Sankashti Chaturthi 2024 : आज वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी! बाप्पाला करा प्रसन्न; चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत जाणून घ्या
Sankashti Chaturthi 2024 : वर्षातील पहिल्या चतुर्थीला बाप्पाला प्रसन्न करा. संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या.
Sankashti Chaturthi 2024 : पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला शास्त्रात विशेष महत्त्व आहे. जी व्यक्ती या दिवशी व्रत करुन श्रीगणेशाची (Lord Ganesha) पूजा करते, त्याची सर्व संकटं दूर होतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी गणपतीच्या उपासनेमुळे संतानप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक दुःख नष्ट होते. भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो, असा समज आहे.
संकष्टीच्या दिवशी चंद्राची (Moon) पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. या वर्षी संकष्टी चतुर्थीला विविध योग जुळून आले आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संकष्टी चतुर्थी 2024 चे शुभ योग, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.
संकष्टी चतुर्थी 2024 तिथी, शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 29 जानेवारीला, म्हणजेच सोमवारी आहे. सकाळी 6.10 वाजता संकष्टी सुरू झाली आहे आणि दुसऱ्या दिवशी, 30 जानेवारी रोजी सकाळी 8.54 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीमुळे संकष्टी चतुर्थी 29 जानेवारीलाच साजरी होत आहे.
संकष्टी चतुर्थी 2024 चंद्रोदय वेळ
संकष्टी चतुर्थीला 29 जानेवारी रोजी रात्री 9:10 वाजता चंद्रोदय होईल. आज चंद्राची पूजा करतात, त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. देशाच्या विविध शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळा वेगळ्या असतात.
संकष्टी चतुर्थीला तयार झाले विशेष योग
वैदिक दिनदर्शिकेनुसार, या वर्षी संकष्टी चतुर्थी व्रताच्या दिवशी अनेक शुभ योग तयार झाले आहेत. ज्यामध्ये शुक्र, मंगळ आणि बुधपासून त्रिग्रही योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शोभन योगही तयार होत असून, याला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. या योगात पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते असे मानले जाते. आज समसप्तक योग देखील तयार झाला आहे.
संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत
- संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घाला.
- त्यानंतर आंघोळ करून विधीनुसार गणेशाची पूजा करावी.
- सर्वप्रथम गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी.त्यानंतर पूजेमध्ये तीळ, गूळ, लाडू, फुले, कलशात पाणी, धूप, चंदन, केळी किंवा नारळ प्रसाद म्हणून ठेवावे.
- यानंतर देवाला चंदनाचा टिळा लावावा. फुले व पाणी अर्पण करा.
- त्यानंतर श्रीगणेशाला तिळाचे लाडू व मोदक अर्पण करा.
- अगरबत्ती पेटवा आणि श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा.
- उपवास करत असाल तर अन्नाचे सेवन अजिबात करू नका.
- संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणेशाची पूजा करून संकष्टी व्रत कथा वाचावी.
- रात्री चंद्र पाहून उपवास सोडावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :