Chanakya Niti : डोक्यावर कर्जाचा बोजा असो वा रखडलेलं प्रमोशन, पगारवाढ; तुमच्या वाईट काळात चाणक्यांच्या 'या' 3 शिकवणी पडतील कामी, लवकरच येतील 'अच्छे दिन'
Chanakya Niti : चाणक्य म्हणतात, कठीण काळावर मात करायची असेल तर माणसाने या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या. या गोष्टींचा अवलंब केल्यास माणसाच्या सर्व समस्या दूर होतात, असं चाणक्य सांगतात.
Chanakya Niti : सुखी जीवनाची गाडी निरंतर चालत राहावी यासाठी अनेकजण आजही चाणक्य नीतिमधील (Chanakya Niti) तत्त्वांचा अवलंब करतात. आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी कठीण काळाचा (Bad Patch) सामना करावाच लागतो. अशा वेळी काही लोक फार गोंधळून जातात. संकट काळात नेमकं करावं काय हे त्यांना कळत नाही आणि त्यांच्या समोरील समस्या आणखी वाढत जातात. अशा स्थितीत वाईट काळाचा सामना करण्यासाठी चाणक्यांनी काही युक्त्या सांगितल्या आहेत.
तुमच्या कठीण काळात चाणक्यांनी सांगितलेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणी तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. तुम्ही यशाच्या मार्गावर चालत राहाल आणि संकटं तुमच्यापासून चार हात लांब राहतील. कठीण काळात नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? जाणून घेऊया.
आत्मविश्वास डगमगू देऊ नका
तुम्ही ठरवलं तर कोणालाही मुठीत घेऊ शकता. तुमच्यावर कितीही संकटं येऊ दे, पण तुमचा आत्मविश्वास हलला नाही पाहिजे. कठीण काळात तुम्ही मनाने खचू नये. चाणक्य सांगतात, जर तुम्ही जिंकण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. जर तुमच्या मनात जिंकण्याची जिद्द असेल, तर अंधाऱ्या खोलीतही खिडकीतून डोकावणारा प्रकाश तुम्हाला यशाचा मार्ग दाखवू शकतो. पण जर तुम्ही मनातूनच पराभव स्वीकारला तर चांगल्या काळासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागेल. कठीण काळात आत्मविश्वास हे सर्वात मोठं शस्त्र आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही असाध्य गोष्टीही साध्य करू शकता.
आपात्कालीन स्थितीसाठी पैशांची बचत करा
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, कठीण काळात पैसाच माणसाच्या कामी येतो. हातात पैसा असेल तर कठिणातल्या कठीण समस्याही दूर लोटता येतात. आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमी पैशाची बचत केली पाहिजे. तुम्ही कठीण काळातून जात असाल तर तुम्ही अनावश्यक खर्च थांबवला पाहिजे आणि पैशाची बचत केली पाहिजे.
संयम आणि धैर्य महत्त्वाचं
घाबरला तो संपला, ही म्हण कायम लक्षात ठेवा. चाणक्य म्हणतात, घाबरलेला माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आयुष्यात जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा त्याला घाबरू नये, धैर्य धरावे. भीती माणसाला कमकुवत बनवते आणि हळूहळू ती आपल्यावर वर्चस्व गाजवते.
ज्याप्रमाणे दिवसापाठोपाठ रात्र येते, त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यातही वाईट काळ येतो. ठराविक कालावधीनंतर पुन्हा सुखाच्या क्षणांना सुरुवात होते. या काळात जो संयम आणि धीर धरतो, तो माणूस कधीही पराभूत होणार नाही.