Chanakya Niti : लग्नाआधीच जोडीदाराला विचारा 'हे' 3 प्रश्न; नाहीतर लग्नानंतर होईल संताप, चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : योग्य जोडीदार हा आपल्याला नेहमी यशाच्या मार्गाकडे घेऊन जात असतो. आपल्याला ज्याच्यासोबत उभं आयुष्य काढायचं आहे, त्याच्याबद्दल काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे आणि यासाठीच लग्नाआधी जोडीदाराला काही प्रश्न विचारले पाहिजे.
Chanakya Niti : सुखी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी एक चांगला जोडीदार भेटणं आवश्यक असतं. आपलं लग्न एका अशा व्यक्तीशी व्हावं जो आपला मान-सन्मान करेल आणि सुखी ठेवेल, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळेच आपला जोडीदार आपल्यासाठी योग्य असेल का? हे पारखणं आवश्यक असतं.
आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नितीत विवाहासंदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. सुखी वैवाहिक जीवनासाठी चाणक्यांच्या या नितीचा वापर अनेकजण करतात. आपला विवाह हा योग्य व्यक्तीशी व्हावा, यासाठी चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. भविष्यात कोणतेही कलह नको, यासाठी लग्न करण्यापूर्वी आपल्या भावी जोडीदाराला तीन प्रश्न विचारण्याबद्दल चाणक्यांनी (Chanakya) सांगितलं आहे.
लग्नाचं नातं हे खूप नाजूक असतं. लग्नानंतर कलह नको यासाठी आधीच सावध राहिलं पाहिजे.चाणक्यांच्या मते, लग्नाआधी तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला हे तीन प्रश्न नक्कीच विचारले पाहिजेत, जेणेकरून भविष्यात तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही. हे प्रश्न नेमके कोणते? जाणून घेऊया.
जोडीदाराच्या वयाबद्दल नक्की जाणून घ्या
आचार्य चाणक्यांच्या नीती शास्त्रानुसार, लग्नापूर्वी भावी जोडीदाराचं वय निश्चितपणे विचारलं पाहिजे. कारण, पती-पत्नीमधील वयातील फरक आणि त्यांच्यातील समजूतदारपणाचा अभाव यामुळे भविष्यात लग्न तुटू शकतं. दोघांनी एकमेकांना समजून न घेतल्याने दोघांमध्ये सतत भांडणं होऊ शकतात. यामुळेच पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा, अन्यथा वैवाहिक जीवन सुखी होणार नाही.
जोडीदाराच्या आरोग्याचीही तपासणी करा
आचार्य चाणक्यांनी असंही म्हटलं आहे की, लग्नापूर्वी तुमच्या भावी जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती मिळवा. त्याला काही शारीरिक किंवा मानसिक समस्या तर नाही ना? हे जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
आधीच्या प्रेमसंबंधांबद्दल जाणून घ्या
आचार्य चाणक्य मानतात की, लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील प्रेमसंबंधांबद्दल नक्कीच विचारलं पाहिजे किंवा त्याचा शोध घेतला पाहिजे. तुमचा जोडीदार भूतकाळातील काही गोष्टी लपवत तर नाही ना? याची काळजी घ्या. जर तुम्ही याबद्दल खुलेपणाने बोलाल तरच ते तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: