Lakshmi Pujan Muhurat : 'या' वेळेतच करा लक्ष्मी पूजन
Diwali 2022 : लक्ष्मी पूजनाची ठराविक वेळ असते. पंचांगानुसार देण्यात आलेल्या वेळेनुसारच लक्ष्मी पूजन केले जाते.
Diwali 2022 Lakshmi Pujan Muhurat : उद्या म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी कुबेर पूजा आहे. या निमित्ताने घरोघरी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी वर्ग उद्या आपल्या हिशोबाच्या वह्या म्हणजे चोपड्या पूजतात. परंतु, लक्ष्मी पूजनाची ठराविक वेळ असते. पंचांगानुसार देण्यात आलेल्या वेळेनुसारच लक्ष्मी पूजन केले जाते.
लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त
अश्विन कृष्ण 30 (अमावस्या) शके 1944 सोमवार दि. 24 नोव्हेंबर 2022
पूजेचा मुहूर्त : दुपारी 3 ते 6/ सायंकाळी 6 ते रात्री साडे आठ/ रात्री साडेदहा ते उत्तर रात्री 3.30 पर्यंत.
असे करा लक्ष्मी पूजन
लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरातील कर्त्या पुरुषाने सायंकाळी मंगलस्नान करुन पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा शिक्का, हिशोबाची नवीन वही किंवा डायरी मांडावी आणि मुख्य प्रवेशद्वारापासून पूजेच्या पाटापर्यंत दूध पाण्याचा हात फिरवून पाच किंवा सात लक्ष्मीच्या पाऊलांच्या जोड्या ( दोन पाऊलांची एक जोडी ) कुंकवाने काढाव्या, त्याच्यावर गंध, अक्षता, धूप, दीप करुन पूजेला बसावे. स्वत:ला मंगल तिलक उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावून घरातील देवांना गणपती, कुलदेवता स्मरण करावे व मोठ्यांना नमस्कार करावा. ( मोठ्यांना नमस्कार करताना कृपया पायांना हात लावू नये. लांबून नमस्कार करावा. )
संकल्प
" मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्तर्थ्य श्री परमेश्वर प्रित्यर्थ मम कुशलव्यवहार मशिपत्रादि उपकरण सहित अयव्यये पुस्तकरुपी सरस्वतीपूजनं स्थिर लक्ष्मी प्रात्यर्थ प्राप्त लक्ष्मी संरक्षणार्थ लक्ष्मी कुबेर पूजनंच् करिष्ये )
(गुरुजी उपलब्ध झाले नाही तर मानसीक संकल्प करावा.) गणपती स्मरण करुन लक्ष्मीचे शिक्के , नोटा, सुट्टे पैसे, वही किंवा डायरी यांच्यावर गंधाने स्वस्तिक काढून यांची पंचोपचार ( रोज देवांची पूजा करतो तशी ) किंवा षोडशोचार पूजा करावी.
धणे, गूळ, पेढे इ. नैवेद्य दाखवावा. दिव्यांची रोषणाई करावी. दुसऱ्याला त्रास होणार नाही व पर्यावरण बिघडणार नाही अशा पद्धतीने फटाके वाजवावे. शक्यतो पूर्ण रात्री जागरण करावे. पूजा पूर्ण झाल्यानंतर कुंकवानी जी पाऊले काढली आहेत ते कुंकू आणि धनत्रयोदशीच्या दिवशीचे कुंकु कागदावरती गोळा करुन आपल्या पैशांच्या कपाटात पुडी ठेऊन द्यावी. शक्य झाल्यास रोज त्यातले कुंकू घरातील सुवासिनीने लावावे. गेल्या वर्षीच्या पूजेचे कुंकू कपाटात ठेवले असेल तर ते कुंकू पाण्यात विसर्जन करावे.
मांडलेली पूजा रात्री उचलली तरी चालेल. या पूजेला उत्तर पूजा नसते. पहाटे 3.30 ला ग्रहणाचे वेध लागत आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)