Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारीला फोकस इंटरनॅशनल या नावाने 18 कोटी 4 लाख 30 लाख 641 रुपये रक्कम चेकद्वारे वटल्याचे दिसून आले. आणखी दोन धनादेश सुद्धा वटण्याच्या मार्गावर होते.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेला बनावट स्वाक्षरी, धनादेश आणि स्टॅम्पचा वापर करून तब्बल 57 कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेळीच कार्यवाही झाल्याने पैसे सुरक्षित आहेत. अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या सतर्कतेमुळे फसवणूक टळली गेली आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बनावट धनादेश आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा प्रकार
अज्ञात व्यक्तीने फोकस इंटरनॅशनल, जीसीएसएसपी प्रायव्हेट लिमिटेड, Trinity इंटरनॅशनल बँक अकाउंटवर पैसे पाठवण्यासाठी बनावट धनादेश आणि शिक्क्यांचा वापर केल्याचा प्रकार उघड झाला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी कृष्णात लक्ष्मण पाटील यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी दिली आहे. शाहूपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 336 (3) , 338 यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शाहूपुरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
धनादेश नवी मुंबईतील शाखेतून जमा करण्यात आला
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारीला फोकस इंटरनॅशनल या नावाने 18 कोटी 4 लाख 30 लाख 641 रुपये रक्कम चेकद्वारे वटल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे, तर आणखी दोन धनादेश सुद्धा वटण्याच्या मार्गावर होते. धनादेशाची रक्कम 19 फेब्रुवारीला ज्या खात्यावर गेली होती ते खाते पत्रव्यवहार करून गोठविण्यात आले. या रकमेचा धनादेश नवी मुंबईतील शाखेतून जमा करण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. संबंधित बँकेकडे चौकशी केली असता आणखी दोन धानदेश प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पाच लाखांहून अधिक रक्कम अदा करताना संबंधित विभागाची परवानगी बंधनकारक
कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील वित्त विभागाचे सर्व व्यवहार घेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून होत असतात. पाच लाखांहून अधिक रक्कम अदा करताना संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. रोखपाल विशाल चौगुले व सुप्रिया जमादार यांनी 21 फेब्रुवारीला जिल्हा बँकेतून जिल्हा परिषदेचा खाते उतारा आणला. यानंतर ही बाब लक्षात आली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

