक देवाण- घेवाणीचे कंगोरे दु्र्लक्षित करून कसे चालतील? त्यामुळे देवाच्या या सोहळ्यात पडणाऱ्या खंडाच्या या बाजु देखील महत्त्वाच्या अशाच आहेत.
आमची आमच्या ग्रामदेवतेशी असलेली विण अधिक घट्ट होते ती शिमगोत्सवाच्या काळात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला अनेक गोष्टी दिल्या जातात. शिकवल्या जातात त्या याच काळात. आमचा शिमगा ग्लोबल झाला. पण, त्यातील गोडवा कमी नाही झाला. जगासोबत आम्ही कोकणी माणसं देखील ग्लोबल झालो. पण, असं असलं तरी आम्ही आमच्या रूढी, परंपरा जपल्या. त्याच भावनेनं आणि श्रेद्धेनं.आम्ही त्या दुसऱ्या पिढीला देखील दिल्या अगदी सहजपणे आणि त्यांनी त्या स्वीकारल्या देखील अगदी सहजपणे. देवाच्या भेटीची ओढ काल देखील होती, आज देखील आहे आणि उद्या देखील राहिल. देवाची भेट होणार नाही. देव घरी येणार नाही या कल्पनेनं आमचा कंठ दाटून येतो. जगात कुठंही असलं तरी आमचं मन मात्र शिमगोत्सवाच्या काळात या देवाच्या चरणी असतं. प्रत्येक कोकणी माणसाचं आणि त्याच्या ग्रामदेवतेचं नातं हे खरं पाहायाला गेलं तर कोणत्याही नात्यापेक्षा अधिक दृढ आहे. इथंच आम्ही व्यक्त होतो. व्यक्त होण्याची हीच आमची हक्काची जागा. यंदा काही निर्बंध जरूर आहेत. पण, सारे बंध तोडून आमचं मन केव्हाच त्या ग्रामदेवतेच्या चरणी लीन झालंय!