Devshayani Ekadashi 2024 : देवशयनी एकादशी 16 की 17 जुलैला? देव निद्रावस्थेत जाण्याआधी करुन घ्या 'ही' शुभ कार्य
Devshayani Ekadashi 2024 : देवशयनी एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण या तिथीपासून भगवान विष्णू चार महिने निद्रावस्थेत जातात आणि चातुर्मास (Chaturmas 2024) सुरू होतो.
Devshayani Ekadashi 2024 : हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. वास्तविक, एका वर्षात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं वेगळं महत्त्व असतं. परंतु देवशयनी एकादशीचं महत्त्व अधिक आहे, कारण या दिवसापासून चातुर्मास (Chaturmas 2024) सुरू होतो आणि सर्व शुभ कार्यं बंद होतात. देवशयनी एकादशीला आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) म्हणून देखील संबोधलं जातं.
एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यात देवशयनी एकादशी महत्त्वाची आहे. कारण मान्यतेनुसार, या एकादशीपासून चार महिने देव निद्रावस्थेत जातात, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2024) म्हणतात. या कालावधीला देवाचा निद्राकाळ म्हणतात. असं म्हणतात की, विष्णू देव झोपेत गेल्यानंतर भगवान शिव विश्व चालवण्याची जबाबदारी घेतात. यंदा देवशयनी एकादशी कधी आणि या व्रताच्या वेळी कोणते नियम पाळावे? जाणून घेऊया.यंदा देवशयनी एकादशी कधी आणि या व्रताच्या वेळी कोणते नियम पाळावे? जाणून घेऊया.
देवशयनी एकादशी कधी? (Devshayani Ekadashi 2024 Date)
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असते. यंदा ही एकादशी 17 जुलै रोजी असणार आहे, या दिवसापासून चातुर्मासही सुरू होणार आहे.
आषाढ शुक्ल एकादशी तिथी 16 जुलै 2024 रोजी रात्री 8 वाजून 33 मिनिटांनी सुरू होईल आणि 17 जुलै 2024 रोजी रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, देवशयनी एकादशीचं व्रत 17 जुलै रोजी पाळण्यात येणार आहे.
देवशयनी एकादशी शुभ योग (Devshayani Ekadashi 2024 Shubh Yog)
देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी 7 वाजून 05 मिनिटांपर्यंत शुभ योग तयार होत आहे. यानंतर शुक्ल योग असेल आणि 18 जुलै रोजी सकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी हा योग समाप्त होईल. देवशयनी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योगही जुळून येत आहे.
चातुर्मास सुरू होण्याआधी करुन घ्या 'ही' शुभ कार्यं
पंचांगानुसार, 17 जुलैपासून चातुर्मास सुरू होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशी ते देवउठनी एकादशीपर्यंत, म्हणजेच 12 नोव्हेंबरपर्यंत चातुर्मास असणार आहे. या दरम्यानच्या काळात देव निद्रावस्थेत जातात. त्यामुळे ही चार महिने विवाह सोहळा, साखरपुडा, मुलांचं नामकरण आणि गृहप्रवेशासारखे शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं जातं. देवउठवनी एकादशीनंतरच या शुभ कार्यांना सुरुवात होते.
देवशयनी एकादशी पूजाविधी (Devshayani Ekadashi Puja Vidhi)
- देवशयनी एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करावं.
- त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा.
- देवघरात दिवा लावा आणि भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा. जर मंत्रांचा जप करणं शक्य नसेल तर देवाच्या नामाचा 108 वेळा जप करू शकता.
- त्यानंतर श्री हरी विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करत फुलं आणि तुळशी पत्र अर्पण करा.
- देवाला नैवेद्य आर्पण करा. नैवेद्य अर्पण करतान लक्षात ठेवा की, नैवेद्य हा सात्विक असावा. नैवेद्यात तुळशीचा आवर्जुन समावेश करा. भगवान विष्णूची
- कोणतीही पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते.
- शेवटी श्री हरी विष्णूची आरती करा.
एकादशी व्रत करणाऱ्यांनी या दिवशी काय करावं?
- देवशयनी एकादशीच्या दिवशी गरीब, गरजू, असहाय्य लोकांना आपल्या क्षमतेनुसार दान करा.
- देवशयनी एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी जमिनीवर झोपावं व ब्रह्मचर्य पाळावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: